Tuesday, 22 January 2013

शून्यातून विश्‍व निर्माण करीत पगार बनले पोल्ट्री उद्योगात आयकॉन!


घरची परिस्थिती हलाखीची असल्याने गंगा पगार यांनी गाव सोडून शहरात खासगी दुकानात नोकरी धरली. प्रामाणिकपणा, कामाचे चांगले नियोजन यातून त्यांनी तेथे मालकांचे मन जिंकले. उद्योजक बनण्याचे स्वप्नही मनाशी सतत बाळगले असल्याने पोल्ट्री व्यवसायात उडी घेतली. यातून केवळ जिद्द, अभ्यासाच्या जोरावर दहा वर्षांत हा व्यवसाय यशस्वी करून नावारूपास आणला. कमी भांडवल, कमी क्षेत्र असतानाही शिस्तबद्ध नियोजनातून प्रगतीची मोठी झेप घेणाऱ्या कळवण येथील पगार यांची राहुल हॅचरीज युवकांचे प्रेरणास्थान बनली आहे.
ज्ञानेश उगले

नाशिक जिल्हा पोल्ट्री उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अनेक पोल्ट्री उत्पादक खासगी कंपन्यांसोबत करार करून या पूरक व्यवसायात चांगला जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकजण यात यशस्वी झाले. काही मोठे उद्योजकही झाले. कळवण येथील गंगा पगार यांचे वय 35 वर्षे आहे. वयाच्या पंचविशीपासून ते पोल्ट्री व्यवसायात उतरले. या दहा वर्षांत करारातून पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, स्वत:ची हॅचरीज, शेतकऱ्यांचा करार शेतीत सहभाग, स्वत:चे चिकन सेंटर, स्वत:चे ब्रीडर युनिट असे एकेक टप्पे त्यांनी पार केले आहेत. यातूनच नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या "कसमादे' पट्ट्यात राहुल हॅचरीज ब्रॅण्ड बनला आहे.

गंगा पगार- एक संघर्षयात्री
घरचे अठराविश्‍वे दारिद्य्र, वडिलांचे अकाली निधन झाल्याने लहान वयातच पडलेली कुटुंबाची जबाबदारी. अशा धडपडीतून चार लहान बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पगार यांनी पेलली. पाठीशी फक्त आईचा आशीर्वाद आणि सोबत तीव्र महत्त्वाकांक्षा यातून संघर्षमय प्रवास सुरू राहिला आहे. शालेय शिक्षण सुरू असताना इतरांच्या म्हशी चारायचे काम करीत त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) केले. घरच्या गरिबीमुळे 1997 वर्षी वयाच्या विसाव्या वर्षी नाशिक शहरातील भाविनभाई शहा यांच्या दुकानात नोकरी पत्करली. चोख, विश्‍वासू कामाची पसंती मिळवत शहा यांनी पगार यांना कळवणमध्येच स्वतंत्र व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले. तेथे जनरल स्टोअर्स सुरू केले तरी शहा यांच्याकडील नोकरी सुरूच होती. दरम्यान वरवंडी येथे पोल्ट्री फार्म पाहिल्यानंतर हा व्यवसाय करण्याचे ठरविले. सन 2002 मध्ये पाच हजार पक्ष्यांच्या शेडपासून व्यवसायाला सुरवात केली. हरियाना, पानिपत, जबलपूर, हैदराबाद येथून पक्षी मागवावे लागत. नुकसान, फसवणूक यातून मार्ग काढीत तीन वर्षांनंतर बॅच चांगली येऊ लागली. मात्र कोंबडीला रेट पुरेसा मिळत नसल्याने आर्थिक चणचण वाढत होती. जवळ भांडवल नव्हते. बॅंकांचे उंबरठे झिजवले. तारणाअभावी कर्ज नाकारले. पुन्हा पितृतुल्य भाविनभाई धावून आले. त्यांनी आठ लाखांची मदत केली. पुढे अविश्रांत मेहनत, जिद्द, चिकाटी या गुणांचा कस लावीत पगार यांनी दहा वर्षांच्या संघर्षात यशाचा टप्पा गाठला आहे. एक हजार रुपये महिन्याची नोकरी करणारे पगार महिन्याला तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल करीत आहेत.

व्यवसायाची कुठली पार्श्‍वभूमी नसताना, मोठे भांडवल गाठीस नसताना दिवसरात्र मेहनत करीत, अनेक अडथळ्यांवर मात करीत प्रभावी व्यवस्थापन करीत त्यांनी पोल्ट्री व्यवसायात देदीप्यमान यश मिळविले आहे.

पगार यांचे वडिलोपार्जित अवघे सव्वा एकर (60 गुंठे) क्षेत्र. त्यातही पाण्याची सोय नसलेले. खरंतर दहा वर्षांपूर्वी ओसाड असलेले. शेतात जाणारा कच्चा रस्ता.. एखादेच आंब्याचे जुने झाड, त्या झाडाजवळच झोपडीवजा त्यांचे घर! अर्थात हे चित्र दहा वर्षांपूर्वीचे, आता मात्र संपूर्ण बदलले आहे. कळवण शहरातून दक्षिण दिशेने अर्धवट कच्च्या रस्त्याने गंगा पगार यांच्या शेताकडे जाता येते. शेताजवळ गेल्यानंतर मोठे प्रवेशद्वार, कडेला सुरक्षारक्षकाची खोली, परिसरात एक साधे, दोन दुमजली ब्रॉयलर शेड्‌स, हॅचरीस, खाद्य प्रक्रिया केंद्र या सर्व भागात कामगारांची सुरू असलेली लगबग असे दृष्य दिसते. तीन वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये पोल्ट्रीचे काम सतत सुरू असल्याने नेहमीच धावपळ असते.

कसा चालतो पगार यांचा पोल्ट्री उद्योग? 1) अंड्यापासून पक्षीनिर्मिती, पिले निर्मितीची यंत्रणा, दोन किलो वजनाचे पक्षी बनविण्याचा विभाग, पक्षी विक्री तसेच चिकन सेंटर असे वेगवेगळे उपविभाग.
2) प्रत्येक विभागाचे साप्ताहिक वेळापत्रक. त्यानुसार कामे परिपूर्ण व अचूक होण्याकडे पगार यांचे सातत्याने लक्ष.
3) सर्व विभागात पहाटेपासून कामास सुरवात. कामगारांकडून साफसफाई, कोंबड्यांची अंडी गोळा करणे, जंतुनाशक वापरून क्षेत्र साफ करणे, पुन्हा निर्जंतुकीकरण आदी कामे.
4) त्यानंतर अंडी "कोल्डरूम' मध्ये 16- 17 अंश से. तापमानाला व त्यानंतर इनक्‍युबेटरमध्ये साडेअठरा दिवस ठेवली जातात. (अंड्यापासून पिल्ले निर्मितीच्या या प्रक्रियेत पारंपरिक पद्धतीत कोंबडीला 21 दिवस लागतात. यासाठी 99.9 अंश से. तापमान व 86.5 टक्के आर्द्रता असते.) इनक्‍युबेटरमधील साडेअठरा दिवसांनंतर पुढील अडीच दिवस हॅचरमध्ये जातात. त्यानंतर 21 दिवसांनी म्हणजे 504 तासांनी पिल्लू बाहेर येते.
5) कॅन्डलिंग व स्कॅनिंग चाचण्यांच्या पद्धतीमुळे 12 व्या दिवशीच अंड्यांची फर्टिलिटी समजू शकते.
6) अशा पद्धतीने पगार यांच्या हॅचरीमधून दर महिन्याला एक लाख पिल्ले निघतात. पैकी 40 टक्के (40 हजार) पिल्ले करारशेतीसाठी 15 करारबद्ध शेतकऱ्यांना दिली जातात. उर्वरित पिल्लांची मुंबई, गुजरातमध्ये थेट बाजारात विक्री होते.
7) पिल्ले दोन किलो वजनाची बनवून विकली जातात. उर्वरित 10 टक्के कळवण परिसरातील स्वत:च्या चिकन सेंटरला जातात. असे दररोज 500 पक्षी सेंटरला जातात.

इन्सिमेशन महत्त्वाचे ब्रॉयलर अंड्यांच्या गुणवत्तेसाठी इन्सिमेशन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची. ती जितकी काळजीपूर्वक होईल तितके कोंबडीकडून गुणवत्तेचे अंडे मिळते. त्यासाठी एका नराकडून (कोंबड्यापासून) वीर्य काढून ते 100 मादींना (कोंबड्यांना) शास्त्रशुद्ध पद्धतीने दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षित कामगारांची आवश्‍यकता असते. दर तिसऱ्या दिवशी 12 प्रशिक्षित कामगार सरासरी 10 हजार पक्ष्यांना इन्सिमेशन करतात. काटेकोर लक्ष असल्याने पिल्ले निर्मिती प्रक्रियेत पगार यांनी 90 टक्‍क्‍यांपर्यंत यशस्विता मिळाली आहे. पोल्ट्री उद्योगातील ती उच्चांकी मानली जाते.

दर्जेदार खाद्य हा यशाचा पाया
दर्जेदार खाद्य हा पोल्ट्री व्यवसायाच्या यशाचा पाया असल्याचे पगार मानतात. मका, सोयाबीन, नदीतील शंख, हिलग्रीट असे एकंदर 20 घटक एकत्र करून कोंबडीखाद्य तयार केले जाते. पोल्ट्री खर्चाच्या 60 टक्के खर्च खाद्यावर होत असल्याने त्याचे पोल्ट्रीतच मिश्रण करणे, त्यावर प्रक्रिया करणे या बाबींवर भर दिला आहे. दिवसातून एकदाच खाद्य दिले जाते. प्रत्येक पक्षाला 150 ग्रॅम खाद्य मिळेल याकडे लक्ष दिले जाते. पक्ष्यांना विविध रोगांपासून वाचविण्यासाठी पिल्लांच्या आईचे तसेच पिल्लांचेही पहिल्या दिवसांपासून ते 67 आठवड्यांपर्यंत एकूण 40 वेळा लसीकरण केले जाते.

भारनियमनामुळे खर्चात भरच
पोल्ट्री व्यवसायाला पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत 18 तास अखंडित वीजपुरवठा आवश्‍यक असतो. या काळात अल्पवेळेसाठी जरी वीज खंडित झाली तरी इनक्‍युबेटरमधील पक्षी दगावून लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पगार यांनी सहा जनरेटर संच खरेदी केले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला. या नियोजनात रात्री नऊ ते रात्री चार या काळात सर्व शेडमधील वीजपुरवठा बंद करण्यावर कटाक्षाने भर दिला जातो. कारण या काळात दूरवरचा प्रकाश जरी पक्ष्यांच्या नजरेच्या टप्प्यात आला तरी पक्षी प्रोलन्स आजाराने रोगग्रस्त होऊ शकतो.

स्वच्छता आवश्‍यकच!
- ब्रॉयलर शेड, हॅचरीज व पोल्ट्री परिसरात शंभर टक्के स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जातो.
- एकूण 25 कामगारांपैकी चार कामगारांना सातत्याने सफाईची जबाबदारी
- अंड्यातून पिल्लू बाहेर पडताना शेवटचा एक तास सर्वाधिक महत्त्वाचा. या वेळी पिल्लांची गर्दी वाढते. या वेळी तापमान वाढून पिल्ले दगावण्याचा धोका असतो.

सोयाबीन टंचाईचे आव्हान
पोल्ट्री व्यवसायासमोर मजूर व सोयाबीन टंचाई, त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च ही मोठी समस्या आहे. पोल्ट्रीचे काम ठराविक वेळेचे नसते. कामाचे स्वरूपही वेगळे असते. त्यामुळे मजूर मिळणे अवघड बनते. सध्या पगार यांच्याकडे 25 मजूर तीन शिफ्टमध्ये काम करतात. त्यांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्याबरोबरच गॅसपुरवठ्यासारख्या सुविधाही दिल्या जातात. त्यांचे आजारपण, अडचणीसंदर्भात विशेष आपुलकीने लक्ष दिले जात असल्याने मजूर आमच्या कुटुंबातील घटक झाल्याचे पगार म्हणाले.

अर्थशास्त्र
खर्चाचा विचार करता ब्रीडर, हॅचरीज, कॉन्ट्रॅक्‍टचे शेड्‌स, मजूर, लाइट, मजूर आणि खाद्य यासाठी रोज तीन लाख रुपये या प्रमाणे महिन्याला 90 लाख रुपये खर्च होतो. उत्पन्न पाहता रोज 3000 अंडी व 4500 पिले तयार होतात. पिलांना सरासरी 20 रुपये दर मिळतो. त्यातून 90 हजार रुपये उत्पन्न मिळते. या शिवाय दररोज 50 टक्के पक्षी ब्रॉयलर म्हणून विक्री होतात. त्याला सरासरी सरासरी 60 रुपये मिळतो. करार शेतीसाठी (कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिग) महिन्याला पाच लाख पक्षी तर चिकन सेंटरसाठी रोज 500 पक्षी पाठवले जातात. या सर्वांचे एकत्रित उत्पन्न पाहिले तर एकूण एक कोटी रुपये उत्पन्न मिळते. एक कोटी रुपये निव्वळ उत्पन्नातून 90 लाख रुपये खर्च यातून प्रत्येक महिन्याला सरासरी 10 लाख रुपये निव्वळ उत्पन्न यातून मिळत असल्याचे गंगा पगार यांनी सांगितले.

सुरवातीला संधी नाकारली मात्र...
सन 2005 वर्षी पगार यांनी आपला ब्रीडर फार्म सुरू करायचे ठरविले. तेव्हा ते या क्षेत्रातील एका आघाडीच्या खासगी कंपनीच्या कार्यालयात कळवणहून एसटी बस व रिक्षाने गेले. यावर ब्रीड नेण्यासाठी करोडपती उद्योजक स्वत:च्या वाहनाने येतात. तुमच्यासारखी व्यक्ती हा व्यवसाय करू शकत नाही, असे सांगत पगार यांना ब्रीड देण्याचे नाकारले गेले. मात्र पगार यांनी उद्योगाच्या सर्व निकषांसाठी पात्र असतानाही ब्रीड देण्याचे का नाकारता, असा सवाल करीत कंपनीचा पिच्छा पुरवला. त्यानंतर मात्र त्यांना अपेक्षित ब्रीड तर मिळालेच त्याशिवाय त्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी कंपनीने त्यांची विशेष प्रशंसाही केली.

संपर्क - गंगा पगार, 9423556244

2 comments:

  1. खूप सुंदर तुमच्या जीवनाची information आहे आणि त्यातून तुम्हाला मिळालेले यश पाहून खूपच आनंद होत आहे
    तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. सर नमस्कार मी निलेश म्हात्रे रायगड चा रहिवासी आहे मला ही पोल्ट्री वेवसाय करायचा आहे त्या साठी कमी खर्चात पॉल्ट्री शेड़ कशी उभारावी मार्गदर्शन करावे. आभार.....

    ReplyDelete