Saturday, 9 February 2013

फुलाफुलांवर बहरले यश-समृद्धीचे रंग

विविध रंगांची, जातींची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली फुलशेती एकाच गावात पाहायचीय? मग तुम्हाला पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) या छोट्या गावात जावे लागेल. गावात सुमारे 35 पॉलिहाऊस असून, शेतीला व्यावसायिक रूप देऊन येथील शेतकऱ्यांनी फुलशेतीत आघाडी घेतली आहे. अमोल बिरारी
केळवडे गाव -
लोकसंख्या - सुमारे चार हजार
भौगोलिक क्षेत्र - 1379 हेक्‍टर
प्रत्यक्ष पिकाखाली - 439 हेक्‍टर
मुख्य पिके - टोमॅटो, पॉलिहाऊसमधील फुलपिके/ ढोबळी मिरची, केळी, भाजीपाला पिके

पुणे- सातारा महामार्गावरील केळवडे गाव फुलशेतीबरोबरच भाजीपाला उत्पादनातही आघाडीवर आहे. गावात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन होते. दररोज सुमारे दहा ट्रक माल पुणे बाजारपेठेत पाठविला जातो. गावात प्रवेश करताच जिकडे तिकडे लहान- मोठ्या आकारातील पॉलिहाऊस पाहायला मिळतात. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसहलींच्या माध्यमातून परदेश दौरा केल्यामुळे पॉलिहाऊसमधील त्यांचे फूल व्यवस्थापन त्यांच्या अभ्यासाची कल्पना देते. फुलशेतीच्या माध्यमातून गावात कोट्यवधींची उलाढाल होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे सहकार्यही या शेतकऱ्यांना आहे.

आधुनिक फुलशेतीतले पहिले पाऊल - गावात सुमारे बारा वर्षांपूर्वी आधुनिक फुलशेतीला सुरवात झाली. बी.ई. मेकॅनिकल असलेले प्रशांत रोहिदास कोंडे नोकरीपेक्षा फायदेशीर व्यवसायाचा शोध घेत असताना फुलशेतीची माहिती त्यांना मिळाली. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्पातील तज्ज्ञांकडून आधुनिक फुलशेतीचे तंत्रज्ञान त्यांनी समजावून घेतले. सन 2001 मध्ये दहा गुंठ्यांत पहिले पॉलिहाऊस केले. येथूनच आधुनिक फुलशेतीची वाटचाल सुरू होऊन गावाच्या विकासात महत्त्वाचे पाऊल पडले.

कोंडे यांच्या चार एकरांवर पॉलिहाऊसमध्ये विविध जातींच्या लाल, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांचे गुलाब आहेत. दहा गुंठ्यांत पॉलिहाऊसमध्ये विविध रंगांतील नऊ- दहा जातींच्या जरबेरा फुलांची लागवड केली, मागणी भरपूर मिळाली; परंतु मोजक्‍या रंगाच्या व जातींना! मग, दुसऱ्या वर्षी आणखी बारा गुंठ्यांवर पॉलिहाऊसमध्ये त्याच जाती लावल्या. ग्रेडिंग, पॅकिंगवर भर दिला. कोरूगेटेड बॉक्‍समधून विक्री केल्यामुळे फुलांची गुणवत्ता टिकून राहिली. पिवळ्या फुलांना चांगली मागणी मिळाली. त्यानंतर क्षेत्र वाढवीत नेले. काही काळ जरबेरासोबत ढोबळी मिरचीही घेतली. सन 2007 पासून त्यांनी गुलाबावर लक्ष केंद्रित केले. पंजाब, दिल्ली, राजकोट, अहमदाबाद, इंदूर व भोपाळ येथील बाजारपेठेत ते फुले पाठवितात. दरासंदर्भात कोंडे म्हणाले, की गुलाबाला गुणवत्तेप्रमाणे अडीच ते साडेतीन रुपये प्रति फूल दर मिळतो. एकरात दोन हजार फुले निघाली तर चांगले परवडते.

गुलाब शेतीत 60 टक्के "मार्केट ओरिएंटेड' (मागणीप्रमाणे), 40 टक्के नियमित जाती लावणे फायद्याचे ठरते. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामुळे फुलशेतीत स्पर्धा वाढली आहे, तेव्हा गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान फूल उत्पादकांसमोर असून, पॅकिंग- ग्रेडिंगवर अधिक लक्ष द्यावे लागेल.

कोंडे यांची फुलशेती - दृष्टिक्षेप
अडचणी - - मजूर अधिक लागतात. प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासते
- हंगामानुसार रोग- किडींचा प्रादुर्भाव, थ्रिप्स, लाल कोळीची समस्या सर्वाधिक
- पावसाळी वातावरणात डाऊनीचा प्रादुर्भाव
- बाजारभावातील अचानक घसरण

गुलाबाच्या जाती -- लाल रंगात बोर्डो, टॉप सिक्रेट, फर्स्ट रेड, अप्पर क्‍लास
- गर्द गुलाबी रंगात बुगाटी
- ऑरेंज रंगात ट्रॉपिकल, ऍमेझॉन
- पांढऱ्या रंगात ऍव्हेलांच
- पिवळ्या रंगात गोल्ड स्ट्राईक

व्यवस्थापन - पॉलिहाऊसमध्ये नियमित स्वच्छता आवश्‍यक
- नियमित धुरीजन्य प्रक्रिया, डस्टिंग आवश्‍यक
- वेळच्या वेळी नीमऑइल फवारणी
- गरजेनुसार पाणी व्यवस्थापन
- कीड- रोगांच्या नियंत्रणाबाबत दक्षता
- आर्द्रता नियंत्रणासाठी मिस्टिंग (खालून पाणी देणे) आवश्‍यक
- तोडणी, प्रतवारी, पॅकिंगवर भर

वाखाणण्याजोगे ऍन्थुरिअम, कार्नेशन  -सचिन कोंडे - गावातील प्रगतिशील शेतकरी. 2002 पासून फुलशेतीला सुरवात. सहा एकरांत पॉलिहाऊस. त्यात ऍन्थुरिअम तीन एकर, जरबेरा दोन एकर व एक एकरात कार्नेशन. त्यांचे कार्नेशन, ऍन्थुरिअमचे व्यवस्थापन खरोखर वाखाणण्याजोगे. पुणे बाजारपेठ जवळ असल्याने तेथे फुले पाठवितात.
दर -
- ऍन्थुरिअम 40 रुपये प्रति फूल, हंगामात 55 रुपयांपर्यंत.
- कार्नेशन 120- 130 रुपये प्रति बंच, प्रति बंच- 20 फुले, हंगामात 200- 250 रु.
- जरबेरा 10- 15 रुपये प्रति बंच, प्रति बंच- दहा फुले, हंगामात 80-85 रु.
व्यवस्थापन
- ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये, किडी- रोग नियंत्रण फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे.
- दिवसाआड फुलांची काढणी केली जाते.
- लग्नसराई, दिवाळी, व्हॅलेंटाइन डेला फुलांना दर चांगला मिळतो. फुलशेतीत मजूर खूप लागतात.
- परराज्यांतील मजूर वर्षभर आणून तोडणी, पॅकिंगची कामे केली जातात.
- कार्नेशनला तीन महिन्यांनी फ्लश येतो, तो तीन महिने चालतो. वर्षातून दोन फ्लश. पाण्यासाठी शेततळे. त्यातील पाणी ड्रीपद्वारे दिले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने पाणी साठविण्याचा प्रयोगही केला आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे केळवडे या गावातील शेतकरी प्रयोगशील, अभ्यासू आहेत. राजकारण तात्पुरते असून एकमेकांना सहकार्य करतात. शेतीत कुणाचे चुकत असेल तर चूक लक्षात आणून देतात. गावातील बाबा नारायण कोंडे यांचे सहा एकरांवर पॉलिहाऊस असून त्यात ऍन्थुरिअम, जरबेरा असतो. शेतीत ते सतत नवीन प्रयोग करतात. मल्चिंगवर टोमॅटो घेण्याचा प्रयोगही त्यांनी केला.
अन्य प्रयोगशील शेतकरी - शिवाजीराव कोंडे, राजेंद्र नानासाहेब कोंडे, अनिल धोंडिबा कोंडे, मोहन हिरालाल धुमाळ, सुभाष श्रीराम कोंडे, संजय मारुती कोंडे, पंढरीनाथ जाधव
कृषी विज्ञान केंद्र, बारामतीच्या शास्त्रज्ञांचे नियमित मार्गदर्शन तसेच सरपंच वंदना जायगुडे, ग्रामसेवक हनुमंत वाघ यांचे चांगले सहकार्य मिळते.

स्ट्रॉबेरीचा पहिला प्रयोग - उद्यानपंडित पुरस्कार विजेते संतोष कोंडे यांनी गावात प्रथमच एक एकरात स्ट्रॉबेरी लागवडीचा (जात- स्वीट चार्ली) प्रयोग केला. त्यांच्याकडील हवामानात हे पीक यशस्वी होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आधुनिक पद्धतीच्या लागवडीत पिकाला संपूर्ण पॉलिमल्चिंग आहे. चोख नियोजन करून स्ट्रॉबेरीची गुणवत्ता टिकविली आहे. सध्या 120 रुपये प्रति किलो दर मिळत असून पुण्यातील मॉलला पुरवठा होतो. आतापर्यंत दिवसाआड दीडशे किलो माल निघाला. दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

संपर्क - प्रशांत कोंडे, 8975754141
सचिन कोंडे, 9763520720

No comments:

Post a Comment