Friday, 29 March 2013

शेततळ्याच्या पाण्यावर माळरान बनले ‘नंदनवन’!

डोंगररांगांनी वेढलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातील खडकाळ जमिनीत पिकं फारशी येत नसल्याने अनेक शेतकरी केवळ खरीप पिकांचेच उत्पादन घेतात. तथापि, हिवरखेडच्याच दादाराव हटकर व बंधूंनी मात्र जेथे कुसळ उगवत नव्हती अशा माळरानावर जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर संत्रा, डाळिंबाची बाग फुलविली आहे. शेततळ्यातील पाण्याचे गुरुत्वाकर्षण पद्धतीने उत्तमप्रकारे सिंचन व नियोजन करून त्यांनी फळबागेसह शेतात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.
हिवरखेड (ता. खामगाव) येथील दादाराव हटकर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे मेंढीपालनाचा. हा व्यवसाय करत असतानाच दादाराव व त्यांचे बंधू शेतीकडे वळले आणि मेहनतीने त्यांनी शेती पिकविली. कौंटी शिवारालगत ज्यांची शेतजमीन आहे, तेथे आजूबाजूच्या डोंगरावरील मोठे दगडगोटे, माती पसरली असल्यामुळे पीक कसे घ्यायचे, शेती कशी पिकवायची, अशा विवंचनेत इतर शेतकरी असताना, हटकर बंधूंनी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग करीत भरघोस उत्पादन घेत इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. हटकर यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत सन २००६-०७ मध्ये आपल्या शेतात तळे खोदले आहेत. आपला परंपरागत मेंढपाळ व्यवसाय अबाधित ठेवत त्याला नवनवीन संकल्पनांची जोड देणार्‍या हटकर भावंडांनी शेतीतून समृद्धी मिळवली आहे. भरघोस उत्पादन घेणार्‍या हटकर यांना शासनाने ‘उद्यानपंडित’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
हटकर बंधूंनी वडिलोपार्जित सहा एकर शेती दोनशे एकरपर्यंत वाढविली आहे. पाच भावंडांपैकी मोठे दादाराव हटकर हे शेतीत काय घ्यायचे याचे नियोजन करतात. दुसरे भाऊ निंबाजी ऊर्फ अनिल हटकर हे शासकीय योजनांची माहिती मिळवून योजनांचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी प्रयत्नशील असतात. तृतीय बंधू रमेश हटकर हे मेंढीपालन व्यवसायासोबत शेतात काय काम करायचे याचा आराखडा बनवतात. चतुर्थ बंधू राजू हटकर हे कृषी निविष्ठा आणण्यापासून ते मजुरांकडून काम करवून घेण्याची जबाबदारी सांभाळतात, तर पाचवे भाऊ विनोद हटकर हे आपल्या चारही भावांना कामात मदत करतात.
या सर्वांचा परिपाक म्हणून आज हटकर यांचा मळा माळरानावरील नंदनवन बनला आहे. राजकीय नेते, केंद्रातील पर्जन्यछाया प्रदेश विकास प्राधिकरणातील सचिव, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे तसेच विविध कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ आदी हटकर यांच्या शेतीकडे प्रयोगाचे ठिकाण म्हणून पाहतात.
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार शेतात फिरविले पाणी !
हटकर यांच्या शेतात राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत घेतलेले तीन शेततळे आहेत. ४४ बाय ४४ मीटर अंतर व तीन मीटर खोली असलेल्या या तीन शेततळ्यांपैकी दोन शेततळे जवळ जवळ असून, एक शेततळे ५०० मीटर अंतरावर आहे. विशेषत: ही तीनही शेततळे हटकर यांनी कल्पक बुद्धीने अंडरग्राऊंड पाईपलाईनने जोडले आहेत. त्यामुळे तीनही शेततळ्यांतील पाणी एकमेकांना देता येते. तसेच या शेततळ्यांच्या पाईपलाईनला शेताच्या मध्यभागात तीन व्हॉल्व्ह ठेवून हे पाणी संत्रा, डाळिंब, भाजीपाला, तुती व कापूस पिकांमध्ये फिरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेततळ्याची उभारणी करतेवेळी तळ्यात बुडाशी पाईप फिट केलेला आहे. त्या पाईपला एल्बलो लावून पाणी जाण्यासाठी छिद्र ठेवले. फलीम व खाली टाकलेल्या फलीमला रबर टाकून नट-बोल्टांनी छिद्राची जागा निश्‍चित केली. पाईपला थोडे फलीमच्या वर उचलण्यात आले व बुडापासून पाच फुटांपर्यंत पीव्हीसी पाईप टाकला. या पाईपला एक ते दीड फूट अंतरावर खाचा ठेवल्या. जेणेकरून पाणी कमी झाल्यास खाचांमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. हाच पाईप शेततळ्याच्या बुडातूनच बाहेर काढत गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाण्याचा प्रवाह उताराकडे वळविला. तीनही शेततळे जमिनीपासून उंचीवर उभारण्यात आली असून, डोंगरकडांच्या शेजारी आहेत. जेणेकरून तीनही शेततळ्यातील पाणी, शेताकडे उतार असल्यामुळे कुठल्याही अवरोधाने थांबत नाही. या पद्धतीमुळे शेततळ्याच्या पाण्यावर ४० एकर संत्रा, १२ एकर डाळिंब, १० एकर कापूस आणि ५ एकर भाजीपाला व तुतीच्या शेताचे ओलित होते. त्याचप्रमाणे हटकर यांच्या शेतात चोहोबाजूला सहा विहिरी आहेत. या विहिरीसुद्धा अंडरग्राऊंड पाईपलाईनने एकमेकांना जोडल्या आहेत. तसेच शेततळ्यांनाही जोडल्या आहेत. पावसाळयात विहिरींमधील पाणी शेततळ्यात सोडून तळे भरले जाते. हेच पाणी रब्बी हंगामात वापरले जाते.
शेततळ्यातील पाण्यावर ८० एकर ओलित
तीनही शेततळ्यांच्या पाण्यावर हटकर बंधूंनी जवळपास ८० एकर शेतीचे ओलित केले आहे. त्यामध्ये संत्रा ४० एकर, डाळिंब १२ एकर, कापूस १० एकर, भाजीपाला दीड एकर व तुती पाच एकर व तूर तसेच खरिपात पाणी नसल्यास सोयाबीन, उडीद, मूग, रब्बी हंगामात हरभरा, गहू असे एकूण ८० एकराचे ओलित त्यांनी केले आहे. शेती करत असतानाच परंपरागत मेंढीपालन व्यवसायही त्यांनी चालू ठेवला आहे. त्यांच्याकडे जवळपास ६०० मेंढ्या असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही हटकर यांनी शेततळ्यातून केली आहे. मेंढ्यांसाठी संत्रा बागेजवळ हौदही बांधला आहे.
संत्रा बागेपासून साडेतेरा लाख रुपयांचे उत्पन्न
शेततळे आहे तर मग कशाला घाबरायचे, असे बोलून दादाराव हटकर आपल्या भावंडांना बळ देतात. ‘कुठवर करणार तीच ती पारंपरिक शेती, काहीतरी नवीन करून दाखवू’, असे म्हणत त्यांनी २००५ पासून संत्रा बागेचा श्रीगणेशा केला. पुढच्याच वर्षी दादारावांनी शेततळे खोदले. त्यानंतर २००६ मध्ये १००० व २००७ मध्ये २०० झाडांची वाढ केली. १८ बाय १८ फूट अंतरावर संत्र्याची २२०० झाडे त्यांनी जगविली. ठिबक सिंचनद्वारे एका झाडाला चार ड्रीपरच्या माध्यमातून सिंचन केले. मृग बहार घेण्यासाठी किटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली. वर्षातून दोन ते तीन वेळा रोटाव्हेटर करीत आंतरमशागतही सुरू ठेवली. कोणतेही रासायनिक खत न देता बांगडी पद्धतीने पाच फुटांपर्यंत लेंडी खत दिले. त्याचा परिपाक म्हणून २०११-१२ मध्ये त्यांना संत्रा बागेपासून साडेतेरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चिखली तालुक्यातील एकलारा येथील व्यापार्‍यांनी हटकर यांच्या संत्रा बागेची हर्रासी केली.
१० टन डाळिंबाचे उत्पादन
डाळिंब बागेपासूनही हटकर यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. २६ डिसेंबर २००९ मध्ये हटकर बंधूंनी धुळे येथून आणलेल्या ‘भगवा’ जातीच्या १६०० डाळिंब कलमांची लागवड केली. त्यांनी १० बाय १५ फूट अंतरावर लागवड करीत प्रति झाड २०० ग्रॅम १०:२६:२६ व १ पाव निंबोळी ढेपेची मात्रा दिली. गतवर्षी त्यांनी अंबिया बहार घेत १० टन डाळिंबाचे उत्पादन घेतले. त्यापासून साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी मृगबहाराची तयारी त्यांनी सुरू केली असून, विविध किटकनाशकांच्या ३० फवारण्या आतापर्यंत केल्या आहेत. हटकर बंधूंनी डाळिंबाची (प्रतवारी) ग्रेडिंग पद्धतही विकसित केली आहे. ते शेतातच डाळिंबाचे ग्रेडिंग करून स्वखर्चाने अकोला, नांदेड येथील बाजारपेठेत माल विकतात. २०१२ मध्ये त्यांनी डाळिंब बागेवर दीड लाख रुपये खर्च केला आहे.
मुले घेताहेत कृषी शिक्षण
व्यवसायाने मेंढपाळ असलेले हटकर बंधू प्रयोगशील शेतकरी झाले. शेती करत करत त्यांनी आपल्या मुलांमध्ये शेतीविषयी, कृषी शिक्षणाची गोडी निर्माण केली. परिणामी, दादाराव हटकर यांचा मुलगा बी. एस्सी. (ऍग्री) चे शिक्षण घेत आहे, तर एक मुलगा शेतकी शाळेत शिक्षण घेत आहे.
भारनियमनावर मात
शेतीसाठी १६ तास विजेचे भारनियमन असल्यामुळे विजेअभावी अनेक शेतकरी पाणी असतानाही पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. मात्र, हटकर बंधूंनी कुठलाही सबमर्सिबल पंप, विद्युतपंप न वापरता गुरुत्वाकर्षण पद्धतीचा वापर करीत शेततळ्यातील पाणी ८० एकर शेतात फिरविले आहे. हा प्रयोग करून त्यांनी एक प्रकारे भारनियमनावर मात केली आहे.
एकाच ठिकाणाहून फवारणी
हटकर बंधूंनी डाळिंबाच्या बागेत कॉम्प्रेसर मशीन बसवून फवारणी यंत्र उभारले आहे. तिथेच २०० लिटरची टाकी आहे. कॉम्प्रेसरच्या माध्यमातून हवेचा दाब निर्माण करण्यात येऊन ठिबकच्या जाड नळ्यांमधून फवारणी करण्यात येते. फवारणीसाठी नळ्या डाळिंब व संत्रा बागेत मोठ्या कौशल्याने फिरविल्या आहेत. डाळिंब बागेत एक ओळ आणि संत्रा बागेत दुसरी ओळ व मधोमध व्हॉल्व्ह अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डाळिंबाच्या बागेत फवारणी करावयाची असल्यास संत्रा बागेकडील व्हॉल्व्ह बंद केला जातो. संत्रा बागेला फवारणी करताना डाळिंब बागेचा व्हॉल्व्ह बंद केला जातो. एकाच ठिकाणाहून फवारणी होत असल्यामुळे मजूरही कमी लागतात. केवळ कॉम्प्रेसर सुरू करायची वेळ पाळावी लागते. प्रत्येक फळझाडाच्या ओळीजवळ एक नोझल असून, फवारणीसाठी फक्त नोझल सुरू करावे लागते, असे दादाराव हटकर यांनी सांगितले.
संपर्क : दादाराव मांगो हटकर
मु.पो. हिवरखेड, ता. खामगाव,
जि. बुलडाणा
मो. नं. ९९२११२६१०१

No comments:

Post a Comment