Saturday, 9 February 2013

शेतीतील खर्चात बचत करण्यासाठी कुबडे यांची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल

काळाची गरज लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यातील सुधाकर कुबडे यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली आहे. रासायनिक खते, कीडनाशके यांच्या वाढलेल्या किमती, जमिनीची घटत चाललेली सुपीकता या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय शेती भविष्यात फायदेशीर ठरेल या आशेने कुबडे यांची वाटचाल आहे. विविध प्रकारचा भाजीपाला ते सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत. अद्याप सेंद्रिय म्हणून त्याला वेगळा दर नसला तरी येत्या काळात त्याला आश्‍वासक बाजारपेठ मिळेल असे कुबडे यांना वाटते. देवेंद्र वानखेडे
नैसर्गिक अडचणींना मात देत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांकडूनही सेंद्रिय शेतीमालाला मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील सेलू (पोस्ट कळंबी, ता. कळमेश्‍वर) येथील सुधाकर कुबडे यांनी काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने पावले टाकायला सुरवात केली आहे. आपल्या सात एकर शेतीचे व्यवस्थापन करताना शेतीतील खर्च कसा कमी करता येईल याचा विचार त्यांनी केला आहे. त्याबरोबर दररोज रोख रक्कम कशी हाती येईल हे देखील पाहिले आहे. कापूस, तूर, संत्रा यासोबत विविध भाजीपाला पिके ते घेतात.

कुबडे यांनी अलीकडेच म्हणजे सुमारे दीड वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. पूर्वी रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर करताना या निविष्ठांवर खूप खर्च करावा लागायचा. वर्षाला काही लाखांचा उत्पादन खर्च व्हायचा. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असे व्हायचे. हा ताळमेळ सुधारताना त्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला आहे. मजुरीशिवाय फारसा कुठला खर्च न करता त्यांनी शेतमालाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे.
पाण्याचे नियोजन सुधारताना मोठ्या प्रयासाने त्यांना 82 फुटांवर विहिरीला पाणी लागले.

सध्या पाण्याची अडचण त्यांना फारशी भेडसावत नाही. सेंद्रिय पद्धतीला सुरवात करताना परिसरातील सेंद्रिय जाणकार व्यक्तींसह कळमेश्‍वर तालुका कृषी अधिकारी हेमंत चव्हाण यांच्या संपर्कात ते आले. किफायतशीर सेंद्रिय पद्धत योग्य समजून घेऊन त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली.

संपूर्ण शेतीत एक किंवा दोनच प्रकार घेण्यापेक्षा लहान-लहान तुकड्यांत विविध भाजीपाला घेतल्यास रोजचे उत्पन्न हाती येईल या दृष्टीने पिकांचे नियोजन केले. यात वालाच्या शेंगा, कांदा, लसूण, चवळी, केळी (भाजीची), पालक, मिरची, शेंगावर्गीय भाजी यांचा समावेश केला. भाजीपाला व्यतिरिक्त तीन एकर क्षेत्रावर संत्र्याची बाग घेतली आहे. या बागेत मात्र अद्याप पूर्ण सेंद्रिय पद्धत वापरली जात नाही. तुरीचे पीकही त्यांनी घेतले आहे. याव्यतिरिक्त संत्रा कलमे तयार करून त्यांची विक्री केली जाते. आज ही रोपवाटिका चांगला आर्थिक लाभ मिळवून देत आहे. कुबडे यांच्याकडे दोन गाई आणि तीन बैल एवढाच व्याप आहे. सकाळी आणि रात्री प्रत्येकी 30 किलो शेण त्यांच्या सात एकराला पुरेसे असल्याचे ते सांगतात. शेणाचा उपयोग जिवामृत तयार करण्यासाठी होतो.

कुबडे यांच्या भाजीपाला शेतीविषयी सांगायचे तर सुमारे 10 ते 20 गुंठे अशा क्षेत्रावर मिरची, कांदा, पालक वगैरे पिके घेतली जातात. वर्षातले दोन हंगाम विविध भाजीपाल्यांसाठी वापरले जातात.

भाजीपाला पिकांत कोणतेही रासायनिक खत वापरले जात नाही. लागवडीपूर्वी निंबोळी पावडर एकरी चार बॅगा, गांडूळखतही एकरी चार बॅगा याप्रमाणे वापर केला जातो. या व्यतिरिक्त जिवामृत आणि दशपर्णी अर्क यांची फवारणी वेळोवेळी केली जाते. शेणखताचाही वापर होतो. ते घरचेच असते. गांडूळ खत प्रकल्पही त्यांच्याकडे आहे. कुठली कीड आली तर निंबोळी अर्काची फवारणी केली जाते.

विविध भाजीपाला स्वतंत्र किंवा मिश्रपद्धतीनेही घेतला जातो. कळमेश्‍वर बाजारात विक्री केली जाते. त्यांच्या चवळीला किलोला 10 रुपये, केळभाजीला किलोला 15 रुपये, पालकाला 20 ते 30 रुपये (किलोला), मिरचीलाही 10 रुपये असे दर मिळतात. पालकासारखी भाजी दोन हंगामांतही केली जाते.
गणपती, विजयादशमी या काळात या भाजीला चांगला दर मिळतो. दहा गुंठ्यांतील मिरचीने त्यांना एका हंगामात चार हजार रुपये, तर अल्प क्षेत्रात चवळीने दहा हजार रुपयांचे उत्पन्न दिले आहे. कुबडे यांनी पिकविलेल्या तुरीच्या शेंगांना चांगली मागणी असते.

त्यांनी भाजीपाला व्यतिरिक्त कापसाचेही सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन पाहिले आहे. या पद्धतीने एक एकर कपाशी घेऊन सात क्विंटल कापूस विकला आहे. या पिकात त्यांनी तुरीचे आंतरपीक घेतले होते. त्याचे सहा क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. मिश्र किंवा आंतरपीक स्वरूपात त्यांनी पीक पद्धती घेतल्याने आपल्या सात एकर जागेचा चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पत्नी सौ. वैशाली, मुलगा भूषण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शेतात राबतात.

रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावरील मोठ्या खर्चात बचत केल्याचे समाधान कुबडे यांना आहे. खर्च येतो तो बहुतांशी मजुरीवरच. सतत भाजीपाला उत्पादनाचा पॅटर्न सुरू असल्याने वर्षभर मजूर ठेवावेच लागतात. एका वर्षाचा मजुरी खर्च सुमारे दीड लाख रुपये येतो. वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना सेंद्रिय शेतीतून मिळते आहे. संत्रा रोपवाटिकेतून वर्षाला सुमारे लाख ते सव्वा लाख रुपये मिळतात. कांद्याची लागवड करताना कुबडे थोड्या क्षेत्रात आपल्या गरजेपुरते कांदा बीजोत्पादनही घेतात. काही बियाणे अन्य शेतकऱ्यांना दिले जाते. पाणी व्यवस्थापन अद्याप दांड पद्धतीनेच दिले जातात. बीजोत्पादनासाठी स्प्रिंकलरचा (तुषार सिंचन) वापरही त्यांनी केला आहे.

सेंद्रिय मालाच्या बाजारपेठेसाठी... कुबडे यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात तर केली आहे. मात्र सेंद्रिय पद्धतीच्या मालाला अधिक दर मिळाला पाहिजे, असे कुबडे यांचे म्हणणे आहे. सध्या तसा तो मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अर्थात आपण सेंद्रिय पद्धत सुरू केल्याने निविष्ठांवरील खर्चात तर बचत केली, मालाची गुणवत्ताही पुढे वाढणार आहे व त्याचा फायदा शेतकरी व ग्राहक अशा दोघांनाही होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सेंद्रिय मालाला चांगला भाव मिळावा यासाठी नैसर्गिक शेतीमाल उत्पादक संघ पुढे सरसावला आहे. शहरात या शेतीमालाला चांगली मागणी आहे. या संस्थेने मालाची संपूर्ण माहिती देणारे स्टिकर आणि पॅकिंग तयार केले आहे. कुबडे यांना ही संस्था हे पॅकिंग पुरविते. अर्धा ते एक किलो अशा पॅकिंगमध्ये हा शेतीमाल ही संस्था खरेदी करते. बाजारात जो दर कुबडे यांना मिळतो तोच दर ही संस्था देते. शहरात आणलेला माल ही संस्था मागणीनुसार शहरातील बाजारभावाप्रमाणे विकते. कुबडे यांच्यासारखे जवळपास 100 शेतकरी कळमेश्‍वर तालुक्‍यात तयार करण्याचा मानस संस्थेचा आहे. सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ मिळावी हा त्यामागचा हेतू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष साहेबराव धोटे यांचे म्हणणे आहे.

सुधाकर मधुकरराव कुबडे, 9764508015
साहेबराव शंकरराव धोटे, 9326893219
जिल्हा नैसर्गिक शेतीमाल उत्पादक संस्था

1 comment: