Saturday, 9 February 2013

आंध्र प्रदेशातील सेंद्रिय गाव "एनाबावी'

आंध्र प्रदेशात वरंगळ जिल्ह्यात लिंगाला घानापूर मंडळामध्ये एनाबावी हे राज्यातील पहिले "सेंद्रिय गाव' म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात 52 शेतकरी कुटुंबे असून 104 हेक्‍टर शेती क्षेत्र आहे. 2001पर्यंत गावात रासायनिक खते- कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होता; मात्र लाल केसाळ अळीचा पिकावर झालेला उद्रेक व त्या अळीचे केवळ जैविक पद्धतीने झालेल्या नियंत्रणातून प्रेरणा घेऊन संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीकडे वळले आहे.
- दिलीपराव देशमुख बारडकर
एनाबावी गावात भात, तंबाखू, कापूस, कडधान्य, नागली, नाचणी, मिरची व भाजीपाला ही प्रमुख पिके आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या आहेत. त्यापासून मिळणाऱ्या शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खताचा वापर ते करतात. गावातील सर्व शेतकरी शेतीकामात एकमेकांस मदत करतात. गावात प्रवेशद्वार बोर्डावर "सदर गाव सेंद्रिय गाव आहे, आपले स्वागत असो!' यासह गावाची माहिती लिहिली आहे. गावात ठिकठिकाणी भिंतीवर सेंद्रिय शेतीची मार्गदर्शक तत्त्वे, जलसंवर्धन पद्धती, पर्यावरण रक्षण सूचना असे फलक लिहिले आहेत.

परिवर्तन कशामुळे? सन 2001पर्यंत एनाबावी गावातील सर्व शेतकरी प्रत्येक पिकास प्रचंड प्रमाणात रासायनिक खते व कीडनाशके वापरीत होते. एकाएकी लाल केसाळ अळीचा उद्रेक प्रचंड प्रमाणावर सर्व पिकावर झाला. कीड नियंत्रणासाठी प्रचंड पैसा खर्च करूनही किडीचे नियंत्रण झाले नाही. सेंटर फॉर रूरल ऑपरेशन्स ऍण्ड प्रोग्रॅम सोसायटी (CROPS) या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन जैविक पद्धतीने किडीवर नियंत्रण करून दाखविले. तेव्हा गावकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीवर विश्‍वास दाखवून मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली. सुरवातीला 52 पैकी दहा शेतकरी तयार झाले. 2006पासून हळूहळू संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली. यामध्ये श्री. पोन्ना मल्या व निवडक प्रगतिशील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. "सेंटर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर' (CSA), सेंटर फॉर वर्ल्ड सॉलिडॅरिटी (CWS) या संस्थांनी मार्गदर्शन केले. गावातील शेतकऱ्यांनी खालील नियमावली तयार केली आहे.
- सर्वांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे
- स्वतःचे बियाणे वापरले पाहिजे
- वनशेतीचा अवलंब केला पाहिजे
- प्रत्येकाकडे परसबाग असावी
- दुग्ध व्यवसाय हवा
- शेती खर्चाची तपशीलवार नोंद असावी
- शाश्‍वत शेती पद्धतीची माहिती इतर शेतकऱ्यांना द्यावी

सेंद्रिय लागवड पद्धती - बीज संस्कार - चांगल्या प्रतीचे बियाणे निवडून, मातीच्या भांड्यात ठेवून, त्यावर लाकडाची राख टाकून योग्य पद्धतीने साठवले जाते, त्यामुळे किडीपासून संरक्षण मिळते. गावातील 88 टक्के शेतकरी पेरणी वेळी बियाण्याला गाईचे शेण, गोमूत्र किंवा जीवामृत लावूनच पेरणी करतात.

पीक पोषण पद्धती - भात हे प्रमुख पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामांत घेतात. परिसरातील व सहज उपलब्ध होणारे सेंद्रिय खत शेतकरी वापरतात. शेतकरी भाताची रोपवाटिका करताना शेणखत 5000 किलो प्रति हेक्‍टर वापरतात. इतर शेतकरी कोंबडी खत, लेंडीखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत वापरतात. रोपे स्थलांतर करण्यापूर्वी शेतात तलावातील गाळाची माती 25 ट्रॅक्‍टर प्रति हेक्‍टर दर दोन ते तीन वर्षांनी टाकतात. 80 टक्के शेतकरी पूर्वमशागती वेळी शेतात 3.7 ते पाच टन शेणखत प्रति हेक्‍टरी टाकतात. नंतर दोन- तीन हप्त्यांत प्रत्येक वेळी पाच क्विंटल गांडूळ खत प्रति हेक्‍टरी देतात. उर्वरित 15 टक्के शेतकरी सरासरी 3.7 क्विंटल प्रति हेक्‍टर शेणखत, कोंबडी खत किंवा गांडूळ खत वापरतात. पीकवाढीसाठी शेतकरी गोमूत्र, पंचगव्याचा वापर करतात.

कीड- रोग व्यवस्थापन - भाताचे रोप तयार करताना वाफ्यात पाच किलो लिंबोळी पावडर वापरतात. शेतात भात लावणी झाल्यानंतर कीड व रोग व्यवस्थापनासाठी दशपर्णी, तंबाखू, लिंबोळी अर्क, लसूण- हिरवी मिरची अर्क, नीमतेल फवारले जाते. कामगंध सापळे, सापळा पीक, पक्षिथांबे, प्रकाश सापळे, चिकट सापळे वापरल्याने कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन होते. इतर पिकांसाठीसुद्धा तंबाखू अर्क, लिंबोळी अर्क वापरतात. सुरवातीच्या काळात नर्सरी ते पीक पक्व होईपर्यंत दर आठवड्याला फवारणी करावी लागे; परंतु आता केवळ नर्सरीत लिंबोळी अर्क वापरावा लागतो, कारण नैसर्गिक व्यवस्थापन होते.
उत्पादन -
सुरवातीची तीन वर्षे भाताचे निम्मेच उत्पादन मिळते. कापसाचेही 15 ते 17.5 क्विंटल प्रति हेक्‍टरऐवजी 12.5 ते 15 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळाले. सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर सुरवातीला 50 टक्के उत्पादन मिळाले; परंतु जसजशी जमिनीची उत्पादकता वाढत गेली, तसतसे उत्पादन घटण्याचे प्रमाण 10-12 टक्केवर झाले. शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी झाल्याने ते समाधानी आहेत. भविष्यात उत्पादन वाढविण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती, अवर्षण इत्यादी काळातही पीक तग धरते. भाजीपाला जास्त काळ ताजा राहतो.

सेंद्रिय शेतीमाल बाजारपेठ -शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत थोडा जादा भाव मिळत आहे; परंतु त्यांची मागणी आहे, की त्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ मिळावी, त्यासाठी शासनाने मदत करावी. नुकतेच नाबार्डने एनाबावी गावापासून सहा ते आठ किलोमीटर अंतरावर जनगाम खेडेगावात सेंद्रिय दुकान काढण्यास आर्थिक मदत केली आहे. उत्साहित शेतकऱ्यांना सेंद्रिय खताची मुबलकता, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
पुरस्कार -
केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कृषी विभाग, शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या गावाला भेटी देत आहेत. शेतकऱ्यांच्या कठोर प्ररिश्रमांसाठी सन 2010 मध्ये गावाला एक लक्ष रुपये देऊन "बाबा रामदेव ऍवॉर्ड' प्रदान करण्यात आला. हा निधी गावकऱ्यांनी विकासकामासाठी वापरला. महाराष्ट्र राज्यातही सेंद्रिय गाव निर्मिती करणे अवघड नाही. गरज आहे ती फक्त शेतकऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याची व मॉफसारख्या संस्थेची मदत घेण्याची!
मो. 9881497092
(लेखक "मॉफ'चे उपाध्यक्ष आहेत.)

No comments:

Post a Comment