Friday, 15 March 2013

रब्बी ज्वारी ठरली फायद्याची

वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील शशिकांत चवरे यांनी उपलब्ध क्षेत्राचे योग्य नियोजन करत कापूस, सोयाबीन, ऊस पिकाच्या बरोबरीने आंबा, आवळा, संत्र्याची लागवड केली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी सुधारित तंत्राने रब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन घेतले. शशिकांत चवरे यांचे शेती व्यवस्थापन तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे. विनोद इंगोले
वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील शशिकांत चवरे यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या बरोबरीने शेतीमध्ये विविध प्रयोगही राबविले आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले शशिकांत चवरे सहा वर्षं कारंजा (लाड) नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते. सिव्हिल आणि मेकॅनिकल विषयांतील पदवीधर असलेले 62 वर्षीय शशिकांत चवरे यांनी 130 एकर क्षेत्राचे योग्य नियोजन केले आहे. काही क्षेत्रावर हंगामनिहाय पीक नियोजन, त्याचबरोबरीने संत्रा, आवळा, आंबा फळबाग लागवड आहे. उपलब्ध क्षेत्राचे योग्य नियोजन आणि शेतीमध्ये सुधारित तंत्राचा अवलंब करीत त्यांनी शेती फायदेशीर केली आहे. क्षेत्राला पुरेसे पाणी मिळण्यासाठी एक विहीर आणि चार कूपनलिका आहेत. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी त्यांनी 70 एकरांवर तुषार सिंचन आणि 24 एकरांवर ठिबक सिंचन केले आहे.

ज्वारी लागवडीचा चवरे "पॅटर्न' शशिकांत चवरे यांची वडिलोपार्जित 130 एकर शेती आहे. या क्षेत्रामध्ये 15 एकर ऊस, चार एकर आवळा (जात ः नरेंद्र), तीन एकर क्षेत्रावर आंबा लागवड (जात - हापूस, वनराज, केसर, दशेरी), चार एकर संत्रा आणि दहा एकर रब्बी ज्वारी, 25 एकर कापूस, 25 एकर सोयाबीन असे पीक नियोजन आहे. विदर्भात ज्वारी लागवडीखालील क्षेत्रात घट होत असली तरी धान्य आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी गेल्या तीस वर्षांपासून ते खरीप ज्वारी लागवड करीत आहेत. लागवडीचे क्षेत्र मोठे असल्याने शेणखताच्या उपलब्धतेसाठी त्यांच्या गोठ्यात 73 जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी लागवड फायदेशीर ठरली आहे. दरवर्षी खरीप ज्वारी लागवडीवर त्यांचा भर असतो. या वर्षी मात्र त्यांनी रब्बी ज्वारीची लागवड केली. गव्हाला किमान पाण्याच्या सात पाळ्या लागतात, त्यामानाने ज्वारीला कमी पाणी लागते. शशिकांत चवरे यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून यंदाच्या वर्षी रब्बी ज्वारीची लागवड केली.
या लागवडीबाबत श्री. चवरे म्हणाले, की धान्याची गरज आणि येत्या काळातील चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन मी रब्बी ज्वारी लागवडीचा निर्णय घेतला. मी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्राचा संपर्क शेतकरी आहे, त्यामुळे ज्वारीमधील नवनवीन तंत्रज्ञान मला लगेच समजते, त्याचा मी वापर करतो. तज्ज्ञांचा सल्ला घेतो. लागवडीसाठी मी पीकेव्ही क्रांती या जातीची निवड केली. या जातीचा उतारा चांगला मिळतो, दाणे मोठे असतात आणि बाजारात या ज्वारीला चांगली मागणीदेखील आहे. यंदाच्या वर्षी दहा एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन केले. सोयाबीन काढणीनंतर 20 ऑक्‍टोबरला जमिनीची मशागत करून पुरेशा ओलीवर ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राने ज्वारीची लागवड केली. लागवडीच्या वेळी पेरणी यंत्राने बियाण्याच्या बरोबरीने एकरी 50 किलो डीएपी पेरून दिले. एकरी साडेचार किलो बियाणे लागले. पेरणीपूर्वी शिफारशीत तीन ग्रॅम थायरम प्रति किलो कीडनाशकाची बीजप्रक्रिया केली होती. लागवडीचे अंतर 45 सें.मी. ठेवले. लागवडीनंतर 28 दिवसांनी एकरी 50 किलो युरिया खताची मात्रा दिली. जमिनीतील ओलीवर रोपांची चांगली उगवण झाली. पीक 45 दिवसांचे होईपर्यंत दोन डवरण्या केल्या. पिकाला पाणी नियोजनाच्यादृष्टीने एक विहीर आहे. उपलब्ध पाण्याचा विचार करून ज्वारीला लागवडीनंतर 25 दिवसांनी तुषार सिंचनाने पाणी दिले, तसेच दुसरे पाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत पाट पद्धतीने दिले. पीकवाढीच्या योग्य काळात पाणी दिल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदाच्या हंगामात कीड- रोगांचा विशेष प्रादुर्भाव जाणवला नाही. एकरी दहा क्विंटल उतारा मिळाला आहे. एकरी सरासरी 4,200 रुपये खर्च झाला. यंदा ज्वारीला चांगला दर आहे. सरासरी 3500 रुपये क्विंटल या दराने विक्री होत आहे.

गेल्यावर्षी मी रब्बी हंगामात स्थानिक जातीची एक एकरावर लागवड केली होती. एकरी साडेसहा क्‍विंटल उत्पादन मिळाले, तसेच 2500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. ज्वारी लागवडीचे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या दरही चांगला आहे. कडब्याचेही चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे रब्बी ज्वारी फायदेशीर ठरणार आहे. मला दैनंदिन नियोजनात अशोक वैरागकर, अनंत गालफाडे यांचे सहकार्य मिळते.

विक्रीचे नियोजन - ज्वारी विक्रीबाबत चवरे म्हणाले, की कारंजा (लाड) आणि अमरावतीमधील ग्राहक आणि किराणा दुकानदारांना मी ज्वारीचे सॅम्पल दाखविले. त्यांना ज्वारी पसंत पडली. त्यामुळे यंदा बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना विक्री न करता थेट ग्राहक आणि किराणा दुकानदारांना विक्रीचे नियोजन केले आहे. यामुळे मला चांगला दर मिळेल आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाची ज्वारी मिळणार आहे.

गूळनिर्मितीवर भर - चवरे यांच्याकडे सध्या अठरा एकरांवर को- 86032 जातीच्या उसाची लागवड आहे. उसाला ठिबक सिंचन केले आहे. सुधारित तंत्रज्ञानामुळे त्यांना एकरी 35 टन उत्पादन मिळते. ऊस लागवडीबाबत त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शन मिळते. साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गूळनिर्मितीवर त्यांनी भर दिला आहे, त्यासाठी गुऱ्हाळ उभारले आहे. एक टन उसापासून 125 किलो गुळाचे उत्पादन मिळते. स्थानिक ग्राहकांकडून या गुळाला वाढती मागणी असल्याने त्यांना खरेदीदार शोधावे लागत नाही. सरासरी 25 रुपये प्रति किलो या दराने गुळाची विक्री होते. वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांनी गुऱ्हाळ थांबू नये याकरिता ट्रॅक्‍टरचलित जनरेटर बसविला आहे.

जल- मृद संधारणावर भर.. चवरे यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन शेती आणि परिसरातील क्षेत्रात जल-मृद संधारणावर भर दिला आहे. शेताच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचे त्यांनी स्वतः खोलीकरण केले. तसेच, सिमेंट बंधारे बांधून पाणी अडविले आहे. सध्या या नाल्यात पाणी साठून राहिल्याने विहिरीला चांगले पाणी राहिले आहे. शेताच्या बांधावर खस गवताची लागवड केली आहे, त्यामुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत झाली.

चवरे यांचे शेतीचे नियोजन-1) क्षेत्र मोठे असले तरी एकच पीक पद्धती न ठेवला हंगामी पिके, फळबागांचे नियोजन
2) पीक फेरपालट आणि शेणखताच्या पुरेपूर वापरातून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर
3) पीक व्यवस्थापनात सुधारित तंत्राचा वापर, त्यामुळे उत्पादनात वाढ
4) परिस्थितीनुसार पीक पद्धती बदलावर भर
5) जल-मृद संधारणातून पाणी व्यवस्थापन

"पीकेव्ही क्रांती' वाणाची वैशिष्ट्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे म्हणाले, की ही जात 125 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी धान्याचे 35 ते 38 क्विंटल आणि कडब्याचे 90 क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचा दाणा चमकदार आणि मोठा असतो, प्रतही चांगली आहे, त्यामुळे बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे या जातीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद आहे.

शशिकांत चवरे - 9881900650
डॉ. आर. बी. घोराडे - 9850723706

No comments:

Post a Comment