Friday, 1 February 2013

पाच एकरांत पिकांचे नियोजन त्यातूनच मिळवले योग्य अर्थार्जन

सातारा जिल्ह्यातील वळसे येथील विजय कदम यांनी आपल्या व शेतीच्या प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्नपूर्वक सुधारणा करीत पाच एकर क्षेत्रात ऊस, आले, केळी तसेच अन्य पिकांचे सुयोग्य नियोजन केले आहे. दुग्ध व्यवसायातून घरखर्च भागवताना शेतीतील उत्पन्नातून शेतीचा विस्तार साधण्याचे सूत्र त्यांनी अंगीकारले आहे. त्यातूनच यशाकडे त्यांनी वाटचाल केली आहे.
विकास जाधव
पुणे-बंगळूर महामार्गावर तीन ते चार हजार लोकवस्तीचे वळसे (जि. सातारा) गाव आहे. येथील विजय किसन कदम हे वाणिज्य शाखेचे पदवीधर. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यातच शिक्षण घेऊनही नोकरीचा भरवसा नाही अशी सध्याची परिस्थिती. त्यामुळे शिक्षणानंतर शेतीच करण्याचे विजय यांनी ठरवले. कुटुंबात ते मोठे. आई-वडील अपंग. साहजिकच शेतीची सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेण्याशिवाय विजय यांना पर्याय नव्हता. सुरवातीस एकत्र कुटुंबांतून वडिलांना वाटून आलेली पाच एकर कसण्यास सुरवात केली. परिस्थिती हलाखीची तसेच पाणी नसल्यामुळे कोरडवाहू शेतीत पिकांवर मर्यादा होत्या. त्यातून कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता.

बागायत शेती शेतीला पुरेसे पाणी नाही म्हणून निराश न होता दुसऱ्या शेतकऱ्यांचे चौथ्या वाट्याने पाणी घेऊन बागायत शेती सुरू केली. या पद्धतीने ऊस, हरभरा, गहू आदी पिके घेतली. यातून भांडवलनिर्मिती सुरू झाली. याच वेळी लहान भाऊ अजय याने एसटीडी बूथ व्यवसाय सुरू केला. पाण्यासाठी आतापर्यंत येणाऱ्या शेती उत्पादनातील चौथा वाटा द्यावा लागत होता. शेती व छोट्या दुग्ध व्यवसायातील उत्पन्नाच्या आधारे नदीवरून पाइपलाइन करून सर्व शेतीत स्वतःचे पाणी आणावे हा विचार पुढे आला. भांडवलनिर्मिती झाल्याने उरमोडी नदीवर विद्युत पंप बसवून सर्व पाच एकर क्षेत्रात पाइपलाइन केली. त्यानंतर विजय यांची खऱ्या अर्थाने बागायत शेतीस सुरवात झाली. या बागायत क्षेत्रात 30 गुंठे आले, अडीच ते तीन एकर क्षेत्रात ऊस, 20 गुंठे ज्वारी व 17 गुंठे केळी असे नियोजन आहे.

पीकनिहाय नियोजन वळसे गाव परिसरात आले लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे विजयदेखील मागील काही वर्षांपासून हे पीक नियमित घेतात. सुरवातीला दहा गुंठे क्षेत्रात माहीम जातीचे आले त्यांनी घेतले. बियाणे, शेणखत, वरखत, फवारणी, मेहनत असे 35 हजार रुपये खर्च आला. त्यातून तीन टन उत्पादन मिळाले. त्या वेळी
किलोला 40 रुपये दर मिळाला. तीन टन उत्पादनापासून एक लाख 20 हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता 85 हजार रुपये नफा मिळाला. सध्या अर्धा एकरात गुजरातवरून आणलेल्या एका वाणाचा प्लॉट उभा आहे. सध्या आल्याला किलोला 36 रुपये दर सुरू आहे. येत्या काळात हा दर वाढण्याची शक्‍यता असल्याने त्या वेळेसच विक्रीचा विचार आहे.

ऊस- बेणे प्लॉट व कारखान्यासाठी पाणी मुबलक झाल्याने अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याकडून को व्हीएसआय 03102 या नवीन ऊस जातीच्या बेणे मळ्याचे 30 गुंठे क्षेत्रावर नियोजन केले. नोव्हेंबर 2010 मध्ये साडेतीन फूट सरीत एक फूट अंतरावर लागवड केली. यात कांद्याचे आंतरपीक घेतले. त्यातून सहा टन उत्पादन मिळाले. कांदा ठेवण्यास जागा नसल्याने सर्व कांदा पाच रुपये प्रति किलो दराने विकून टाकला. सहा टन कांद्याचे 30 हजार रुपये झाले. उसाची नवीन जात असल्याने कारखान्याकडून प्रोत्साहनपर म्हणून बेणे मळा केल्याचे विजय यांनी सांगितले. आठ रुपये प्रति ऊस याप्रमाणे 20 हजार उसाची विक्री केली. या प्रयोगातून एक लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ऊस लागवडीस बियाणे, रासायनिक खते, लागवड व व्यवस्थापन आदींसाठी 35 हजार रुपये खर्च झाला.

"ऍग्रोवन' ठरला मार्गदर्शक गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आल्याचे दर घसरले आहेत. त्यातच मूळकूज रोगाला बळी पडून विजय यांच्या आले पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या पिकाला पर्याय शोधताना ऍग्रोवनमध्ये केळी पिकाची माहिती व यशोगाथा वाचण्यात आल्या. त्यानुसार सप्टेंबरच्या सुमारास (2010) गणपती सणाच्या मुहूर्तावर लागवडीचे नियोजन केले. 17 गुंठे क्षेत्रात चार ट्रेलर शेणखत टाकून ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उभी- आडवी नांगरट केली. लागवड करताना प्रत्येकी एक पोते निंबोळी पेंड, डीएपी व पोटॅश तर दोन किलो फोरेटचा वापर केला. लागवडीनंतर युरिया, 10ः26ः26 आदींचा पिकाच्या वाढीनुसार वापर केला. आवश्‍यकतेनुसार भांगलण व पाणी नियोजन केले. केळीच्या घडाचे सरासरी वजन 22 ते 25 किलो मिळाले. आतापर्यंत नऊ टन मालाची विक्री पुण्याच्या व्यापाऱ्यांना जागेवरच केली आहे. प्रति किलो साडेसात व आठ रुपये दर मिळाले. अजून सुमारे अडीच टन मालाची विक्री होणे अपेक्षित आहे. केळीसाठी सुमारे 26 हजार रुपये खर्च झाला आहे.

कुटुंबांची मोठी मदत वडील कानाने तर आई पायाने अपंग आहे. मात्र चुलत बंधू अविनाश यांच्यासह घरातील सर्व सदस्य विजय यांना शेतीत मदत करतात. पत्नी सौ. पूजा व भावजय आरती जनावरांचे व्यवस्थापन सांभाळतात. थोडी जमीन असली तरी योग्य नियोजन केल्यास शेतीतून चांगले उत्पादन मिळू शकते असे विजय म्हणतात.

विजय कदम, 9881065485

विजय यांच्या शेती नियोजनाची वैशिष्ट्ये - 1) घरखर्चासाठी दुग्ध व्यवसायावर भर दिला जातो. महिन्याला या व्यवसायातून सुमारे 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
2) शेतीतील विस्तारासाठी विविध पिकांच्या उत्पन्नातून भांडवल उभारले जाते. ऊस, सोयाबीन, आले ही पिके आर्थिक आधार देतात. केळीचे पीक सध्या तरी किफायतशीर वाटू लागले आहे.
3) येत्या काळात पॉलिहाऊस, त्यात जरबेरा घेण्याचे नियोजन आहे. पाचही एकरावर ठिबकचे नियोजन आहे.
4) प्रगती करताना एकदम गुंतवणूक न वाढवता म्हणजे जोखीम न घेता हळूहळू विस्तार करण्यावर भर
5) उसाची शेती सुमारे पंधरा वर्षांपासून होते. एकरी सरासरी 52 ते 55 टन उत्पादन मिळते. को 86032, फुले-265 यांसारख्या जातींची लागवड होते. आता जातीनिहाय एकरी 60 ते 70 टनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न विजय यांनी केला आहे.
6) उसाच्या आडसाली पद्धतीच्याच लागवडीवर आता भर, 20 गुंठ्यांत यंदाही बेणे प्लॉट

दुधाचे रतीब देतेय घरखर्चाचा पैसा शेतीपूरक म्हणून विजय दुग्ध व्यवसाय करतात. सध्या त्यांच्याकडे चार मुऱ्हा म्हशी आहेत. त्यातील दोन दुभत्या आहेत. त्यांच्यापासून दररोज 20 लिटर दूध मिळते. आपल्याकडील तसेच परिसरातील दूध संकलन करून गावाजवळील अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कॉलनीत विजय दुधाचे रतीब घालतात. आपल्या मोटर सायकलवरून दररोज 30 ते 35 लिटर दूध अशा रीतीने कॉलनीत घरोघरी पोचवले जाते. या दुधाला प्रति लिटर 30 ते 32 रुपये दर मिळतो.

No comments:

Post a Comment