Saturday, 9 February 2013

योग्य पद्धतीने करा संत्रा, मोसंबी फळांची काढणी

काढणीपूर्व फळांचा रंग व आकार लक्षात घेऊन काढणी करावी. संत्रा फळांची काढणी एकदाच न करता तीन किंवा चार वेळा केल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होते. फळे झाडावर पूर्ण पक्व झाल्यावर म्हणजेच हिरवा रंग जाऊन पिवळा रंग यायला सुरवात झाली की काढणी करावी. डॉ. सुरेंद्र पाटील, प्रा. अरविंद सोनकांबळे
संत्रा, मोसंबी फळझाडांवर लागवडीच्या पाचव्या वर्षानंतर आर्थिकदृष्ट्या किफायतशीर फळधारणेस सुरवात होते. झाडाचे उत्पादन हे वाण, वय, व्यवस्थापन आणि खुंट यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते. काढणी व हाताळणी काळजीपूर्वक केल्याने फळांचे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. मृग बहराच्या फळांची तोडणी फेब्रुवारी- मार्च महिन्यात केली जाते. फळधारणेपासून काढणीसाठी फळे तयार होण्यास साधारणपणे 270 ते 280 दिवस लागतात. काढणीपूर्व फळांचा रंग व आकार लक्षात घेऊन काढणी करावी.

संत्रा फळांची काढणी एकदाच न करता तीन किंवा चार वेळा केल्याने नुकसानीचे प्रमाण बरेच कमी होते. बाजारातील आवक नियंत्रित करून भावही चांगला मिळतो आणि संत्राची प्रतही सुधारण्यास मदत होते.

तोडणीपूर्वी घ्यावयाची काळजी - संत्रावर्गीय फळे केळी व आंब्यासारखी झाडावरून तोडल्यानंतर पिकत नाही. म्हणून ती पिकेपर्यंत झाडावरच ठेवावी लागतात. परिपक्व होण्यापूर्वी फळे तोडल्यास रस कमी भरतो, साखरेचे प्रमाण कमी असते आणि ती आंबट असतात. फळे तोडताना इजा होऊ देऊ नये. जमिनीवर पडलेल्या फळांचे पॅकिंग करू नये. कारण वाहतुकीदरम्यान अशी फळे लवकर सडतात.

संत्रा, मोसंबी फळ काढणीचे निकष  -फळे झाडावर पूर्ण पक्व झाल्यावर म्हणजेच हिरवा रंग जाऊन पिवळा रंग यायला सुरवात झाली, की फळांची काढणी करावी. रंगावरून फळे काढण्याची पद्धत पूर्णपणे योग्य नाही. जवळपास पाऊण भाग पिवळ्या- नारिंगी रंगाचा झाल्यावर निवडक फळांची तोडणी करावी. मृग बहराच्या फळात एकूण द्राव्य घनपदार्थ (टीएसएस) आणि आम्ल यांचे गुणोत्तर 14 पेक्षा कमी नसावे. एकूण द्राव्य घन पदार्थाची मात्रा (टीएसएस) किमान 10 टक्के एवढी असावी. आम्लाचे प्रमाण संत्रामध्ये 0.70 टक्का तर मोसंबीमध्ये 0.30 ते टक्का असायला पाहिजे. अशा प्रमाणे एकूण द्राव्य घनपदार्थ व आम्ल यांचे किमान प्रमाण फळांमध्ये आढळून आल्यानंतर केवळ फळांच्या चांगल्या रंगासाठी तोडणीला उशीर करू नये, अन्यथा संत्रा फळाची साल ढिली (पोला) पडण्याची शक्‍यता असते.

...अशी करा फळांची तोडणी 1) प्रचलित पद्धतीत फळाला पीळ देऊन व ओढून फळे तोडली जातात. यामुळे देठाकडील भागाला इजा होऊन फळाला छिद्र पडते. त्यामुळे साठवणुकीमध्ये देठाकडील इजा झालेल्या सालीच्या भागात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढते. फळांचा दर्जा व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. झाडावरून फळे काढताना ती ओढून न घेता देठासह कापावीत. फळांची तोडणी करताना दोन मि.मी. एवढा देठ ठेवणे योग्य असते. याकरिता क्‍लिपरचा वापर करावा. क्‍लिपरने तोडणीचा वेग कमी असतो; परंतु सवयीने हे काम करता येते व फळेही नासत नाही.
2) दिवसभरात केव्हाही फळे काढता येतात. परंतु फळे उन्हात राहिल्यास फळांची साल करपून फळांचा दर्जा व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. फळे परिपक्व होताना गर्द हिरवा रंग जाऊन फिकट हिरवा अथवा फिक्कट नारिंगी रंग येतो. सुरवातीला घट्ट असलेली साल थोडी सैल होते. सालीवर चकाकी येऊन त्यावरील तेलग्रंथीचे ठिपके स्पष्ट दिसू लागतात.
3) फळे झाडावर जास्त दिवस ठेवल्यास फळांची साल ढिली (पोला) होते. म्हणून दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असल्यास फळे कमी पिवळी असताना तोडावी.
4) फळांना 1000 पीपीएम इथरेलच्या द्रावणात एक मिनिट बुडवून काढल्यास चार दिवसांत आकर्षक नारिंगी रंग येतो. तसेच फळे पक्व होताना 10 पीपीएम जिब्रेलिक ऍसिडचे द्रावण फवारल्यास फळांना नारिंगी रंग येतो. अशी फळे एक महिन्यापर्यंत उशिरा तोडता येतात.

फळांची हाताळणी - पिशवीत एकत्र केलेली फळे प्लॅस्टिकच्या हवेशीर अशा क्रेट्‌समध्ये भरून क्रेट्‌स सावलीत ठेवावेत. गवत जमिनीवर पसरवून त्यावर फळांचा ढीग करू नये. एका क्रेट्‌समध्ये 15 ते 17 किलो म्हणजे 100 ते 125 फळे बसतात. ट्रक किंवा बैलगाडीत गवत पसरवून त्यावर फळांचा ढीग करून वाहतूक केली जाते. या पद्धतीत वाहतूक स्वस्त जरी असली तरी 15 ते 20 टक्के फळांचे नुकसान होते.

फळांची विक्रीपूर्व प्रक्रिया - 1) तोडलेली फळे एका आठवड्यानंतर आकसतात आणि खराब होऊ लागतात. त्यामुळे अधिक तापमान असलेल्या हंगामात फळे साठविण्याची समस्या असते. मेणाच्या द्रावणात (सहा टक्के) फळे बुडवून काढल्यास व नंतर कोरूगेटेड कार्डबोर्ड किंवा फायबर बोर्डाच्या पेट्यांमध्ये भरून लांब पल्ल्याच्या बाजारपेठेत विक्रीस पाठविल्यास फळे खराब होण्याच्या प्रमाणात घट होते. अशी फळे शीतगृहात ठेवणे अधिक चांगले असते.
2) तोडणीनंतर संत्रा फळे कार्बेन्डाझिमच्या (एक ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणात तीन मिनिटे बुडवून ठेवावीत. यामुळे संत्रा फळांची कूज 70 टक्‍क्‍यांहून जास्त प्रमाणात टाळता येते. ही प्रक्रिया सामान्य वातावरणात फळ साठवणुकीसाठी तीन आठवड्यांपर्यंत परिणामकारक राहते.

फळांची प्रतवारी - फळांची प्रतवारी केल्यामुळे फळांचे पॅकिंग आणि विक्री करणे सुलभ होते. फळांची प्रतवारी आकारमानावरून करावी. याकरिता ग्रेडिंग प्रतवारी यंत्राचा वापर करावा. आकारमानानुसार नागपुरी संत्र्याची 90 टक्के फळांची प्रतवारी तीन प्रकारच्या ग्रेड्‌समध्ये करावी.

प्रत्येक प्रतवारीत उदा. जास्तीत जास्त (90 ते 95 टक्के) 7.50 ते 8.50 से.मी. व्यासाची फळे असावीत. एका ग्रेडमध्ये पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फळे लहान किंवा मोठ्या ग्रेडची नसावीत. अतिशय लहान (5.50 सें.मी. व्यासापेक्षा कमी) व मोठी (8.50 सें.मी.पेक्षा मोठी) फळे बाजारपेठ आणि साठवणुकीच्या दृष्टीने उपयोगी नसतात.

बुरशीनाशक व मेणाची प्रक्रिया - फळे साठवणुकीसाठी बांधणीपूर्वी 0.1 टक्का कार्बेन्डाझिमच्या द्रावणात (100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून) तीन मिनिटे बुडवावीत. फळे कोरडी (सावलीत) करून त्यावर सहा टक्के मेणाचे आवरण द्यावे. खराब, सडकी फळे बाजूला काढावीत. कोरूगेटेड कार्डबोर्ड किंवा फायबर बोर्डाच्या पेट्यात गुणवत्तेनुसार फळे ठेवावीत.

फळांचे पॅकिंग - प्रतवारी केलेली फळे कोरूगेटेड फायबर बोर्डच्या डब्यांमध्ये व्यवस्थित भरावी. पेटीच्या चारही पृष्ठभागाच्या चार ते पाच टक्के एवढी जागा हवेसाठी लांब आकाराचे छिद्र म्हणून ठेवावी. पेची युनिव्हर्सल किंवा टेलिस्कोपिक पद्धतीचे 90 टक्के आर्द्रता सहन करणारी, 16 ते 19 किलो प्रति वर्ग सेंटिमीटर बर्सटिंग शक्तीचे असावी. पेटीचा आकार आयात करणाऱ्या देशांनी ठरविल्याप्रमाणे असावा. देशांतर्गत बाजारासाठी 45.5 x 35 x 35 सेंटिमीटर अथवा 50 x 30 x 30 सेंटिमीटर अथवा योग्य आकाराच्या पेट्या निवडाव्यात. विविध रंगांत छपाई केलेले व मालाची प्रतवारी, संख्या, तारीख, पॅकिंग करणाऱ्याचे नाव, पत्ता इ. सर्व माहितीसह पेट्या बाजारात पाठवाव्यात. पॅकिंग करताना गवताचा वापर टाळावा.

फळांची साठवण - पूर्ण पक्व झालेली, परंतु हिरव्या रंगाची फळे शीतगृहात 11 ते 13 अंश सेल्सिअस तापमान व 85 ते 90 टक्के आर्द्रता असताना तीन ते चार आठवडे ठेवली असता फळांना चांगला नारिंगी रंग येतो. लांब अवधीच्या संत्रा फळांच्या साठवणुकीसाठी शीतगृहातील तापमान सहा ते सात अंश सेल्सिअस व आर्द्रता 90-95 टक्के असावी. शीतगृहातील आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी या पेट्यांना बाहेरून प्लॅस्टिकचे लॅमिनेशन असावे. कमी अवधीच्या (20 ते 25 दिवस) साठवणुकीसाठी पाण्याच्या बाष्पीभवनावर आधारित शीतगृहाची शिफारस केलेली आहे. यात एक ते टन एवढी फळे साठविता येतात.

ऍग्रोवन चौकट, ता. 7-2-2013 (केपी) फा.नं. - ए76518

ग्रेड (प्रत)आकारफळांचा व्यास
अ किंवा 1मोठा7.50 ते 8.50 से.मी.
ब किंवा 2मध्यम6.50 ते 7.49 से.मी.
क किंवा 3लहान5.5 ते 6.49 से.मी.

संपर्क - डॉ. पाटील - 9881735353
(लेखक उद्यानविद्या महाविद्यालय, अकोला येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment