Saturday, 9 February 2013

मार्केटनुसार दिला दुग्ध व्यवसायाला आकार

खेर्डी (जि.रत्नागिरी) येथील युवा शेतकरी मिलिंद खानविलकर यांनी नोकरीच्या मागे न लागता दापोली शहरातील दुधाची मागणी लक्षात घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. एम.एस्सी (कृषी) पदवीधर असल्याने शिक्षणाचा उपयोग करीत सुधारित पद्धतीने गाईंचे व्यवस्थापन करताना दूध विक्रीचे गणितही त्यांनी जमवल्याने या व्यवसायात चांगली आगेकूच करणे त्यांना शक्‍य झाले आहे.  राजगोपाल मयेकर
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच स्वतःची शेती आणि पूरक व्यवसायाचे गणित खेर्डी (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील मिलिंद खानविलकर यांच्या डोक्‍यात होते. घरची शेती नाही. वडील डायमेकर कारखान्यात (रंगद्रव्ये संबंधित) नोकरीला, त्यामुळे कृषी पदवीचे शिक्षण स्वतःच्या कमाईतून त्यांनी पूर्ण केले. सन 1998 मध्ये बीएस्सी (वनशास्त्र) पदवी पूर्ण होईपर्यंत चार वर्षे संतोष विचारे यांच्याकडे ठिबक सिंचन जोडणीची कामे केली. यातून ठिबक सिंचन, फळबाग लागवड, नियोजन असा प्रत्यक्ष अनुभव मिळत गेला. जमलेले पैसे आणि हा अनुभव लक्षात घेऊन विद्यापीठाची एमएस्सी (वनस्पतिशास्त्र) पदवीही घेतली. त्यानंतर दापोली परिसरात कृषी सल्लागाराचे काम सुरू केले. मात्र जमीन मालक कंत्राट काढून घेईल ही टांगती तलवार होती. त्यामुळे शाश्‍वतीच्या दृष्टीने स्वतःचीच शेती असावी व त्यात काही करावे यादृष्टीने नियोजन सुरू होते. दापोली शहरातील दुधाची बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनी पशुपालनाचा निर्णय घेतला. मार्च 2004 मध्ये जातिवंत जर्सी गाय घेतली. सासरे अशोक केळकर यांचे मार्गदर्शन मिळू लागले. जर्सी गाईचे खाद्य व्यवस्थापन, आरोग्याची काळजी आणि दररोज मिळणारे 18 लिटर दुधाचे उत्पादन याचे गणित जमल्यावर वर्षभरातच आणखी एक जर्सी गाय घेतली. शेतीसारख्या व्यवसायात गुंतवणुकीवरील पैसे परत मिळण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. दुग्ध व्यवसायात मात्र दुधाळ जनावर घेतल्यानंतर कमी कालावधीत काहीतरी मिळकत सुरू होते हे खानविलकरांच्या लक्षात येत गेले. प्रयोगशील शेतकरी विनायक महाजन यांचेही मार्गदर्शन मिळाले.

व्यवसायाचे नियोजन - 1) खानविलकर म्हणाले, की गाईंचे योग्य व्यवस्थापन, दर्जेदार दूध उत्पादनामुळे दापोली शहरात दुधाची मागणी वाढत होती. याच वेळी म्हशीच्या दुधाची मागणी वाढू लागली. त्यामुळे चार जाफराबादी म्हशी घेण्याचा निर्णय घेतला. पैसे कमी पडत होते, कर्ज मिळत नव्हतं, तेव्हा सोनं गहाण ठेवून दुग्ध व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. म्हशींचं दूध ग्राहकांपर्यंत जाऊ लागलं. पण म्हशींची किंमत, देखभाल, खाण्यावरचा खर्च आणि मिळणारे दूध उत्पादन याचे गणित जमेना. तसेच म्हशींचे माजावर येणे, त्यांची प्रसूती या गोष्टी गुंतागुंतीच्या ठरू लागल्या.

2) त्यामुळे 2007 मध्ये म्हशी कमी करून गाईंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. घर आणि जनावरांचा गोठा बांधणीच्या दृष्टीने दापोली शहरापासून चार किलोमीटरवर खेर्डी येथे सात एकर जमीन घेऊन घराच्या बरोबरीने 20 जनावरे बांधता येतील असा सुधारित पद्धतीचा गोठा बांधला.

3) ...असा आहे गोठा 1) सध्या सहा जर्सी आणि चार गावठी गाई, तीन पाड्या, दोन पाडे आणि एक वळू आहे.
1) गाईंना योग्य प्रकारे चारा, खाद्य खाता येईल अशी गव्हाण
2) "शेपटीकडे शेपटी' (टेल टू टेल) पद्धतीने गाई गोठ्यात बांधण्याची रचना
3) गोठ्यातील जमीन चिऱ्याची. त्यामुळे गाईंचा पाय घसरत नाही.
4) मोठ्या खिडक्‍या. त्यामुळे गोठा हवेशीर.
5) गोमूत्र वाहून जाण्यासाठी नाली.
6) गोठ्यात गाईंसाठी संगीत लावले जाते. त्याचा दूध उत्पादनावर काही परिणाम होतो का त्याचा अभ्यास सुरू आहे.
7) स्वतःच गाईंचे व्यवस्थापन करत असल्याने त्यांच्या आजारपणाची लक्षणे लगेच कळतात, उपचार करणे सोपे जाते.
8) घराजवळच साडेपाच एकर रान मोकळे असल्याने गाईंना चरायला नेण्यासाठीचा प्रश्‍न सुटला.
9) हवेशीर गोठा, पुरेशा चाऱ्याची उपलब्धता यामुळे गाईंचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे सोपे. साहजिकच गाईंचे आरोग्य चांगले राहू लागले आहे.
10) नैसर्गिक रेतनासाठी जर्सी वळूचे संवर्धन.
11) डॉ. मोहन शिगवण आणि डॉ. कुमार बर्वे या पशुवैद्यकांचा सल्ला मोलाचा ठरला आहे. त्यातून गाईंचे आरोग्य व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन केल्याने दुधात सातत्य.

दैनंदिन नियोजन - 1) सरासरी दिवसाला दहा गाईंना वाळलेल्या गवताच्या बरोबरीने सहा किलो कडबा कुट्टी, सहा सरकी पेंड आणि सहा किलो भुशीचे आंबोण सकाळ- संध्याकाळ विभागून दिले जाते.
2) गाईने आंबोण खाऊन झाल्यानंतर सहापर्यंत दूध काढले जाते.
3) त्यानंतर सकाळी सात ते अकरा या वेळेत खानविलकर घराजवळील आपल्या साडेपाच एकरात गाईंना चरण्यासाठी नेतात. त्यामुळे गाईंना चांगला व्यायाम मिळतो. गाई माजावर लवकर येऊन गाभण राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
4) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास दूध काढणी.
5) सध्या पाच गाई दुभत्या, तीन गाभण.
6) दिवसाला प्रति जर्सी गाय 15 लिटर, तर गावठी गाय सहा लिटर दूध देते. गाभण काळात गाईंवर दुधाचा कमी ताण दिल्यास पुढच्या वेतानंतर दुधाचे प्रमाण आधीप्रमाणेच टिकून राहते असा अनुभव.

दुधाची विक्री रोजचे 25 लिटर दूध विक्रीचे नियोजन आहे. त्यानुसार दापोली शहरात सकाळी सहा वाजता 30 ग्राहकांना दुधाचे रतीब घातले जाते. विक्रीच्या दृष्टीने अर्धा आणि एक लिटरच्या पिशवीतून दूध विक्री होते. दर्जेदार दुधामुळे ग्राहक चार पैसे जास्तीचे देण्यास तयार आहे. त्यामुळे 36 रुपये लिटर दराने दुधाची विक्री होते.

जमा-खर्च दिवसाला दहा गाईंसाठी चारा, पेंड, भुसा आदी खर्च सरासरी 400 रुपये.
दररोज 36 रुपये प्रति लिटर दराने 25 लिटर दूध विक्रीतून 900 रुपये उत्पन्न
- त्यातून खाद्याचा खर्च वजा करता 500 रुपये शिल्लक.
- या हिशेबाने महिन्याला सरासरी 15,000 रुपये उत्पन्न
- त्यातून दूध वाहतुकीचा 2500 रु. आणि औषधोपचार 500 रु. खर्च वजा जाता 12 हजार रुपये शिल्लक राहतात.

उप-उत्पादन (बाय प्रॉडक्‍ट) दरवर्षी पंधरा हजार रुपयांचे शेणखत परिसरातील बागायतदारांना विकले जाते. पशुपालनात स्थिरस्थावर झाल्यावर आता टप्प्याटप्प्याने शेतीच्या नियोजनात लक्ष दिले आहे. सध्या दीड एकर क्षेत्रावर सुपारी आहे. अजून साडेपाच एकर पडीक जमीन लागवडीखाली आणणार आहे. शेणाच्या उपलब्धतेमुळे गोबरगॅस बांधला आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी सिलिंडर खरेदीचा खर्च नाही. गोबरगॅस स्लरीचा वापर सुपारीच्या बागेसाठी होतो.

प्रक्रिया उद्योगाची जोड -खानविलकर यांना पत्नी सौ. मृणाल यांचीही चांगली साथ आहे. त्या दररोज दोन लिटर दुधापासून पेप्सीपेय तयार करतात. दर महिना दोन किलो तुपाची विक्री सरासरी एक हजार रुपये प्रति किलो दराने होते. या उद्योगातून महिना किमान तीन हजार रुपये मिळतात.

संपर्क -
मिलिंद खानविलकर - 9158815809

No comments:

Post a Comment