Saturday, 9 February 2013

मातीतील अन्नद्रव्यांचे साधू या संतुलन

सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, हाडांच्या आणि पेंडीच्या खतांचा समावेश होतो. या खतांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म प्रमाणात जस्त, लोह, तांबे, बोरॉन इत्यादी असतात. ही सर्व अन्नद्रव्ये कमी प्रमाणात आणि संयुक्त अवस्थेत असल्यामुळे त्यांची उपलब्धता सावकाशपणे सुरू होते.
सेंद्रिय खते संयुक्त अवस्थेत असताना जमिनीत सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते. सूक्ष्म जीवजंतूंमुळे सेंद्रिय द्रव्ये कुजण्याच्या क्रियेत गती येते, त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन उपयुक्त क्षार बाहेर पडतात; तसेच "ह्युमस'सारखे प्रभावी पदार्थ तयार होतात. ह्युमस जमिनीत पडलेला पालापाचोळा व प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार होतो. जमिनीतील सूक्ष्म कृमी- जंतू हे वनस्पती व प्राण्यांचे जमिनीत राहिलेले अवशेष यावर आपले पोषण करतात. हे पोषणकार्य करताना ते जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनास मदत करतात.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील जीवरसायन क्रियेचा संतुलितपणा टिकविला जातो. नत्र व स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. सेंद्रिय खतांमध्ये सूक्ष्म पोषक द्रव्ये देखील उपलब्धावस्थेत असल्यामुळे त्यांचा पुरवठा पिकांना होतो. व्यवस्थित व जास्त काळ कुजलेल्या खतांमध्ये जीवनसत्त्वांसारखे पिकांना पोषक ठरणारे पदार्थ असतात.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पालाश व चुन्यासारखी अन्नघटके देखील अधिक प्रमाणात उपलब्ध होतात. एकंदरीत सेंद्रिय खतांच्या वापराने जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जीवरासायनिक गुणधर्मांवर व पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेवर चांगले परिणाम होतात.

सेंद्रिय खतांचे खनिजीकरण सेंद्रिय खतांमधील अन्नद्रव्ये ही संयुक्त अवस्थेत असतात. जमिनीतील सूक्ष्मजीव या सेंद्रिय पदार्थांवर आपली उपजीविका करून सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय क्षारात रूपांतर करतात. या क्रियेस "खनिजीकरण' असे म्हणतात. या क्रियेत प्रथिनयुक्त व इतर संयुक्त नत्राचे रूपांतर प्रथम अमोनियात व नंतर नायट्रेट नत्रात होते. वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांच्या खनिजीकरणास कमी- अधिक अवधी लागतो.
शेणखताचे पूर्ण खनिजीकरण होण्यास चार ते पाच आठवडे लागतात, तर कंपोस्ट खताचे खनिजीकरण सहा ते सात आठवड्यांत पूर्ण होते; तसेच पेंडीच्या खतातील नत्राचे उपलब्ध नत्रात रूपांतर होण्यास सहा ते आठ आठवड्यांचा काळ लागतो.
सेंद्रिय खते पेरणीपूर्वी तीन ते चार आठवडे आधी देणे फायदेशीर ठरते. खत जर उत्तमपैकी कुजलेले असेल, तर हा कालावधी कमी करता येतो. साधारणतः शेतकरी उन्हाळ्यात शेणखत शेतामध्ये आणतात. हे शेणखताचे ढीग एक- दोन महिने शेतात तसेच पडून राहतात. या काळात खनिजीकरणाची क्रिया सारखी सुरूच असते, त्यामुळे उपलब्ध नत्र वायुरूपात हवेत निघून जाते आणि खतातील नत्राचे प्रमाण कमी होते. जीवरसायन क्रियांचा समतोल टिकत नाही, परिणाम विघटन व खनिजीकरणाच्या क्रियेवर होतो म्हणून सेंद्रिय खते योग्य वेळी देणे महत्त्वाचे आहे.
सेंद्रिय खते वापरताना त्यांचे शेतात ढीग न करता सर्व जमिनीवर पसरवून मातीत चांगल्या प्रकारे मिसळून द्यावीत. शेणखत शेतात पसरून दिल्यानंतर लवकरच हलका नांगर चालवावा, जेणेकरून खत व माती यांचे एकजीव मिश्रण तयार होईल. त्याहीपेक्षा उपयुक्त पद्धत म्हणजे सेंद्रिय खते पाभरीने पेरून द्यावीत.

जोरखतांचा वापर भात पेंडीचे खत, रक्ताचे खत, हाडांचे खत आणि मासळीचे खत ही खते या प्रकारात मोडतात. हाडांच्या खतात साधारणपणे नत्र चार टक्के, स्फुरद 2.1 टक्के व पालाश 3.5 टक्के असते. हाडांच्या खतांमधील स्फुरद व नत्र संयुक्त अवस्थेत असल्यामुळे ही अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होण्यास बराच वेळ लागतो म्हणून पेरणीपूर्वी हे खत एक ते दोन आठवडे अगोदर जमिनीत मिसळून द्यावे. या खतातील कणांचा आकार जेवढा लहान, तेवढा त्याचा चांगला परिणाम लवकर होतो; तसेच ते पृष्ठभागावर पसरवून देण्याऐवजी जमिनीत पेरणी पद्धतीने दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. सेंद्रिय खत प्रकारातील पेंडीच्या खतात नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण इतर सेंद्रिय खतांपेक्षा जास्त असते. यातील अन्नद्रव्ये हळुवारपणे उपलब्ध होत असल्यामुळे ती दीर्घ मुदतीच्या पिकांना वापरणे फायदेशीर असते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक कंपोस्ट व गांडूळ खत प्रक्रियेद्वारे वनस्पतीचा पालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा अन्नद्रव्यांसाठी पुर्नउपयोग करणे. नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे. माती परीक्षणावर आधारित संतुलित व शिफारस केलेली खत मात्रा देणे. हिरवळीची खते, निळे हिरवे शेवाळ आणि अझोलाचा पिकांसाठी उपयोग करणे. पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीमध्ये द्विदल वनस्पतींचा समावेश करणे. शेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून कंपोस्ट करून त्याचा वापर करणे. पीक अवशेषाचा (उसाचे पाचट, गव्हाचे काड, सरमाड इत्यादी) जागच्या जागी कुजवून पीक अन्नद्रव्यासाठी वापर करणे.
पीक अवशेष : उसाचे पाचट, गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, सूर्यफुलाची झाडे व बोंडे, तूरकाड्या, ज्वारीची गोठ्यातील शिल्लक चिपाडे, कडधान्यांचे अवशेष इत्यादी.

गवतांचा वापर : हरळी, लव्हाळा यांसारखी बहुवर्षीय गवते सोडून अन्य हंगामी गवते सेंद्रीय खत म्हणून शेतीत वापरता येतात. यासाठी फुले येण्यापूर्वी किंवा फुले आल्यानंतर ताबडतोब अशी गवते उपटून त्याचा शेतामध्ये सेंद्रीय खत म्हणून वापर करता येतो.
पीक पद्धती : पीक फेरपालटीमध्ये अथवा आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्यांचा वापर केल्यास रासायनिक नत्र खतामध्ये बचत करून अन्नधान्य

उत्पादनामध्ये वाढ करता येते. आजपर्यंत संशोधनाअंती केलेल्या काही शिफारशी उदाहरणादाखल खाली दिलेल्या आहेत - 1) पीक फेरपालट
हंगामातील फेरपालट - मूग/ उडीद/ सोयाबीन - रब्बी ज्वारी/ गहू/ मका, वार्षिक फेरपालट - तूर - रब्बी ज्वारी/ करडई
2) आंतरपिके
खरीप - सोयाबीन + खरीप ज्वारीउडीद + कापूस
तूर + बाजरी/ तूर + सूर्यफूल
रब्बी - ज्वारी + हरभराकरडई + हरभरा
वार्षिक - ऊस + भुईमूग/ चवळी/ सोयाबीन/ हरभरा/ वाटाणा/ मेथी/ गवार/ बटाटा

सेंद्रिय खतांमधील अन्नद्रव्यांची उपलब्धता सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, नागरी कंपोस्ट खत, हिरवळीची खते व सेंद्रिय द्रव्ये पुरविणारे पदार्थ या खतांमध्ये अन्नांशाचे प्रमाण इतर सेंद्रिय खतांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. या खतांतून प्रमुख पोषकद्रव्यांच्या व्यतिरिक्त किरकोळ पोषकद्रव्येही जमिनीस पुरविली जातात, याशिवाय ही खते जमिनीत कितीही प्रमाणात मिसळली तरी त्यांचा वाईट परिणाम होत नाही. शेणखतामध्ये नत्र 0.5 ते 1.0 टक्का, स्फुरद 0.5 ते 1.0 टक्का आणि पालाश 0.6 ते दोन टक्‍क्‍यांपर्यंत असते.

चांगले कुजलेले कंपोस्ट खत व शेणखत हे जवळजवळ सारख्याच दर्जाचे असतात. कंपोस्ट व शेणखतातील नत्राचे प्रमाण जवळपास सारखेच असते; परंतु शेणखतात स्फुरद आणि पालाश मात्र कंपोस्ट खतामध्ये जास्त प्रमाणात असते.

हिरवळीच्या खतापासून सेंद्रिय पदार्थांचा तसेच नत्राचा जमिनीस पुरवठा होतो. विशेषतः द्विदल पिके वातावरणातील नत्र शोषून घेऊन जमिनीस उपलब्ध करून देत असल्यामुळे ते पिकास फारच उपयुक्त ठरते. हिरवळीच्या खतांसाठी मुख्यतः बोरू, धैंचा, शेवरी, गवार इत्यादी पिकांची लागवड करावी.

No comments:

Post a Comment