Saturday, 9 February 2013

पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा!

पालघर तालुक्‍यातील केळवे (जि. ठाणे) येथील गणेश पाटील यांनी शेडनेट व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्या जीवनात सुख- समाधानाचा पानमळा फुलवला आहे. सेंद्रिय पद्धतीच्या वापराने मालाची गुणवत्ता दर्जेदार मिळू लागली आहे. चोख व्यवस्थापनाची जोड दिल्याने पानमळ्याची शेती अन्य पिकांच्या तुलनेत पाटील यांना फायदेशीर वाटू लागली आहे.
मारुती कंदले
पालघर तालुक्‍यातील शेतकरी वर्षानुवर्षे खाऊच्या पानांची म्हणजे पानमळ्याची शेती करतात. येथील पानांना स्थानिक बाजारातून विशेष मागणी नसली तरी चवीला तिखट समजल्या जाणाऱ्या या पानांना उत्तर भारतातून मोठी मागणी असते. पानशेतीच्या पारंपरिक पद्धतीत बदल केला तरच बाजारपेठेचा लाभ घेता येईल हे पाटील यांनी जाणले. सुमारे अकरा गुंठ्यांतील पानमळ्याला शेडनेट आणि सेंद्रिय शेतीची जोड देत पानांचा दर्जा आणि उत्पादनातील सातत्य राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

लागवडीचे नियोजन - ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात पानमळा लागवडीची लगबग
- प्रथम नांगरणी करून सरी काढून घेतली जाते. दोन सरींतील अंतर साधारण अडीच फूट
-- तीन डोळ्यांचे रोप सहा इंच जमिनीत भात रोपाप्रमाणे लावले जाते. सरींच्या दुतर्फा पद्धतीने अकरा गुंठे क्षेत्रात सुमारे वीस हजार रोपे लावली जातात.
- पानवेलीच्या वाढीसाठी कार्वीच्या बारीक काठीचा आधार द्यावा लागतो. कार्वीची काठी दहा फूट उंच असते. शेतकरी शहापूर तालुक्‍यातून कार्वी आणतात. शेकडा 60 रुपये अशा दराने ती मिळते. एकदा वापरलेली कार्वी किमान तीन ते चार वर्षे टिकते.

पानांच्या जातींविषयी रोठा - लांबुळकी पाने, रोगाला किंवा प्रतिकूल परिस्थितीला काटक
बिबला - गोल- गरगरीत पाने, याला रोठाच्या तुलनेत 100 ते 150 रुपये भाव अधिक मिळतो;
मात्र रोगाला अधिक बळी पडते.
- दोन्ही जाती तिखट

सेंद्रिय खतांचे डोस पहिला - लागवडीआधी - 11 गुंठ्यासाठी - 20 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत
दुसरा - लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी - एरंड पेंड - सुमारे 100 ते 125 किलो
तिसरा - बीडी कंपोस्ट
हे खत तयार होण्यास दोन महिने लागतात, त्याची कृती अशी -
मळ्यात पूर्व- पश्‍चिम जागा पाण्याने भिजवून घेतली जाते. या जागेवर प्रथम हिरव्या पाल्याचा थर टाकला जातो, त्यावर बीडी कंपोस्टसाठी वापरले जाणारे एस-9 कल्चरचे 200 लिटर पाणी शिंपडले जाते. शेणाचा आणि कल्चरचा पुन्हा एकेक थर दिला जातो. हे मिश्रण भिजेपर्यंत त्यावर पाणी टाकले जाते. माती आणि शेणाने लिंपून घेतले जाते. पालापाचोळा व शेणखताचा वापर करून हे खत तयार होते.
चौथा - काढणी सुरू झाल्यानंतर सुमारे अडीचशे किलो एरंडी पेंडीचा वापर

किडी- रोग नियंत्रण 1) पानमळ्यात पावसाळ्यात मर रोग, तर उन्हाळ्यात मिली बगचा
प्रार्दुभाव होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. हे मिश्रण घरीच बनविले जाते. त्यावर साधारण पाचशे रुपये खर्च होतात. किडींच्या नियंत्रणासाठी फारशी कीडनाशके वापरावी लागलेली नाहीत.

बाजारपेठेनुसार पानवेलीचे हंगाम - हे पीक वर्षभर उत्पादन व उत्पन्न देते.
- वर्षभरात तीन विक्रीयोग्य हंगाम घेतले जातात. हंगामनिहाय उत्पादनात फरक होऊ शकतो.
- लागवडीनंतर तीन महिन्यांनी पाने मिळायला सुरवात होते. या काळात पानवेल अडीच मीटर उंच जाते. त्यानंतर वेल उतरणी केली जाते. प्रत्येक तीन महिन्यानंतर उतरणी करावी लागते.
- उतरणीनंतर पंधरा दिवसांनी पाने मिळायला सुरवात होते.
- शेडनेटमध्ये प्रति वेलीला वर्षभरात किमान साठ पाने मिळतात.

लिलाव पद्धतीने मार्केट - बाजारपेठ पाहून पानांची काढणी केली जाते. रोज सकाळी सात वाजता स्थानिक व्यापारी लिलावाद्वारे पानांची खरेदी करतात. पानांची वर्गवारी करून बाजारपेठेतील मागणी, आवक आणि पुरवठ्यानुसार दर ठरतो. थंडीच्या महिन्यांत पानांना सर्वाधिक दर मिळतो. मुंबई शहर जवळ असले तरी पानांना उत्तर प्रदेश हेच मार्केट आहे.
येथील व्यापारी तेथे हा माल विकतात.

सेंद्रियचा फायदा - पानमळ्याला केवळ सेंद्रिय खतांचा वापर केल्याचा उत्पादनात चांगला फायदा होत असल्याचे पाटील सांगतात. एरवी पानवेलीला वर्षभरात चाळीस ते पन्नास पाने मिळत होती. सेंद्रिय खतांच्या वापरानंतर हेच उत्पादन ऐंशी ते शंभर पानांवर पोचले आहे. एकदा केलेली लागवड किमान पाच वर्षे चांगले उत्पादन देत राहते. उत्पादनातील भरघोस वाढीशिवाय खतांवरील खर्चही टाळता आला आहे.

शेडनेटचा फायदा पानशेतीला कडक ऊन चालत नाही. शेडनेटच्या माध्यमातून तापमानावर नियंत्रण ठेवता येते. त्याचा फायदा उत्पादनात होतो. शेडनेटसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पन्नास टक्के अनुदान मिळते. शेडनेटच्या वापराने पानांना रंगही अपेक्षित गर्द हिरवा येतो; तसेच पाने गोल आणि मोठ्या आकाराची मिळतात. साहजिकच अशा पानांना दरही उच्चांकी मिळतो. थंडीच्या दिवसांत पानांची आवक कमी असते. अशा काळात या पानांचा दर हजारी दर दीड ते दोन हजार रुपयांच्या घरात जातो.

पानमळ्याचे अर्थकारण  पानवेलींची एक जुडी 50 रुपयांना मिळते. एका जुडीत सुमारे 52 ते 55 पानवेल असतात. साधारणपणे एक वेल एक रुपयास पडते. 11 गुंठ्यांत 23 हजार रोपे लागतात. बियाण्याचा खर्च 23 हजार रुपयांवर जातो. मशागतीसाठी साडेचार हजार रुपये खर्च येतो. दहा गाड्या शेणखतासाठी दोनशे रुपये गाडीप्रमाणे दोन हजार रुपये खर्च होतात. संपूर्ण पानमळ्याला ठिबकद्वारे पाणी दिले जाते. ठिबक संचासाठी 28 हजार रुपये खर्च आला. पानमळ्यात एक महिला मजूर कायम कार्यरत असते. तिला हजारी पानांमागे सोळा रुपये मजुरी दिली जाते. अकरा गुंठ्यांतील शेडनेटसाठी एक लाख साठ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी पन्नास टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते. शेडनेटसाठी लोखंडी बार वापरल्याने खर्चात बचत झाली आहे.

गेल्या तीन वर्षांतील दरातील तफावत - वर्ष ----------- कमाल --------- किमान ---------- सरासरी (दरहजारी पानांचा भाव)
2012-------1,500 रु.------750 रु.----------800 ते 900 रु.
2011-------1,200 रु.------650 ते 700 रु.-------800 रु.
2010-------1000 रु.-------650 रु.-----------800 रु.

अकरा गुंठे पानमळ्यातून सर्व खर्च वजा जाऊन वर्षाला एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते.

संपर्क  गणेश पाटील - 9225879256

पाटील यांच्या दृष्टीने पानवेलीचे पीक - जमिनीचा प्रकार पाण्याचा निचरा होणारा असावा, अन्यथा रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका. पाटील यांची जमीन वालुकामय
- बारमाही उत्पन्न देणारे पीक
- केवळ अकरा गुंठ्यांत म्हणजे कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न. केळी, आले यांसारखी पिके अशी कमी क्षेत्रात
लावता येत नाहीत व उत्पन्नही तसे देऊ शकत नाहीत.
- दोन वर्षांपासून पानवेलीत सेंद्रिय पद्धत व शेडनेट पद्धतीला सुरवात
- रासायनिक खतांच्या वापराने उत्पादन वाढते; मात्र पानांवरील ठिपके वा अन्य परिणामांस सामोरे जावे लागते.
- हे खादाड पीक आहे. खतांचे डोस चांगल्या प्रकारे व वाढीच्या अवस्थेनुसार द्यावे लागतात.No comments:

Post a Comment