Friday, 15 February 2013

संवेदनशील अवस्थेत द्या पिकांना पाणी

दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नियोजन खालीलप्रकारे करून आपले उत्पादन वाढविण्यासाठी व वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. एस. बी. पवार
1) रब्बी ज्वारी 1) पीक उगवणीनंतर 8-10 दिवसांनी पहिली विरळणी करून त्यानंतर 8-10 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी (हेक्‍टरी 1.20 ते 1.35 लाख झाडे).
2) कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर 3, 5 व 8 आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात. आवश्‍यकतेनुसार एक ते दोन निंदण्या केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीतील ओलावा टिकून राहील, तसेच तणाचा बंदोबस्त होईल.
3) रब्बी हंगामात जमिनीतील जवळपास 60 ते 70 टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके इ. चा वापर ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसांच्या आत आच्छादन म्हणून करावा.
4) शक्‍य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
5) संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकाच पाण्याची सोय असल्यास पीक 35-40 दिवसांचे असताना किंवा पीक पोटऱ्यात असताना पाणी द्यावे.
6) पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्‌टा पद्धतीने द्यावे.

2) करडई 1) पीक उगवणीनंतर 25-30 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर 20 से.मी. ठेवावे.
2) पीक उगवणीनंतर 25 - 30 आणि 45-50 दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात.
3) पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे.
4) सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळींनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून द्यावी. सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे.
5) सुरवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा.
6) पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात करडई भरण्याची) पाणी द्यावे.

3) गहू 1) गव्हाची एकेरी पेरणी करावी.
2) वेळेवर आंतरमशागतीमुळे तणाचा नायनाट होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
3) पेरणीनंतर 30-40 दिवसांच्या आत गरजेप्रमाणे एक-दोन वेळा खुरपणी करावी.
4) आच्छादनाचा वापर करावा.
5) कमी प्रमाणात ओलिताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्यांचे खालील प्रमाणे नियोजन करावे.

अ.क्र.--ओलिताची उपलब्धता --- पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)
1.-- एक ओलिताची सोय ---- 42
2. -- दोन ओलिताची सोय-- 21, 65
3. -- तीन ओलिताची सोय-- 21, 42, 65

6) पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

4) हरभरा 1) तीन आठवड्यांच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
2) जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो आणि एखादे पाणी देणे शक्‍य असल्यास पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
3) जिरायती हरभऱ्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशिअम नायट्रेट किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी 15 दिवसांनी फवारणी करावी.
4) तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

5) ऊस 1) हलक्‍या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते व जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचऱ्याद्वारे वाया जाते अशा जमिनीत सर्वसाधारण पाच हेक्‍टर सें.मी.पर्यंत पाणी द्यावे व दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
2) पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सऱ्यांमध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून द्यावा.
3) पाणी नेहमी एक आड एक सरीमध्ये द्यावे.
4) पट्‌टा पद्धतीने व जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करावी.
5) हेक्‍टरी 8-10 टन उसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळा अथवा पॉलिथिन शीटचा वापर करावा.
6) अति अवर्षण काळात पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाचे 10-12 दिवसांच्या अंतराने दोन-तीन फवारण्या कराव्यात.
7) पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा.
8) तणांचा बंदोबस्त करावा.
9) उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असेल तर अगोदर नोव्हेंबरपासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे व शक्‍य तेथे आंतरमशागत करावी. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेटचा 25 टक्के हप्ता अधिक द्यावा.

आपत्कालीन परिस्थितीतील ऊस व्यवस्थापन - ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी उसाला पाणी देताना एक आड एक सरीतून द्यावे.
- पाण्याच्या ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली, तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
- ठिबक अथवा तुषार सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
- को-86032, कोएम-0265, को-740, कोव्हीएसआय-9805 या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी या जातीचीच लागवड करावी.
- पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी (दिवसांनी) दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
- ऊस पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊसवाढीसाठी उपयुक्त ठरेल.
शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्‍टरी सहा टन पाचटाचे आच्छादन करून प्रतिटन पाचटासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सुपर फॉस्फेट व एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
- ऊस लागवड करताना ऊस रोपांचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची कमतरता भासली तरी रोपे तग धरून राहतील.
- खतांची शिफारशीत मात्रा देऊन 25 टक्के पालाश खत अधिक द्यावे. पालाश वनस्पतीच्या पर्णरंध्राची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवले जाते, तसेच मुक्त ----प्रोलीनचे प्रमाण वाढविण्यास मदत करते, त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते.
- लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी आणि दुसरी फवारणी तीन महिन्यांनी द्यावी.
- सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते, पीक अवर्षणास तोंड देते.
उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाण्याची प्रत्येक पाळी दोन-तीन दिवसांनी वाढवत न्यावी. त्यामुळे पिकाची पाण्याची ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढत जाते.
- उसाची लागण करताना बेणे दोन तास चुनखडीच्या पूर्ण विद्राव्य स्वरूपातील द्रावणात बुडवून मगच लावावे.

पाण्याच्या ताणाचे उसावरील परिणाम - पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
- मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळांद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते.
- पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्याची लांबी व उसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते.
उसातील तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते.
- सुरू आणि खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन तोडणीच्या वेळी गाळण्यालायक ऊस संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.
- पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्याची लांबी व जाडी कमी होते. उत्पादनात लक्षणीय घट होते. आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, कारण या काळात हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो.

हंगामनिहाय आपत्कालीन व्यवस्थापन सुरू हंगाम -
सुरू हंगाम लागवड सर्वत्रच सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन लागवडीच्या वेळी वरील प्रमाणे काळजी घ्यावी. त्यात पट्टा पद्धत, सहनशील जातींची निवड, रोपे किंवा बेणेप्रक्रिया, सेंद्रिय खताचा योग्य प्रकारे वापर करावा.

खोडवा -
राज्यात खोडव्याखाली 35 ते 40 टक्के क्षेत्र आहे. खोडवा उसासाठी आच्छादनासाठी पाचट उपलब्ध असते. त्याचा वापर केला पाहिजे. अन्य व्यवस्थापन वरीलप्रकारे करावे.

संपर्क - डॉ. सु. बा. पवार, 9422178982
(लेखक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment