Friday, 15 February 2013

नारळ सोडण भुशापासून तयार करा कंपोस्ट, गांडूळ खत

नारळाच्या सोडणापासून काथ्याची निर्मिती केली जाते, त्या वेळी काथ्याबरोबरच जो भुसा वेगळा केला जातो, त्याला क्वायरपीथ किंवा कोको पीट असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सोडणात 70 टक्के भुसा असतो. याचा उपयोग कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत तयार करण्यासाठी करता येतो. डॉ. दिलीप नागवेकर
नारळास फुलोरा येण्यास सुरवात झाल्यापासून नारळास दर महिन्याला एक पान आणि एक फुलोरा (पोय) येत असतो, हे त्याचे कार्य त्यांच्या अंतापर्यंत चालू राहते. पोयीत फळधारणा झाल्यापासून नारळ पक्व होण्यास 11 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो. ज्या वेळी नारळास अन्नद्रव्ये कमी जास्त होतात, त्यावेळी त्यांचा पोयीवर चांगला/वाईट परिणाम होत असतो. अन्नद्रव्ये कमी झाली तर पोय छोटी होते किंवा पोयीत फळांची गळ होऊन उत्पादन कमी होते. पोयीचा उगम ते पोय फुटणे हा कालावधी (गर्भधारण कालावधी) हा 32 ते 34 महिन्यांचा असतो. नारळास खताचे नियोजन करताना शेणखत, कंपोस्ट खत, नारळ झावळांचे गांडूळ खत, हिरवळीचे खत (धैंचा, ताग इ.) तसेच कुंपणाच्या कडेला गिरिपुष्प लागवड करून हिरवळीचे खत बागेत उपलब्ध करता येते. त्याचबरोबरीने आता नारळ सोडण्याच्या भुशापासून कंपोस्ट खत आणि गांडूळ खताची निर्मिती करता येते.

सोडणाचा भुसा - 1) अखंड पक्व नारळ वजनाच्या 35 ते 45 टक्के नारळ सोडण असते. नारळ पक्व होण्याच्या सुरवातीला सोडणाचे प्रमाण जास्त असते. तो जसजसा पक्व होत जातो तसतसे त्याचे सोडणाच्या वजनात घट होत असते.
2) नारळामध्ये फळात 50 ते 55 टक्के आणि 12 महिने वयाच्या पक्व फळात 35 ते 45 टक्के सोडण असते. नारळ पक्व होताना पाण्याचे प्रमाण घटते; परंतु सोडणाचे प्रमाण तेच राहात असते. या सोडणापासून काथ्याची निर्मिती केली जाते, त्या वेळी काथ्याबरोबरच जो भुसा वेगळा केला जातो, त्याला क्वायरपीथ किंवा कोको पीट म्हणतात.
3) सर्वसाधारणपणे सोडणात 70 टक्के भुसा असतो. याचा उपयोग खत म्हणून अगर माती सुस्थितीत ठेवणारा पदार्थ म्हणून केला जातो. यामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण कमी असते.
4) सोडणाचा भुसा हा सर्व प्रकारच्या जमिनीवर आच्छादन म्हणून वापरण्यासाठी उत्कृष्ट आहे. सोडणाचा भुसा वजनाच्या आठ पट पाणी धरून ठेवतो. यामध्ये अल्प प्रमाणात नत्र असते, तर मोठ्या प्रमाणात लिग्निन आणि फायटोटॉक्‍झिक पॉलिफिनॉल असतात.
5) हा भुसा अनेक वर्षे ऊन पावसात राहिल्यास त्यातील हानिकारक रसायने कमी होतात आणि ते शेतात वापरण्यास योग्य होते. ताज्या भुशाचे कर्बःनत्र गुणोत्तर हे 112ः1 असते. त्यामुळे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त सेंद्रिय किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारे सोडणाचा भुसा ताजा न वापरता त्याचे खत करून वापर करावे.

1) खत करण्याच्या पद्धती - अ) सोडण भुशापासून कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत -
1) ज्या ठिकाणी झाडांची सावली आहे अशी 5 मी. x 3 मी. जागेची निवड खतनिर्मितीसाठी करावी.
2) या जागेवर ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी छप्पर करावे.
3) खत तयार करण्यासाठी जमिनीवर 100 किलो सोडणाचा भुसा पसरावा.
4) सदर भुशावर 400 ग्रॅम अळंबी बी शिंपडावे.
5) त्यावर 100 किलो सोडणाचा भुसा पसरावा.
6) या थरावर एक किलो युरिया संपूर्ण सोडण्याच्या भुशावर पसरावा. परत 100 किलो सोडणाच्या भुशाचा थर व त्यावर 400 ग्रॅम अळंबी बी शिंपडावे. परत 100 किलो सोडण भुशाचा थर त्यावर 1 किलो युरिया पसरावा. असे एकावर एक थर द्यावेत.
7) यामुळे प्रत्येकी अळंबी बी आणि युरियाचे पाच थर होतील, तर भुशाचे 10 थर होतील. यासाठी 1000 किलो सोडण भुसा, पाच किलो युरिया आणि दोन किलो अळंबी बी लागेल.
8) योग्य प्रकारे ओलावा टिकविण्यासाठी दररोज त्यावर पाणी शिंपडून ते मिश्रण ओले ठेवावे.
9) अशाप्रकारे कंपोस्ट खत तयार होण्यास 25 दिवस लागतात.

) सोडण भुशापासून गांडूळ खत तयार करण्याची पद्धत - 1) सर्वप्रथम 1000 किलो सोडणाचा भुसा घेऊन त्यामध्ये 0.5 टक्का चुना आणि 0.5 टक्का रॉक फॉस्फेट मिसळावे.
2) असे हे मिश्रण तीन आठवडे तसेच ठेवावे आणि त्यामध्ये 50 टक्के ओलावा राहील असे पाहावे.
3) तीन आठवड्यांनंतर त्यामध्ये 10 टक्के शेणखत आणि 10 टक्के ताजे गांडूळ खत मिसळावे.
4) एकूण वजनाचे 20 टक्के पीडा काढलेल्या झावळा घ्याव्यात.
5) झावळ्या व वरील मिश्रणाचे एकावर एक थर द्यावेत.
6) प्रति टनास 1000 युड्रीलस जातीची गांडूळ सोडावेत.
7) जवळ जवळ दोन महिने या ढिगावर पाणी शिंपडत राहावे व ढीग ओलसर ठेवावेत. या कालावधीत गांडूळ खत तयार होईल.

कंपोस्ट आणि गांडूळ खताचे फायदे -1) याचा उत्तम खत म्हणून झाडांसाठी उपयोग होतो.
2) मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्य सुधारते.
3) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4) पिकाला द्यावयाच्या पाण्याच्या पाळ्यांतील अंतर कमी करता येते.
5) नैसर्गिक एन्झायम आणि फायटोहॉर्मोन्स यांची जमिनीत वाढ होते.
6) झाडांच्या मुळांची वाढ होऊन झाड सक्षम होते.
7) पिकांचे उत्पादनात वाढ होते.

संपर्क - डॉ.नागवेकर - 9421137769
(लेखक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment