Sunday, 24 February 2013

गोड्या पाण्यातील तलावामध्ये मांगूर संवर्धन

मांगूर मासा गोड्या पाण्यामध्ये विशेषतः दलदलीच्या भागामध्ये नैसर्गिकरीत्या आढळतो. हा मासा चविष्ट, काटे कमी असलेला व औषधी गुणधर्म असलेला मासा आहे. मांगूर संवर्धनासाठी लागणारा कालावधी कार्प संवर्धनाच्या तुलनेत कमी म्हणजे सहा महिने इतकाच आहे. सोमनाथ यादव, उमेश सूर्यवंशी
भारतामध्ये प्रामुख्याने कार्प (कटला, रोहू, मृगळ, इ.) या जातीच्या माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. एकूण मत्स्य उत्पादनापैकी 80 टक्के एवढे उत्पादन फक्त कार्प माशापासून मिळते. सुधारित पद्धतीने कोळंबी संवर्धनातून चांगला नफा मिळतो. परंतु वारंवार कोळंबीला होणारे रोग टाळण्याकरिता आलटून पालटून कोळंबी उत्पादन घेणे फायदेशीर ठरते. यासाठी तळ्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोळंबी संवर्धन करावे, दुसऱ्या टप्प्यात मत्स्यसंवर्धन करावे. यासाठी मांगूर व पंगस या जातीच्या माशांचे संवर्धन उपयोगी ठरते.

माशांचे संवर्धन - मांगूर संवर्धनासाठी लागणारा कालावधी कार्प संवर्धनाच्या तुलनेत कमी म्हणजे सहा महिने इतकाच आहे. भारतीय मांगूरची नैसर्गिक उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण म्हणजे आफ्रिकन मांगूरचा (Clarias garipenius) भारतामध्ये झालेला शिरकाव. आफ्रिकन मांगूर हा भारतीय मांगूरपेक्षा वेगाने वाढतो, विविध प्रकारचे अन्नग्रहण करतो.

नैसर्गिकरीत्या हा मासा मिश्र आहारी, निशाचर आहे. शाकाहारीसोबत हा मासा प्राणिजन्य पदार्थांचेदेखील सेवन करतो. पाण्याची कमी खोली (साधारणतः तीन ते चार फूट) व तळाला चिखल असलेली जागा मांगूरला आवडते. बहुतेक वेळा हा मासा तळ्यातील चिखलामध्ये लपून बसतो. अधून मधून पृष्ठभागावर प्राणवायू श्‍वसनासाठी येत असतो.

1) तलावाची पूर्व तयारी - या माशाचे संवर्धन करण्यासाठी तलावाचे क्षेत्रफळ साधारणतः 1000 चौ.मीटर व तलावाची खोली 1.5 ते दोन मीटर एवढी असावी. 1000 चौ. मीटर एवढी जागा उपलब्ध नसल्यास 500 ते 1000 चौ.मीटर एवढ्या आकाराचे तळेसुद्धा संवर्धनास सोईस्कर होऊ शकते.
प्रथमतः नवीन तलावातील मातीचा सामू नियंत्रित राखण्याकरिता तलावामध्ये शेतीचा चुना विस्कटून घ्यावा. चुन्याचे प्रमाण 200 किलो प्रति हेक्‍टर एवढे असावे. तलाव जर जुना असेल तर चुन्याचे प्रमाण 500 ते 750 कि. ग्रॅ. प्रति हेक्‍टर एवढे ठेवावे.
तळ्यात कुठले भगदाड वा तडे गेलेले नाही ना याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर चांगले गाळलेले पाणी 50 सें.मी. खोलीपर्यंत भरून घ्यावे. सविस्तर खात्री करून घेतल्यानंतरच तलावामध्ये शेणखत 5000 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टर किंवा कोंबडी खत 1000 कि.ग्रॅ. प्रति हेक्‍टर वापरावे. सोबत 150 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी तलावात मिसळावे. तलावामध्ये पाण्याची पातळी 0.75 ते एक मीटर एवढी असावी. पाण्यावरील बांधाचा भाग कमीत कमी तीन फूट एवढा असावा. जेणेकरून हा मासा पाण्याबाहेर पडणार नाही. चिखलाचा किंवा चिकण मातीचा तळ असलेला तलाव संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो.
हा मासा सवयीनुसार सतत पाण्याच्या पृष्ठभागावर हवेतील प्राणवायू घेण्यासाठी येत असतो. तेव्हा हा मासा इतर पक्ष्यांचे भक्ष्य बनू शकतो. म्हणून तळ्याच्या वरती पक्षी येऊ नयेत म्हणून जाळ्याचे संरक्षण देणे महत्त्वाचे असते.

2) तलावामध्ये बोटुकली संचयन - मांगूर या जातीच्या माशांच्या बोटुकलीचे आकारमान 7.5 सें.मी. लांब असावे. ऑक्‍टोबर महिन्यात या माशाचे संचयन करणे फायदेशीर ठरते. हा मासा पाच ते सहा महिन्यांत विक्रीयोग्य होतो. सर्वसाधारणपणे प्रति हेक्‍टरी 40 ते 50 हजार बोटुकली एवढी संचयन घनता ठेवली जाते.

3) खाद्य व्यवस्थापन - तलावाचे सर्व अर्थशास्त्र खाद्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. माशांच्या योग्य वाढीसाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेली स्वस्त मासळी 70 टक्के आणि भाताचा कोंडा 30 टक्के या प्रमाणात पुरवावा. पुढील महिन्यापासून भाताच्या कोंड्याची टक्केवारी वाढविली तरी चालते. मांगूर जातीच्या या माशाला तयार केलेले खाद्य त्याच्या शरीराच्या सरासरी वजनाच्या 10 टक्के, दुसऱ्या महिन्यात आठ ते पाच टक्के व तिसऱ्या महिन्यानंतर शेवटपर्यंत पाच ते तीन टक्के एवढे खाद्य पुरविले गेले पाहिजे.

4) जल व्यवस्थापन - माशाचे उत्पादन व माशांचा आजार हे दोन महत्त्वाचे घटक पाण्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतात. पाणी दूषित असल्यास व पाण्याचे व्यवस्थापन चांगले नसल्यास माशांमध्ये आजार दिसतात. त्याचा खूप मोठा परिणाम उत्पादनावरदेखील होऊ शकतो.
जसजसा संवर्धनाचा कालावधी वाढतो तसतसे स्वच्छ पाण्याचा दर्जा व पातळी व्यवस्थित ठेवावी. जसे संवर्धनास दोन महिने पूर्ण होतील व तिसऱ्या महिन्यास सुरवात झाली असेल, त्या वेळेस पंधरा दिवसांत एकदा किंवा एका महिन्यात 15 ते 20 टक्के एवढे पाणी बदलावे. त्यामुळे तळ्यामधील पाण्याची प्रत व्यवस्थित राहते.

5) मांगूर माशांचे उत्पादन - सहा महिन्यांमध्ये मांगूर 150 ते 200 ग्रॅ. पर्यंत विक्री योग्य होतो. मांगूर संवर्धनासाठी योग्य व्यवस्थापन केल्यास 70 ते 80 टक्के एवढे जिवंत मासे व सहा ते आठ टन उत्पादन प्रति हेक्‍टरी सहा महिन्यांच्या संवर्धन कालावधीत मिळू शकते. मासे पकडण्याकरिता मत्स्य तळे पूर्णपणे रिकामे करून पाणी ज्या ठिकाणाहून बाहेर सोडले जाते त्या ठिकाणी जाळे बांधून माशांना पकडावे. तलावाच्या तळाशी राहिलेले मासे हाताने पकडावे.

मांगूर माशाची वैशिष्ट्ये - 1) हा मासा गोड्या पाण्यामध्ये विशेषतः दलदलीच्या भागामध्ये नैसर्गिकरीत्या आढळतो.
2) हा मासा चविष्ट, काटे कमी असलेला व औषधी गुणधर्म असलेला मासा आहे.
3) या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतीलदेखील प्राणवायूचा श्‍वसनासाठी वापर करण्याची व काही काळ पाण्याबाहेर रेंगाळण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे.
4) पश्‍चिम बंगाल व त्रिपुरा या दोन राज्यांत मांगूर माशाला चांगली मागणी.
5) भारतीय मांगूर (Clarias batrachus) या जातीला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी व दरदेखील चांगला मिळतो.

वेगवेगळ्या संवर्धन पद्धती आणि मिळणारे उत्पादन - 1) संमिश्र मत्स्यजातीचे संवर्धन - चार ते सहा टन /हे /वर्ष.
2) सांडपाणी वापरात घेऊन केलेले मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन / हे / वर्ष.
3) पाणवनस्पती असलेल्या तलावामधील मत्स्यसंवर्धन- तीन ते चार टन/ हे/ वर्ष.
4) बायोगॅस द्रावणाचा वापर करून केलेले मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष.
5) एकात्मिक मत्स्यसंवर्धन- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष.
6) सुधारित पद्धतीने केले जाणारे मत्स्यसंवर्धन- 10 ते 15 टन/ हे/ वर्ष.
7) मोठ्या जलाशयात बांबू व जाळीचा वापर- तीन ते पाच टन/ हे/ वर्ष करून बंदिस्त जागेत केले जाणारे मत्स्यसंवर्धन.
8) पिंजरा संवर्धन- 10 ते 15 कि.ग्रॅ. /चौ.मी./ वर्ष.


संपर्क - उमेश सूर्यवंशी - 9096900489
(लेखक मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment