Friday, 1 March 2013

पक्षी खाद्यामध्ये होताहेत बदल

कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीऐवजी तीळ पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड आणि सरकी पेंड या पर्यायी खाद्यपदार्थांचा काही अंशी वापर करून पक्षी खाद्य विकसित करण्यात येत आहे. यामुळे खाद्याच्या खर्चात बचत होऊ शकते.
डॉ. व्ही. एस. कुलकर्णी

कुक्कुटपालन उद्योगाची वाढती गरज केवळ सोयाबीनवर अवलंबून भागणार नाही हे लक्षात घेऊन शास्त्रज्ञ विविध पर्यायी खाद्यपदार्थांचा तुलनात्मक अभ्यास करीत आहेत. हैदराबाद येथील कुक्कुट निर्देशन संचालनालयातील शास्त्रज्ञ कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीऐवजी तीळ पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड आणि सरकी पेंड या पर्यायी खाद्यपदार्थांचा काही अंशी वापर करून पक्षी खाद्य विकसित करीत आहेत. या खाद्यांचे निष्कर्षदेखील प्रकाशित झाले आहेत. परंतु या पर्यायी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांची सोयाबीन एवढी उपलब्धता होऊ शकते का? असे तपासले असता केवळ सरकी पेंड ही गरज भागवू शकते असे लक्षात आले.

सरकीचे पारंपरिक पद्धतीने गाळप करून जी पेंड बनते, त्यामध्ये बरेचसे दोष राहून जातात. विशेषतः मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (टरफल व त्याला चिकटलेला कापूस) असणे, सरकीमध्ये नैसर्गिकरीत्या गॉसीपॉल हा अपचनीय घटक आढळतो. गॉसीपॉलमुळे कुक्कुटपालनामध्ये काही अडचणी येऊ शकतात, असा समज आहे. यामध्ये प्रामुख्याने गॉसीपॉल अन्य लायसीनसारख्या महत्त्वाच्या अमिनो आम्लांबरोबर बांधला जाऊन एकूण प्रथिनांची उपलब्धता कमी करू शकतो. (शर्मा व सहकारी 1978). तसेच गॉसीपॉल अंड्यातील पिवळ्या बलकाचा रंग बदलण्याससुद्धा कारणीभूत होऊ शकतो.

जास्ती तंतुमय पदार्थ असणे हा दोष आधुनिक प्रक्रियेद्वारे टरफलविरहित गोडंबीपासून तेल गाळप केल्यास सुधारलेला आढळून आला आहे. टरफलासहित सरकी पेंडीमध्ये 18 ते 20 टक्के प्रथिने असतात. तीच टरफलविरहित सरकी पेंडीमध्ये 40 ते 42 टक्‍क्‍यांपर्यंत आढळून येतात. त्याचसोबत पारंपरिक पेंडीमध्ये असणाऱ्या 1500 ते 1800 किलो कॅलरी ऊर्जेऐवजी आधुनिक टरफलविरहित पेंडेमध्ये 2400 ते 2500 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आढळून येते.

तसेच गॉसीपॉलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लायसीन या मुख्य अमिनो ऍसिडची जास्तीची मात्रा देण्याची शिफारस शेखर रेड्डी व इतर शास्त्रज्ञांनी 1998 मध्ये केली आहे. त्याचे चांगले परिणामदेखील दिसले आहेत. आधुनिक पद्धतीने सरकीचे गाळप केले असता, मूळ मुक्त गॉसीपॉलचे प्रमाण 0.012 टक्‍क्‍यापेक्षा कमी ठेवता येऊ शकते व अशी सरकी पेंड कुक्कुटपालनात मोठ्या प्रमाणात वापरता येऊ शकते, असे डॉ. शर्मा व इतर शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
त्यामुळे नजीकच्या काळात आधुनिक प्रक्रियेने सरकी पेंडीची निर्मिती तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास येत्या काळात सरकी पेंड कुक्कुटपालन उद्योगात वापरता येईल.

संशोधनाचे निष्कर्ष -
नुकत्याच प्रकाशित झालेल्या कुक्कुट निर्देशन संचालनालय, हैदराबाद येथील आहार विशेषज्ञ डॉ. एस. व्ही. रामाराव यांच्या विविध प्रयोगांच्या निष्कर्षावरून मांसल कोंबडीत 50 टक्के आणि अंडी देणाऱ्या कोंबडीत 80 टक्के सोयाबीन पेंडीऐवजी सरकी पेंड वापरली असता, वजन, अंडी उत्पादन अथवा खाद्याचे रूपांतरण यावर कुठलाही विपरीत परिणाम आढळून आलेला नाही. उलटपक्षी खाद्याची किंमत मात्र 10 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकते, असे आढळून आले आहे.

1) येत्या काळात सोयाबीन ऐवजी सरकीचा पर्याय हा 50 टक्‍क्‍यांपर्यंतच न राहता तो 100 टक्के कसा करता येईल यावर संशोधन चालू आहे. त्यादृष्टीने केंद्रीय कुक्कुट संशोधन संस्था, बरेली येथील तज्ज्ञ डॉ. ए. बी. मंडल तसेच नमक्कल, तमिळनाडू येथील डॉ. चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करीत आहेत.
2) नैसर्गिकरीत्या टरफलविरहित सरकी डीओसी व सोयाबीन पेंडीची तुलना केली असता, सरकी डीओसीमध्ये लायसीन, थ्रीओनिनट्रिप्टोर्फेन इ. आवश्‍यक अमिनो आम्लांची कमतरता आहे. ज्याची कृत्रिम भरपाई करून घेता येऊ शकते.
3) संशोधकांनी सुचविल्याप्रमाणे लिव्हर टॉनिक व तंतुमय पदार्थ विघटन करणाऱ्या विकराच्या वापराचा पर्यायसुद्धा कुक्कुटपालकांना उपलब्ध आहे. विविध खाद्य मिश्रणांतून वाढत्या खाद्यपदार्थांच्या किमतींवर नियंत्रण राहू शकते. याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

- डॉ. कुलकर्णी - 9422934422
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment