Saturday, 9 February 2013

उसासाठी फवारा सिंचन पद्धती…

उसामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी रेनगनचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. या पद्धतीमध्ये पाणी व्यवस्थापन करताना ३२ ते ५५ मीटर अंतरावर शेतामध्ये ऍल्युमिनिअम किंवा एचडीपीई पाइपवर रेनगन (फवारा नोझल) बसवून हवेतून पाणी दाबाने फवारले जाते. या पद्धतीमुळे प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते आणि २५ ते ४० टक्के उत्पादनात वाढ होते.
उस
सुरू उसाची सिंचनाची गरज १६००
मिलिमीटर पाणी असताना पारंपरिक, सिंचन
पद्धतीने २५०० ते २७०० मिलिमीटर पाणी दिले जाते. फवारा सिंचन पद्धतीत पाणी हवेतून फवारून दिल्यामुळे सरीमधील पाचट कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
फवारा संच निवड
सिंचनासाठी उपलब्ध पाणी, मातीचा प्रकार, जमिनीची खोली, शक्‍य असेल तर जमिनीचा कंटूर नकाशा व जमिनीची कमीत कमी पाणी शोषणक्षमता, उपलब्ध ओलावा धरून ठेवण्याची क्षमता इ. माहिती मिळवावी. विहिरीतील सिंचनासाठी उपलब्ध पाणी मोजण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात पंपाचा पाणी प्रवाह दर (डिसचार्ज) मोजावा. आपल्याकडे उपलब्ध असणारा २०० लिटरचा ऑइलचा किंवा बॅरल घेऊन त्यामध्ये डिलिव्हरी पाइपला बांगडी पाइप जोडून २० लिटरचा ड्रम भरण्यास किती वेळ लागतो ते मनगटी घड्याळाने मोजावे. समजा २०० लिटरचा ड्रम भरण्यास ५० सेकंद लागले, तर पंपाचा डिसचार्ज लिटर प्रति सेकंद म्हणजे दर ताशी १४,४०० लिटर पाणी उपलब्ध असेल, जर उन्हाळ्यात पंप पाच तास चालत असेल, तर पाण्याची रोजची कमीत कमी उपलब्धता ७२,००० लिटर असेल. जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या उसाची मे महिन्यातील पाण्याची गरज जर आठ मिलिमीटर असेल आणि सिंचनाची कार्यक्षमता ८० टक्के गृहीत धरली तर एक हेक्‍टर क्षेत्रासाठी उसाची पाण्याची गरज खालीलप्रमाणे काढता येते :
उसाला पाण्याची गरज काढण्याचे सूत्र
पाण्याची गरज (लिटर) = ८ ु १०,००० / ०.८० = १,००,००० लिटर येते.
उपलब्ध पाण्यात ७२,०००/१,००,००० म्हणजे ०.७२ हेक्‍टर किंवा ७२ आर उसाच्या क्षेत्राची लागवड करता येईल.
उसासाठी  फवारा संच
उसासाठी फवारा संच
…अशी करा रेनगनची निवड
उसासाठी सध्या रेनगन फवारा संच वापरणे शेतकरी पसंत करतात. रेनगन फवारा संचामधील नोझलची निवड करताना त्याचे आकारमान (१२ ु ८, १४ ु ८, १६ ु ८, २० ु ८ मिलिमीटर), तो चालविण्यास आवश्‍यक प्रेशर (२, ३, ४ कि.ग्रॅ./ चौ.सें.मी.), भिजणारे क्षेत्र (२००० ते ४००० चौ. मी. जवळजवळ अर्धा ते एक एकर), पाण्याच्या झोताची लांबी (२२ ते ४० मीटर) आणि त्यानुसार दोन नोझलमधील व दोन लॅटरल पाइपमधील अंतर (३२ ते ५५ मीटर) ठरविता येते. यामध्ये एक रेनगनचा पाणी प्रवाहाचा दर १८० पासून ६०० लिटर प्रति मिनीट असतो, त्यानुसार पंपाच्या उपलब्ध पाणी प्रवाह दरानुसार एकावेळी किती रेनगन चालू शकतील ते ठरवावे लागते; तसेच जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा दर मातीच्या मूलभूत पाणीशोषण दरापेक्षा कमी असणारा आराखडा आणि नोझल निवडणे आवश्‍यक असते. त्यामुळे जमिनीवरून पाणी वाहून जात नाही, तसेच जमिनीवरील खतेदेखील वाहून जाऊ शकत नाहीत. हलकी, मध्यम व भारी जमिनीसाठी हा दर अनुक्रमे चार ते सहा, आठ ते १५ व २० ते ५० मिलिमीटर प्रति तास असतो. त्यापेक्षा कमी दराने पाणी फवारणारा संच निवडणे आवश्‍यक असते.
सिंचनाच्या पाण्याच्या प्रतीचा जमीन आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे, त्यामुळे समस्यायुक्त जमिनींच्या क्षेत्रात वाढ होऊन, शेतीच्या शाश्‍वत उत्पादकतेस धोका उत्पन्न झाला आहे. यासाठी पाण्याची प्रत आणि हे पाणी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचे आरोग्य यांची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
पिकांच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पिकांची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी दिले तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात एकवटतात. अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर केल्यास ते क्षार विरघळतात, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून कालांतराने पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करणे हितावह ठरते.
पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण, चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास आणि जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास सिंचनाच्या पाण्याची तपासणी करून घ्यावी.
परीक्षणासाठी पाण्याचा नमुना -
निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रातिनिधिक असावयास पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगले ढवळून घ्यावे. विहिरीवर पंप बसविलेला असेल तर तो साधारणपणे १५ ते २० मिनिटे सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावे. काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्यामध्ये साधारणतः एक लिटर पाणी भरावे. कूपनलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या साह्याने लहान बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घ्यावा. त्या बाटलीवर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्‍यात पाण्याबाबत शेतकऱ्यांचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत त्वरित पाठवावा.
क्षारयुक्त पाणी -
सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात. काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाण्याचे बाष्पीभवन होते; परंतु पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. शेवटी क्षारांचे प्रमाण खूप वाढून जमीन क्षारयुक्त बनते. याचा परिणाम कालांतराने पिकांवर दिसून येतो. पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी किंवा उशिरा होते. पिकांच्या तंतुमय मुळांची टोके मरतात व त्याचा अनिष्ट परिणाम पिकांवर दिसून येतो. जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होणे, क्‍लोराईड्‌स आणि सल्फेट्‌स यांचे प्रमाण वाढणे इत्यादी विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. पिके पाण्याची आणि अन्नद्रव्याचे शोषण करू शकत नाहीत.
क्षारयुक्त व विम्ल पाण्याचे व्यवस्थापन -
क्षारवट पाणी ओलितासाठी वापरावयाचे असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणे आवश्‍यक असते. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनीत क्षारवट पाण्याचे काहीही दुष्परिणाम न होता सिंचनासाठी वापरले जाऊ शकते; परंतु हे पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारवट व चोपण होतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देण्यापेक्षा फवारा पद्धतीने सिंचन केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून अशा पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो आणि जमिनी खारवट, चोपण होण्यापासून वाचविता येतात.
सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण -
प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे परीक्षण करताना आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्‍लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅशिअम या घटकांचे प्रमाण काढण्यात येते. शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरविताना पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, शोषित सोडिअम गुणोत्तर, क्‍लोराईड व बोरॉनचे प्रमाण, तसेच उर्वरित सोडिअम कार्बोनेटवरून वर्गवारी करून हे पाणी ओलितासाठी योग्य किंवा अयोग्य हे ठरविण्यात येते. पाण्यात विरघळणाऱ्या क्षारांच्या प्रमाणाचा विद्युतवाहकतेवर परिणाम होत असल्यामुळे पाण्याची विद्युतवाहकता मोजून क्षारांचे प्रमाण ठरवितात. विद्युतवाहकता जितकी जास्त तितके क्षारांचे प्रमाण जास्त असते. पाण्याच्या पृथक्करण अहवालावरून पाण्याची विद्युतवाहकता व अधिशोषित सोडिअम गुणोत्तराचा एकत्रित वापर करून पाण्याच्या वर्गीकरणानुसार पाण्याची प्रत ठरवून सिंचनासाठी शिफारस करण्यात येते.

No comments:

Post a Comment