Saturday, 9 February 2013

कोरडे कुटुंबीयांच्या जीवनात दरवळला समृद्धीचा गंध

लिली, कुंदा, गॅलार्डिया आदी फुलशेतीत तिसरी पिढी कार्यरत
पीक पद्धतीत केलेला फेरबदल विकासास कसा पूरक ठरतो याचे उत्तम उदाहरण अकोला जिल्ह्याच्या चांदूर (खडकी) येथील कोरडे कुटुंबीय ठरले आहे. कधीकाळी पारंपरिक पीक पद्धतीच्या फेऱ्यात अडकलेल्या या कुटुंबीयांनी विविध फुलपिकांच्या शेतीतून समृद्धीकडे केलेली वाटचाल निश्‍चितच दिशादर्शक आहे.
विनोद इंगोले
अकोल्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर चांदूर हे छोटे गाव आहे. मोर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील ग्रामस्थ शेतीकामी नदीतील पाण्याचा आवश्‍यक त्या वेळी उपयोग करतात. नदीकाठच्या शेतकऱ्यांचा भाजीपालावर्गीय पिके घेण्यावरही भर राहिला आहे. शहरापासून नजीक असल्याने भाजीपाला पिकांना बाजारपेठही येथील शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होते.

कोरडे कुटुंबीयांची शेती चांदूर (खडकी) येथील अनेक शेतकऱ्यांनी पीकपद्धत बदलाच्या माध्यमातून विकासास सुरवात केली. कोरडे कुटुंबीयांचा त्यात समावेश होतो. जेमतेम तीन एकर शेती असलेले हे सहा सदस्यांचे कुटुंब. अल्प शेतीतून उत्पादकता, उत्पन्न व दैनंदिन खर्चाचा ताळमेळ लागत नव्हता. सन 1978 मध्ये सीताराम कोरडे यांनी फुलशेतीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. वडिलांचा वारसा प्रल्हाद कोरडे यांनी पुढे चालविला. आज त्यांचे पुत्र अनिल यांच्या रूपाने तिसरी पिढी फुलशेतीच्या माध्यमातून संपन्नतेचा सुगंध सर्वदूर दरवळत आहे. सिंचनासाठी शेतात बोअरवेल असून दोन एकरावर ठिबक आहे. "आत्मा' योजनेअंतर्गत अनुदान आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार यांचा त्यात पुढाकार आहे. मालाची गुणवत्ता टिकविण्याकामी दररोज तोडणीच्या निमित्ताने होणाऱ्या निरीक्षणाचा फायदा होतो. अकोल्यातील एका कंपनीत दररोज फुले पाठविली जातात. कंपनीचे सुरेश फुलारी यांच्याकडूनही विक्रीविषयक मार्गदर्शन मिळते. फूल हा नाशवंत व अल्पायुषी घटक असल्याने त्यांच्या विक्री व्यवस्थापनावर लक्ष ठेवावे लागते. भांडवलाची तरतूद बॅंकेकडून मिळणाऱ्या पीककर्जाच्या माध्यमातून होते. अलाहाबाद बॅंकेच्या अकोला शाखेद्वारे दरवर्षी हंगामात 40 ते 45 हजार रुपये बिनव्याजी पीकर्जाची उचल होते. कर्ज रक्‍कम भरणा नियमित होतो. गॅलार्डिया, कुंदा, लिली यांसारख्या फुलांचे उत्पादन वर्षभर सुरू राहात असल्याने पैसा खेळता राहतो, असा कोरडे यांचा अनुभव आहे. व्यापाऱ्यांकडून फूल खरेदी झाली नाही असे घडले नाही. नफ्याचे मार्जिन वाढविण्यासाठी चांगल्या दर्जाची फुलेच बाजारात पाठविण्यावर भर दिला जातो.

फुलपिकाची सोबत तीन एकरांपैकी अर्धा एकरावर लिली, अर्धा एकरावर कुंदा, बाजारपेठ व हंगामाचा अंदाज घेत फुलपिके घेतली जातात. त्यानुसार एक एकरावर गॅलार्डिया असून पाऊण एकरावर नव्यानेही लागवड करण्यात आली आहे.

लिली फुलांचे व्यवस्थापन लिली कंदाची लागवड 2011-12 मध्ये केली. लागवडीवेळी शेणखत व सोबत बुरशीनाशकाची मात्रा दिली जाते. लागवडीनंतर दर 15 दिवसांनी 15-15-0, 23-23-0, 19-19-19, 12-61-0 आदी खते पिकाची गरज पाहून दिली जातात. पीक निरीक्षणाअंती रासायनिक कीडनाशकांची फवारणी होते. ह्यूमिक ऍसिडची मात्रा ठिबकद्वारे दिली जाते. लिली कंदाची लागवड केल्यानंतर साधारणतः वर्षभराने उत्पादन मिळण्यास सुरवात होते. 50 फुलांची एक गड्डी याप्रमाणे पाच गड्ड्यांच्या प्रति बंडलचा दर ठरतो. सण, उत्सव व लग्नसराईच्या काळात दरात तेजी राहत असल्याचा कोरडे यांचा अनुभव आहे. कमी मागणी असलेल्या काळात दहा ते 20 रुपयांचा दर मिळतो. तर मागणी जास्त असण्याच्या काळात 50 रुपयांचा दर लिली फुलांच्या प्रति बंडलला मिळतो. गावापासून काही अंतरावरील अकोला बाजारपेठेत फुलांची विक्री होते. अर्धा एकर क्षेत्रासाठी खत, कीडनाशक व फुलांच्या तोडणीकामी असली मजुरी यावर सरासरी पाच हजार रुपयांचा खर्च होतो. पीक लागवड वर्षभरापूर्वीची असल्याने पूर्ण क्षमतेने फुलांची उत्पादकता सद्यःस्थितीत मिळत नाही. परिणामी, अर्धा एकरावरील वार्षिक उत्पन्न खर्च वजा जाता 25 हजार रुपये आहे. सन 2014 वर्षापासून या फुलांची उत्पादकता वाढीस लागेल.

कुंदा फुलांची शेती महिलांच्या सौंदर्यात भर घालणारा गजरा. तो तयार करण्याकामी लागणाऱ्या कुंदा फुलांचे उत्पादन अनिल सन 2002 पासून घेतात. त्याकरिता लागणारी रोपे आजोबा (सीताराम कोरडे) यांच्या शेतातून आणली गेली. त्यांचे आजोबा पूर्वी कुंदा लागवड करीत होते. ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत कुंदाच्या फुलांचे उत्पादन मिळते. त्यानंतरच्या काळात फुलांचे उत्पादन कमी होत असल्याने मे महिन्यात पाण्याचा ताण देत झाडांची छाटणी केली जाते. 200 ते 250 ग्रॅम फुलांचे पॅकिंग करून त्याची अकोला बाजारात विक्री केली जाते. सण, उत्सव व लग्न हा गजऱ्याच्या फुलांचा वाढती मागणी असलेला काळ. या काळात पंधरा रुपयांपर्यंतचा दर 250 ग्रॅम फुलांना दर मिळतो. मागणी नसलेल्या काळात हीच फुले दहा रुपयांत विकावी लागतात. कुंदा फुलांच्या अर्धा एकरावरील व्यवस्थापन व मजुरीवरील वार्षिक खर्च 60 ते 65 हजार रुपये आहे. दररोज सरासरी 150 ते 275 पाकिटे विक्रीसाठी जातील एवढ्या फुलांचे संकलन होते. दहा रुपयांचा दर अपेक्षित धरल्यास वर्षाकाठी खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न ही पीकपद्धती देऊन जाते, असे ते सांगतात. मजुरीच्या दरात वाढीच्या परिणामी निव्वळ नफा नजीकच्या काळात कमी झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. सद्यःस्थितीत कुंदा फूल तोडणीकामी मजुरांना 100 रुपये रोज द्यावा लागतो. त्यामुळे मजुरांवर जादा विसंबून न राहता कोरडे कुटुंबातील सारे सदस्य शेतात राबतात. त्यामध्ये अनिल यांचे वडील प्रल्हाद, आई रमाबाई, भाऊ नीलेश यांचा समावेश आहे.

फुलशेतीत सातत्य समुद्धीचा सुगंध सतत दरवळत राहावा याकरिता अनिल यांचे आजोबा सीताराम कोरडे यांनी 1978 मध्येच या पिकाच्या लागवडीचे तंत्र-मंत्र आत्मसात केले. ही पीक पद्धती फायदेशीर असल्याच्या परिणामी आज कोरडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीनेही या पीक पद्धतीत सातत्य ठेवले आहे. पारंपरिक पिकाच्या तुलनेत ही फुलशेती या कुटुंबाला फायदेशीर ठरली आहे. विदर्भात नवा आशावाद निर्माण करायचा असेल तर शेतकऱ्यांनी बाजाराची मागणी लक्षात घेऊन पीकपद्धतीची निवड करण्याची गरज अनिल यांनी व्यक्त केली आहे.

संपर्क -
अनिल कोरडे, 9922808150

No comments:

Post a Comment