Friday, 1 February 2013

अल्पभूधारक शेतकऱ्याने शोधला शेळीपालनातून रोजगार

चांगले शिक्षण घेऊनही नोकरीचा लाभ मिळाला नाही. त्यात शेती केवळ एक एकर. त्यातून समाधानकारक उत्पन्न घेणे व कुटुंबाची गुजराण करणे अवघड होते. तरीही हताश न होता वडप (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील श्रीराम महाजन या युवकाने शेळीपालनासारख्या शेतीपूरक व्यवसायातून नवी उभारी घेतली आहे.
विनोद इंगोले
 श्रीराम भीमराव महाजन यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सांगायची तर शेळी व जनावरांचे पालन करणाऱ्या गोपालक समाजात त्यांचा जन्म झाला. या समाजात शिक्षणाचे प्रमाण तसे कमी प्रमाणातच राहते. मात्र महाजन यांनी धाडसाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावतांड्यावरील एकमेव उच्चशिक्षित म्हणून श्रीराम यांच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलला. त्यामुळेच शेती किंवा तत्सम व्यवसायात रमण्याऐवजी आपल्या मुलाने शासकीय नोकरी करावी अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय करू लागले. त्यादृष्टीने नोकरीसाठी अर्ज भरण्याच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झाले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे नोकरी मिळवण्याचा हेतू साध्य होऊ शकला नाही. व्यवसाय सुरू करावा तर कुटुंबीयांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय नसताना हे धाडस कशाच्या बळावर करावे असा प्रश्‍न उपस्थित होत होता. कारण महाजन कुटुंबीयांकडे वडिलोपार्जित अवघी एक एकर शेती होती. त्यातील पिकाची उत्पादकता व उत्पन्नाच्या बळावर कुटुंबाची गुजराण शक्‍य नसल्याच्या जाणिवेतून पाच भावंडांपैकी चौघे मजुरी काम करत. परिणामी, श्रीराम यांनादेखील इतरांकडे मजुरी कामास जावे लागले. सर्व जण राबत असतानाच दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त इतर दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या पैशाची नेहमीच चणचण भासू लागली. या आर्थिक कुंचबणेवर मात कशी करावी या विवंचनेत हे कुटुंबीय होते.

...आणि पर्याय सापडला विदर्भात सर्वदूर मजुरांच्या उपलब्धतेच्या प्रश्‍न निर्माण झाला होता. शेतमजुरांना वाढती मागणी असल्याच्या संधीचा फायदा घेत शेतीकामासाठी मजूर पुरविण्याच्या कामात श्रीराम यांनी नशीब आजमावले. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग त्यांनी शेळीपालन व्यवसायासाठी करावयाचे ठरवले. सन 2011 वर्षाच्या अखेरीस त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणला. सुरवातीला अवघ्या सहा शेळ्यांची वाशीम बाजारपेठेतून प्रत्येकी तीस हजार रुपयांना खरेदी केली. सहा शेळ्यांच्या जोडीला पाच हजार रुपयांच्या बोकडाची खरेदीही वाशीम जिल्ह्यातील मालेगाव बाजारपेठेतून केली. या शेळ्यांच्या माध्यमातून पहिल्याच वर्षीच्या वेतातून प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा पिल्ले मिळाली. त्यातील पाच नर (बोकड) असल्याने सहा महिन्याच्या वाढीनंतर वाशीम बाजारात त्यांची विक्री प्रति नग 25 हजार रुपये याप्रमाणे केली.

...आणि हुरूप वाढला बोकडांच्या विक्रीतून चांगला पैसा मिळाल्याने याच व्यवसायात सातत्य ठेवण्याचा निर्णय घेतला. आता महाजन यांच्याकडे पाच शेळ्या आणि सात पिल्ले होती. त्यातील तीन शेळ्यांनी प्रत्येकी तीन तर नऊ शेळ्यांनी दोन-दोन पिल्ले दिली. याप्रमाणे शेळ्यांच्या प्रत्येक वेतातून मिळणाऱ्या बोकडांच्या विक्रीस सुरवात केली. प्रत्येकी 2500 रुपये याप्रमाणे 35 बोकड महाजन यांनी आजवर विकले आहेत. त्यातून सरासरी 87 हजार 500 रुपयांचे अर्थार्जन झाले आहे. त्यातून चारा, शेळ्यांवरील आरोग्यविषयक व इतर खर्च वार्षिक सरासरी 37 हजार रुपये अपेक्षित धरता साडे 50 हजार रुपयांचा फायदा या व्यवसायातून मिळाला. आजमितीस त्यांच्याकडे शेळ्या व पिल्ले यांची संख्या 25 वर पोचली असून, इतक्‍या अल्पसंख्येतील पशुधनही आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देईल असा त्यांना विश्‍वास आहे. त्यामुळे याच व्यवसायात अधिक पाय रोवण्याचा त्यांचा मानस आहे. शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम साहायक डॉ. डी. एल. रामटेके यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. दुधाळ जनावरांच्या शेतीशाळेसाठी डॉ. रामटेके वडप गावी आले होते. या शेतीशाळेला महाजन उपस्थित होते. यातूनच या दोघांचे ऋणानुबंध जुळले आणि पुढील काळात ते अधिक घट्ट झाले.

शेळ्या वाचल्याचे समाधान महाजन यांनी मुक्‍त शेळीपालनावर भर दिला आहे. त्यामुळे गोठा बांधण्याकामीच्या खर्चात बचत झाली आहे. जनावराचे आरोग्य जपण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करण्यावर त्यांचा भर असतो. सुरवातीला लसीकरणाविषयी माहिती नसल्याने एकदा त्यांच्याकडील शेळ्यांना रोगाने ग्रासले. शेळ्या दगावण्याची भीती असताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार केले. त्यासाठी तब्बल पाच हजार रुपयांचा खर्च झाला. मात्र वेळेत शेळ्या वाचून पुढील आर्थिक नुकसान टळले याचे समाधान मोठे होते, असे महाजन सांगतात. जनावरांचे आरोग्य ही जोखीम वगळता हा व्यवसाय फायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी तो केला पाहिजे, असे त्यांचे शेतकऱ्यांना सांगणे आहे.

पशुखाद्याचे व्यवस्थापन मुक्‍त पद्धतीचे शेळीपालन असल्याने शेळ्यांना गावठाणावर चराईसाठी नेण्यावर त्यांचा भर असतो. तरीही शेळीच्या प्रजननानंतर तिचे आरोग्य जपले जावे व तिने पिल्लांचे संगोपन योग्यप्रकारे करावे याकरिता पशुखाद्यही दिले जाते. प्रसूत शेळीला दररोज सकाळी व संध्याकाळी पावभर ते अर्धा किलो याप्रमाणे मका चुरी व ढेप दिली जाते. या नियोजनानुसार वर्षाकाठी एक क्‍विंटल मका चुरीची व दोन क्‍विंटल ढेपेची गरज त्यांना भासते. एक क्‍विंटल मका चुरी 1200 रुपयांना तर दोन क्‍विंटल ढेप तीन हजार रुपयांना मिळते. पशुखाद्यावरील हा तुटपुंजा खर्च वगळता इतर खर्च कमी असल्याचे महाजन म्हणाले. सध्या नऊ बोकड विक्रीसाठी तयार आले असून 35 हजार रुपयांना त्यांना मागणी आली आहे. मात्र त्यांची गुणवत्ता व व्यावसायिकता पाहता 50 हजार रुपयांपेक्षा कमी दरात त्यांची विक्री करणार नसल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञ सांगतात... गावरान जातीच्या या शेळ्या विदर्भातील स्थानिक ब्रीड म्हणून ओळखल्या जातात. दोन वर्षे कालावधीत त्यांच्यापासून तीन वेत मिळतात अशी माहिती करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम साहायक डॉ. डी. एल. रामटेके यांनी दिली. एका वेतात सरासरी दोन पिल्ले मिळतात. एखादवेळी एक पिल्लू मिळण्याची शक्‍यता राहते. घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदींसाठी प्रतिबंधक म्हणून वर्षातून तीन ते चार वेळा औषधे द्यावी. तसेच वेळोवेळी गोठ्याच्या स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

केवळ एक एकर शेतीत सोयाबीन, गहू यासारखी पिके घेऊन किफायतशीर शेती साधली जाणे अवघड होते. मात्र श्रीराम यांनी शेळीपालनातून शेतीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी मिळाली नाही, सैन्य भरतीतूनही श्रीराम डावलले गेले. मात्र हताश न होता शेळीपालनासारख्या व्यवसायातूनच नोकरीएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पैसा मिळवीत नोकरीच्या मागे असलेल्या युवकांसमोर निश्‍चितच नवा आशावाद निर्माण केला आहे.

- संपर्क- श्रीराम महाजन, 7350129381

No comments:

Post a Comment