Thursday, 21 February 2013

योग्य नियोजनातून साधली "चाईव्ज' भाजीची निर्यातक्षम शेती

हरितगृहामध्ये नावीन्यपूर्ण परदेशी भाजीची प्रायोगिक लागवड करत शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील गणपतराव पाटील यांनी त्याची निर्यात केली आहे. त्यासाठी आवश्‍यक "ग्लोबल गॅप'चे प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले आहे. बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजनावर विश्‍वास ठेवत चाईव्जसारखे नवे पीक प्रायोगिक तत्त्वावर लावण्याचे धाडस केले आहे. राजकुमार चौगुले
कोल्हापुरातील शिरोळ तालुका हा प्रामुख्याने उसाबरोबरच भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यातील अनेक गावे भाजीपाल्यामुळे ओळखली जातात. याच शिरोळ तालुक्‍यातील गणपतराव पाटील हे त्यांच्या शंभर एकर हरितगृह शेतीमुळे प्रसिद्ध आहेत. हरितगृहामध्ये नावीन्यपूर्ण पिकांच्या शोधात असलेल्या गणपतरावांनी चाईव्ज या परदेशी भाजीची लागवड केली आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन आणि निर्यात करत त्यातून चांगले अर्थार्जनही मिळवले आहे. त्यांच्याकडील हरितगृहामध्ये नियमित भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी "चाईव्ज' या परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेत यशस्वी करून दाखवले आहे. नेहमी फुलांच्या पॅकिंगमध्ये व्यस्त असणारे श्री. पाटील यांचे कामगार आता या फुलांबरोबर परदेशी भाजीपाल्याच्या व्यवस्थापनात गुंतले आहेत.

प्रवास भाजीकडे... गणपतराव पाटील यांच्याकडे शंभरहून अधिक एकर क्षेत्रावर हरितगृह आहेत. त्यामध्ये डच गुलाब व फुलांची शेती केली जाते. त्यांच्या हरितगृहातून दरवर्षी जगातील विविध बाजारपेठांत गुलाब निर्यात केले जातात. सातत्यपूर्ण दर्जा आणि नियमिततेमुळे त्यांनी परदेशातील बाजारपेठांमध्ये ब्रॅंड विकसित केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे हरितगृहात विविध फुलांच्या बरोबरीने भाज्यांचे उत्पादनही घेतले जात आहे.

गुजरातमधून मिळाली प्रेरणा गणपतराव पाटील हे ग्रीन हाउस व्यवसायाच्या निमित्ताने देशभर फिरत असतात. नावीन्यपूर्ण पिकांच्या शोधात असलेल्या गणपतराव यांना गुजरातमध्ये चाईव्ज या भाजीची माहिती मिळाली. ही भाजी करायचे ठरल्यावर त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. युरोपातून चांगली मागणी असल्याचे कळल्यानंतर धाडस करून एकदम अठरा एकर क्षेत्रावर लागवड करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधून या भाजीच्या बिया त्यांनी विकत घेतल्या. याचे बी जर्मन कंपनीचे असून, साडेपाच हजार रुपये किलो या दराने बीज खरेदी केले. वाफा पद्धतीने भाजीची लागवड केली असून, एकरी चार किलो बिया वापरल्या आहेत. जूनमध्ये रोपे तयार केली. ऑगस्टला लावण केली. नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू झाले.

खत व पाण्याचे व्यवस्थापन चाईव्ज भाजीची लागवड करताना एकरी चार टन गांडूळ खत वापरले. सुपर फॉस्फेट 300 किलो, डायअमोनिअम फॉस्फेट 100 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट 50 किलो, झिंक सल्फेट 25 किलो, फेरस सल्फेट 15 किलो, बोरॅक्‍स तीन किलो या प्रमाणे वापरले. आठवड्याला कॅल्शिअम नायट्रेट तीन किलो दिले. आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य 19: 19:19 एक किलो दिले. अमोनिअम सल्फेट सहा किलो, युरिया सहा किलो, म्युरेट पोटॅश सहा किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 500 ग्रॅम या प्रमाणे खताचे व्यवस्थापन केले. प्रत्येक दिवशी ठिबकद्वारे सोळा हजार लिटर पाणी दिले. या भाजीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो. तो रोखण्यासाठी एक दिवसाआड सेंद्रिय कीडनाशकांची फवारणी केली.

गणपतराव पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे... * सातत्याने नावीन्याचा ध्यास
* बाहेरील तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित करण्याचे प्रयत्न
* बाजारपेठेचा कायम अभ्यास
* हरितगृहातील पिकांतही नावीन्य ठेवण्याचा प्रयत्न
* ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर

अर्थशास्त्र (एकरी) * आतापर्यंत मिळालेले उत्पादन : सहा टन (6000 किलो) (सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत)
* आतापर्यंत मिळालेला सरासरी दर : 420 रुपये प्रति किलो.
* आतापर्यंत मिळालेले उत्पन्न : 25 लाख 20 हजार रुपये
* झालेला उत्पादन खर्च : 12 लाख रुपये
* बाजारपेठ : युरोपीय देश
- हे पीक आपल्याकडे नवीन असून, त्याची आर्थिकदृष्ट्या अधिक माहिती पिकाच्या अंतिम काढणीनंतरच उपलब्ध होऊ शकेल, असे मत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बाजारपेठेचा अभ्यास... - जूनला या भाजीपाल्याची लागवड केली. परंतु हे पीक रब्बी हंगामातील आहे.
- तसेच या भाजीची बाजारपेठ ही प्रामुख्याने थंड हवेचे देश आहेत. यानुसार बाजारपेठेची माहिती घेतली. सहा युरोपर्यंत (400 रुपये) भाव मिळाला. यात दहा ते वीस रुपये चढ-उतार होता. माल वेळेत जाण्यासाठी काटेकोर मेहनत घेतली.
- भाजीपाला थेट पाठविण्यापूर्वी गुजरातमधील हरितगृहातील परिस्थितीचाही अंदाज घेतला.

तोडणीपासून पाठवणीपर्यंत सर्वच हायटेक - साधारणतः आपल्या नियमित भाजीच्या उंचीएवढी भाजी तयार झाल्यानंतर त्याची सकाळच्या वेळी कापणी केली जाते.
- भाजी कापणीनंतर शीतगृहात अर्धा तास थंड केली जाते.
- शीतकरणानंतर भाजीचे ग्रेडिंग केले जाते. 20 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत वजन करून वर्गवारीनुसार त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात.
- या पेंढ्यांचा एक किलो वजनाचा बॉक्‍स तयार केला जातो.
- एका वेळी 560 किलो भाजी परदेशात पाठविण्यात येते. दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या कुलिंग व्हॅनमधून मुंबई विमानतळावर नेली जाते. तेथून वातानुकूलित विमानातून ती परदेशात पाठवली जाते.
- भाजी कापणीनंतर चार दिवसांत परदेशात पोचली पाहिजे, या बेताने सर्व नियोजन केले जाते.
- आठवड्यातून तीन वेळा भाजी पाठविली जाते.
- आठवड्यात दीड ते दोन टन भाजीची तोडणी केली जाते.
- सर्व माल परदेशातच विकला जातो. लंडन हॉलंड आणि जर्मनी या भागांत या भाजीची विक्री होते. स्थानिक ठिकाणी विक्री केली जात नाही.
- या भाजीला दिल्लीच्या ग्लोबल गॅप या संस्थेने प्रमाणितही केले आहे.

केवळ एकाच उत्पादनावर अवलंबून न राहता अन्य उत्पादने कमी खर्चात घेण्यासंदर्भात विचार करत असताना चाईव्ज या भाजीची ओळख झाली. हिवाळ्यात युरोपीय देशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने तिथे शेतीचे काम थंडावलेले असते. याच दरम्यान जर भाजीपाल्याचे उत्पादन केल्यास या भाजीला चांगली मागणी मिळते. फूल निर्यातीमुळे परदेशी बाजारपेठेशी सातत्यपूर्ण संबंध असल्याने विक्रीमध्ये अडचण आली नाही. आपल्याकडे इतर हरितगृहांमध्येही अशी भाजीपाल्याची लागवड करणे शक्‍य आहे.
- गणपतराव पाटील

"चाईव्ज"ची वैशिष्ट्ये - *कांदावर्गीय भाजीपाला
*कांद्याच्या वासाशी साधर्म्य
*विशेष करून युरोपीय देशात जास्त मागणी
*शरीरातील उष्णता वाढण्यासाठी या भाजीचा उपयोग
*सूप किंवा सॅलड म्हणून परदेशात लोकप्रिय
*एकरी सहा टनांपर्यंत उत्पादन शक्‍य
*एकदा कापणी केली की 28 दिवसांत पुन्हा कापणीला येते
*सहा महिन्यांत सहा वेळा कापणी होते.
*जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने पिकविण्याचा प्रयत्न.

संपर्क -02322-252181

No comments:

Post a Comment