Monday, 11 March 2013

मत्स्यबीजाची निवड आणि वाहतूक

यशस्वी मत्स्यसंवर्धनासाठी प्रथम उत्कृष्ट बीजाची साठवणूक करणे महत्त्वाची असते. हे बीज निरोगी आणि सशक्त नसल्यास मत्स्यशेतीपासून चांगले उत्पन्न मिळणे कठीण आहे. मत्स्यबीजाची वाहतूक शक्‍यतो थंड वेळी करावी. तळ्यातील पाण्याची पिशवीतील बीजास थोडीशी सवय झाल्यानंतर पिशवीचे तोंड तळ्याच्या पाण्यात बुडवून मग पिशवी वाकडी करावी. शार्दूल गांगण, डॉ. के. डी. पाटील, रवींद्र बोंद्रे
महाराष्ट्रामध्ये मत्स्यबीज हे नैसर्गिकरीत्या तसेच बीजोत्पादन केंद्रामध्ये उपलब्ध आहे. साधारणपणे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान हे बीज नैसर्गिक तसेच बीजोत्पादन केंद्रामध्ये मिळते. बीजोत्पादन केंद्रातील बीज पूर्णतः शुद्ध असते. परंतु नैसर्गिक मत्स्यबीजामध्ये इतर गोड्या पाण्यातील जातींच्या बीजांची भेसळ असते. म्हणून बीजोत्पादन केंद्रातीलच बीज घ्यावे.

मत्स्यशेतीसाठी कोणते बीज वापरावे? 1) सहज उपलब्ध होणारे
2) वारंवार प्रजनन न होणारे
3) प्रजनन सर्वत्र झाले तर बेसुमार संख्येमुळे माशांच्या वाढीवर परिणाम होतो.

मत्स्यबीजांची अवस्था : - फलित अंड्यातून बाहेर पडलेल्या व स्वतंत्रपणे पोहू लागलेल्या (आठ मि.मी.) ऊ.. मत्स्यजिरे (Spawn)
- 25 मि.मी.पर्यंत लांब असलेले मत्स्यबीज (Fry)
- 25 ते 50 मि.मी.पर्यंत लांब असलेल्या.... अर्ध बोटुकली (semi-fingerling)
- 50 ते 150 मि.मी.पर्यंत लांब असलेल्या..... बोटुकली (Fingerling)

मत्स्यबीजांची वाहतूक खालील बाबींवर अवलंबून असते 1) वाहतुकीचे साधन
2) साठवणुकीची क्षमता
3) मत्स्यबीजाचा आकार
4) वाहतुकीचे अंतर

मत्स्यबीजाची वाहतूक - मत्स्यशेतीसाठी लागणाऱ्या मत्स्यबीजाची वाहतूक करताना रिकामे पोट असलेले मत्स्यबीज वाहतुकीसाठी वापरतात. वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला 24 ते 30 तास खाद्य देणे थांबवावे. तसेच वाहतुकीच्या अगोदर चार ते सहा तास स्वच्छ पाण्यात ठेवावे. ज्यामुळे पाण्यात विरघळणाऱ्या विष्ठेचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीदरम्यान प्राणवायू हा प्रमाणात राहतो. मत्स्यबबीजाची वाहतूक करताना मत्सबीजोत्पादन केंद्रातील पाणी वापरावे. मत्स्यबीजाची वाहतूक शक्‍यतो थंड वेळी (पहाटे/रात्री) करावी.
कमी पल्ल्याच्या अंतरासाठी म्हणजे अर्धा ते एक तासाच्या अंतरावर 125 मत्स्यबीज प्रति लिटर या प्रमाणात भांड्यातून प्राणवायूचा वापर न करता वाहतूक करता येते.
लांब पल्ल्याच्या मत्स्यबीज वाहतुकीसाठी खालील पद्धत वापरतात.
1) या प्रकारच्या वाहतुकीमध्ये प्राणवायूचे सिलिंडर, प्लॅस्टिक बॅग आणि पुठ्ठ्याचा डबा वापरतात.
2) प्लॅस्टिक बॅगचा आकार साधारणपणे 60 x 25 सें.मी. असतो. तसेच तिची जाडी 200 गेज एवढी असते.
3) प्रथम प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये हवा भरून ती पाण्यामध्ये बुडवावी, त्यामुळे ती कुठे गळत आहे का ते लक्षात येते. प्रत्येक बॅग अशा प्रकारे तपासून घ्यावी.
4) नंतर बॅगमध्ये साठवणूक टाकीमधील सहा ते आठ लिटर पाणी टाकावे.
5) त्यानंतर आवश्‍यक त्या आकाराचे बीज पिशवीत सोडावे. साधारणपणे 25 मि.मी.चे मत्स्यबीज एका पिशवीत 500 ते 600 या प्रमाणात सोडतात.
6) प्राणवायूच्या सिलिंडरमधून छोटी ट्यूब प्लॅस्टिकच्या पिशवीत सोडावी.
7) प्राणवायू भरून झाल्यानंतर पिशवीचे तोंड रबर अथवा सुतळीच्या साहाय्याने बंद करावे.
8) पॅकबंद झालेली पिशवी पुठ्ठ्याच्या कोरुगेटेड डब्यात ठेवावी.
9) वाहतूक सुरू होईपर्यंत पिशवी थंड ठिकाणी ठेवावी.
10) कोरुगेटेड डबे चिकटपट्टीच्या साहाय्याने चारही बाजूंना चिकटवून घ्यावेत.
11) डब्यावर बीजाची संख्या, माशांची जात आणि पोचण्याचे ठिकाण नमूद करावे.
12) अशा प्रकारे पॅकबंद केलेले बीज 24 ते 36 तासांपर्यंत वाहतूक करता येतात.

मत्स्यबीजाचे अनुकूलन आणि साठवणूक - मत्स्यजिरे किंवा मत्स्यबीज सोडण्याच्या अगोदर इमल्शन वापरून पाण्यातील किडे मेलेले असले पाहिजेत. मत्स्यबीज आणल्यावर लगेच तळ्यामध्ये सोडू नयेत. प्रथम बंद पिशवी तळ्यामध्ये 15 ते 30 मिनिटे ठेवून द्यावी नंतर पिशवीचे तोंड उघडून पिशवीमध्ये तळ्यातील थोडे पाणी टाकावे. तळ्यातील पाण्याची पिशवीतील बीजास थोडीशी सवय झाल्यानंतर पिशवीचे तोंड तळ्याच्या पाण्यात बुडवून पिशवी वाकडी करावी. म्हणजे मत्स्यबीज स्वतःहून हळूहळू पोहून तळ्याच्या पाण्यात मिसळेल. पिशवीच्या तळाच्या खाचांमध्ये काही बीज अडकण्याची शक्‍यता असते, म्हणून बीज सोडल्यानंतर पिशवीत पुन्हा पाणी घेऊन ती चांगली हलवावी व अडकलेले बीज मोकळे करून मग सोडावे. हे मत्स्यजिरे किंवा मत्स्यबीज शक्‍यतो थंड वेळी सोडावे.

संपर्क : 022 - 27452775
(लेखक खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment