Saturday, 9 February 2013

संरक्षीत पाणि नियोजनातू बहरला मळा

शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा काटकसरीने वापर करून शिवणे (जि. सोलापूर) येथील सुरेश गायकवाड यांनी आपल्या 110 एकर क्षेत्रापैकी सुमारे 50 एकर क्षेत्रावर फळबागांसह झेंडूची शेती फुलवली आहे. ऐन दुष्काळात बाग जोपासण्यासाठी या पाण्याचा चांगला उपयोग होऊ लागला आहे. शेततळ्यातील उपलब्ध पाण्यावर आणखी काही क्षेत्रावर फुलशेतीबरोबरच डाळिंब, द्राक्ष, कलिंगड, खरबूज फळपिकांचे क्षेत्र विस्तारण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. निव्वळ खडकाळ व माळरान जमिनीमध्ये मोठ्या जिद्दीने व कष्टाने हिरवाई बरोबरच चैतन्यही फुलवले आहे. भारत नागणे
सांगोला (जि. सोलापूर) हा कायम स्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. येथे प्रामुख्याने रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे येथील शेती पडीक बनली आहे. तालुक्‍यातील ज्या काही भागांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते त्या भागातही दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पाण्याअभावी व तेलकट डाग रोगामुळे येथील डाळिंबाच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जनावरांच्या चाऱ्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांची दररोजची वणवण सुरू आहे. शेतीसाठी पाणी मिळवणे ही बाब तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे.

दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढे शेती व्यवसाय वाचवणे अवघड झाले आहे. मात्र शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित पाण्याचा पर्याय शिवणे येथील सुरेश गायकवाड यांनी शोधला. त्यातून 230 फूट लांब व 180 फूट रुंद आणि 36 फूट खोलीचे शेततळे तयार केले आहे. यासाठी कृषी विभागाचे सहकार्य लाभले. या तळ्यामध्ये नोव्हेंबर 2012 अखेरपासून उपलब्ध पाणी साठवून ठेवले आहे. आजमितीस या शेततळ्यात सुमारे एक कोटी लिटरच्या आसपास संरक्षित पाणीसाठा आहे. या पाण्यावरच ठिबक सिंचनाच्या साहाय्याने केळी, द्राक्षे, झेंडू, खरबूज, कलिंगड आदींसह जवळपास 50 एकर क्षेत्रावर विविध पिके जोपासली जात आहेत.

खडकाळ माळरानावरती फुलवले नंदनवन शिवणे या कायम दुष्काळी असणाऱ्या गावामध्ये गायकवाड यांनी 2003 मध्ये मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरती धाडस करत दहा एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड केली. सांगोला तालुक्‍यातील ही प्रथमच द्राक्ष लागवड असावी. त्यांचा आदर्श घेऊन तालुक्‍यातील इतर शेतकरी आता द्राक्ष पीक घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. या वर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याची टंचाई आहे. तरीही शेततळ्यातील संरक्षित पाण्यामुळे दुष्काळातही द्राक्षापासून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

शेतीचा यशस्वी प्रयोग कमी कालावधीत व कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या फुलशेतीकडे गायकवाड यांनी लक्ष दिले आहे. सध्या त्यांनी नऊ एकर क्षेत्रावर झेंडूचे पीक घेतले आहे. झेंडूचा पहिला तोडा घेण्यात आला, त्यात एक टन फुले मिळाली. खडकाळ जमीन असूनही फुलशेती चांगलीच बहरली आहे. सुमारे नऊ एकर क्षेत्रावर प्रत्येकी चार फुटांचे बेड तयार करून त्यावर रोपे फुलवली आहेत. बुरशीजन्य रोग व नागअळी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी फवारण्या केल्या.

उन्हाळी फळ पिकांची लागवड उन्हाळ्यामध्ये कलिंगड आणि खरबूज फळांना नेहमीच मागणी असते. या पिकातूनही उत्पन्न चांगले मिळू शकते. बाजारपेठेचा आणि हंगामाचा विचार करून चार एकर क्षेत्रावर कलिंगड व पाच एकरावर खरबुजाची लागवड केली आहे. फळ पिकांचा अनुभव असल्याने दुष्काळातही उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून या पिकांतून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

मल्चिंगचा वापर ठरला वरदान जमिनीमध्ये ओलावा टिकून राहावा, त्याचबरोबर पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी नऊ एकर फुलशेतीसाठी आणि नऊ एकर फळ पिकांसाठी मल्चिंगचा वापर केला आहे. यासाठी मंडल कृषी अधिकारी श्‍यामराव रास्ते व कृषी सहायक अमित शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

बोर व विहिरीचे पुनर्भरण आले कामी सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्याकडील बोअर व विहिरीला काही प्रमाणात पाणी आहे. सर्वत्र कोरड्या विहिरी असतानाही त्यांच्या विहिरीत मात्र पाणी आहे ही समाधानाची बाब आहे या विषयी त्यांनी सांगितले, की दरवर्षी विहीर पुनर्भरण करतो. त्यामुळे उन्हाळ्यात चांगला फायदा होतो.

बंधाऱ्यामुळे भूजलपातळीत वाढ गायकवाड यांनी शेतात चार माती बंधारे तयार करून घेतले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात पाणी अडवले जाते. डिसेंबरअखेर तीन बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध होते. सध्या एका बंधाऱ्यात पाणीसाठा आहे. अशा प्रयत्नांतून भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे दिसून येते आहे.

गायकवाड यांच्या शेतीचे नियोजन दृष्टिक्षेपात... - मातीचे सुमारे पाच बंधारे बांधले असल्याने त्यात पावसाचे पाणी साठले. पाऊसही चार झाले. बंधाऱ्यातील हे पाणी शेततळ्यात घेतले.
- एक सिमेंटचा बंधारा आहे. त्यात साठलेले पाणीही शेततळ्यात घेतले.
- पॉली मल्चिंग केल्याने बाष्पीभवन कमी करणे शक्‍य झाले. शेतात ओलावा टिकवला.
- संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केल्याने पाण्याचा काटेकोर वापर केला आहे.
- पावसाचे किंवा अन्य कोणत्याही स्रोतांतून वाया जाणारे पाणी टिकवले.
- जवळच्या तलावातील गाळ काढून तो आपल्या कलिंगड, खरबुजासारख्या पिकांत वापरला.
- विहिरीलाही पाणी असल्याने त्याचा काटेकोर वापर सध्या सुरू आहे.
- तीव्र दुष्काळात शेततळ्यातील पाणी वापरले जाईल.

पिके दृष्टिक्षेपात... - द्राक्षांची काढणी झाली आहे. एकरी तीन टन उत्पादन मिळाले आहे. बेदाणा निर्मिती प्रक्रिया सुरू आहे.
- केळी- 20 टन विक्री झाली आहे. वीस टन माल विक्रीसाठी तयार आहे. मुंबई बाजारपेठेसाठी किलोला साडेसात रुपये, तर दिल्ली बाजारपेठेसाठी साडेआठ रुपये दर मिळाला आहे.
- झेंडूचे सुमारे 13 तोडे झाले आहेत. मुंबई बाजारपेठेत माल पाठवला. किलोला 20 ते 40 रुपयांपर्यंत दर मिळाला.
- कलिंगड व खरबूज आता वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र त्यांच्यापासून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

सुरेश गायकवाड, 9011348699
शिवणे, ता. सांगोला

2 comments:

  1. पॉली मल्चिंग म्हणजे काय?

    ReplyDelete
  2. पॉली मल्चिंग म्हणजे काय?

    ReplyDelete