Friday, 15 February 2013

केळी प्रक्रिया उद्योग फायद्याचा

केळीपासून गर, पावडर, प्युरी, वेफर्स, जॅम, टॉफी, केळी फीग इ. टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. यापासून शेतकरी आर्थिक लाभ मिळवू शकतात. पुढील लेखात आपण या प्रक्रिया पदार्थांची माहिती घेणार आहोत. प्रा. अमोल खापरे, डॉ. विजय तरडे
केळी गर/ पल्प (बनाना प्युरी) - केळीचा तयार केलेला गर अथवा साठवून ठेवलेला गर हा केळींपासून प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. जॅम, टॉफी, पावडर वा बिस्कीट तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतो. केळीपासून गर तयार करण्यासाठी चांगली पिकलेली केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. साल काढून पल्परच्या साहाय्याने या केळींचा गर तयार करावा. तयार गर 80 अंश से. तापमानास 10 ते 15 मिनिटे पाश्‍चराईज करून थंड करावा. या गरात 0.5 टक्के पेक्‍टिनेझ एन्झाईम मिसळावे. दुसऱ्या दिवशी हा गर निर्जंतुक काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा.

केळी पावडर (पीठ) - केळी पावडरचा वापर आइस्क्रीम, बेबी फूड्‌स, बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी होतो. ही पावडर तयार करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो.
पद्धत क्र. 1 - कच्ची केळी घेऊन त्यांची साल काढावी, त्यातील पांढऱ्या मगजाचे बारीक काप करून वाळवून घ्यावेत. वाळल्यानंतर ते काप ग्राइंडरमध्ये किंवा मिक्‍सरमध्ये बारीक करून त्यापासून पावडर तयार होते. केळीची साल काढल्यानंतर ती काळी पडतात, त्यामुळे प्रक्रियेसाठी स्टीलचेच साहित्य वापरावे व कापलेले काप पोटॅशिअम मेटाबायसल्फेटच्या द्रावणातून बुडवून काढून वाळवावेत.
पद्धत क्र. 2 - केळीचे पीठ तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीची पिकलेली केळी स्वच्छ पाण्याने धुऊन पल्परच्या साहाय्याने प्रथम गर तयार करावा. हा गर स्प्रे ड्रायरचा वापर करून त्यापासून पावडर तयार करावी.

केळी जॅम - केळीपासून जॅम तयार करताना त्यात कृत्रिम रंगाचा वापर करावा, जेणेकरून केळीपासून येणारा अनावश्‍यक काळा रंग जॅमला येणार नाही. जॅमसाठी प्रथम पूर्ण पिकलेल्या केळीची साले काढून त्यांचे बारीक काप करावेत अथवा केळीचा गर वापरावा. कापाच्या वजनाएवढीच साखर (1ः1) टाकावी. त्यात दोन टक्के सायट्रिक आम्ल टाकावे व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. शिजवताना मिश्रण सतत ढवळावे, नाही तर करपट वास येतो.
शेवटी जॅम तयार झाला की नाही हे ओळखण्यासाठी मिश्रणाचा एक थेंब हॅंड रिफ्रॅक्‍टोमीटरवर टाकून त्याची रीडिंग 68.5 अंश ब्रीक्‍स (साखरेचे प्रमाण) आली आहे का हे पाहावे, अथवा मिश्रण दोन बोटांमध्ये धरून ओढले असता तार दिसते का हे बघावे. जॅम तयार झाल्यानंतर तो निर्जंतुक काचेच्या बाटल्यांत भरावा.

केळी बिस्कीट - केळीपिठात 30 टक्के मैदा घालून, त्यात गरजेप्रमाणे साखर, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यांची कणीक तयार करावी. ही कणीक बिस्किटांच्या साच्यात टाकून बेकिंग ओव्हनमध्ये 105 अंश सेल्सिअसवर 10-15 मिनिटांकरिता ठेवावी. केळीपासून बनविलेली ही बिस्किटे अतिशय चविष्ट व पौष्टिक असतात.

केळी टॉफी - केळीपासून टॉफी तयार करण्यासाठी प्रथम चांगली पिकलेली केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांचे बारीक काप करावेत. कापांपासून गर तयार करून, एक किलो गरास एक किलो साखर, 20-25 ग्रॅम मक्‍याचे पीठ व 120 ग्रॅम वनस्पती तूप मिसळून ते मिश्रण चांगले शिजवावे. मिश्रण चांगले घट्ट व्हायला लागल्यानंतर त्यात दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. गॅसवरील मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर (शिऱ्याप्रमाणे तयार झाल्यावर) ते तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून एकसारखे पसरावे व थंड होऊ द्यावे. त्यानंतर स्टीलच्या चाकूने योग्य त्या आकाराचे तुकडे करून ते टॉफी पेपरमध्ये पॅक करावेत.

केळी चिप्स - केळीच्या चिप्सला बाजारात चांगली मागणी आहे. केळीचे चिप्स तयार करण्यासाठी कच्ची फळे निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढावी. चिप्स बनविण्याच्या यंत्राच्या साहाय्याने एक ते दोन मि.मी. जाडीच्या गोल चकत्या कराव्यात. या चकत्या 0.6 टक्के पोटॅशिअम मेटाबायसल्फेटच्या द्रावणात 10-15 मिनिटांसाठी बुडवून ठेवल्यानंतर त्या गोडेतेलात किंवा वनस्पती तुपात तळाव्यात. जास्तीचे तेल काढून चिप्सवर दोन टक्के मीठ लावावे. चिप्सचा कुरकुरीतपणा कायम ठेवण्यासाठी ते लगेच पॉलिथिन पिशव्यांत भरावेत. चिप्स पॅक करताना प्रथम त्यातील सर्व हवा काढून त्यात नायट्रोजन वायू भरल्यास चिप्सला तेलाचा कुबट वास न येता ते दीर्घकाळ टिकतात.

केळी फीग (केळीचे सुके अंजीर) - चांगल्या प्रतीच्या, मध्यम पिकलेल्या केळींची साल काढून ती एक टक्का पोटॅशिअम मेटाबायस्फेटच्या द्रावणात 10-15 मिनिटांसाठी बुडवून ठेवावीत. त्यानंतर या केळींच्या 3.5 ते 4.5 मि.मी. जाडीच्या चकत्या करून त्या वाळवणी यंत्रामध्ये (ड्रायरमध्ये) 50-55 अंश सेल्सिअस तापमानास 24 तासांकरिता ठेवाव्यात. चांगल्या वाळल्यानंतर यापासून केळी फीग तयार होतील.

केळी ज्यूस - पिकलेल्या केळीगरात पेक्‍टोलायटिक एन्झाईम मिसळावे. दोन दिवसांनंतर गर गाळून घ्यावा किंवा सेंट्रिफ्युगल मशिनच्या साहाय्याने ज्यूस वेगळा करावा. हा ज्यूस अडीचपट पाणी घालून पातळ करावा. रसाचा ब्रीक्‍स 16 टक्के व आम्लता 03. टक्के ठेवावी. तयार ज्यूस 80 अंश से. तापमानास 15 ते 20 मिनिटे पाश्‍चराईज करून काचेच्या निर्जंतुक बाटल्यांत भरावा.

फोटो - केळी ज्यूस
संपर्क : 02162 - 265227
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment