Friday, 15 March 2013

ब्रॉयलर पक्ष्यांचे दैनंदिन नियमन

1) नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत. त्यानंतर धुतलेल्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. भांडी धुताना त्यावर चढलेला चिकट थर व्यवस्थित धुऊन काढावा.
2) गाळलेल्या पाण्याचा पक्ष्यांना पुरवठा करावा.
3) पक्ष्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार वाढवून द्यावी. 0.5 चौ. फूट प्रतिपक्षी जागेपासून ते एक चौ.फूट प्रतिपक्षी जागा देणे गरजेचे आहे.
4) पक्षिगृहामध्ये पक्षी प्रमाणापेक्षा जास्त ठेवून गर्दी वाढवू नये. उदा. 1000 ब्रॉयलर पक्ष्यांसाठी 1000 चौ. फूट एवढी जागा द्यावी. कमी जागेमुळे पक्ष्यांची वाढ खुंटते.
5) पक्ष्यांची गादी वेळोवेळी ओली झाल्यास त्वरित ती बाहेर काढून त्या ठिकाणी कोरडे व स्वच्छ तूस टाकावे.
6) वेळोवेळी गादी खाली वर करून घ्यावी, त्यामुळे पक्षिगृहातील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
7) पक्षिगृहातील गादीमध्ये ओलावा असल्यास पाच ते सात किलो पांढरा चुना दर 100 चौ. फूट जागेवरील गादीत मिसळून घ्यावा. त्यामुळे गादी कोरडी राहण्यास व गादीतील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
8) खाद्याची भांडी पूर्णपणे भरू नयेत. भांड्यामध्ये दोन-तृतीयांश एवढे खाद्य भरावे. त्यामुळे वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण राहते.
9) दिवसातून तीन ते चार वेळा खाद्य विभागून पक्ष्यांना द्यावे. त्यामुळे पक्ष्यांमधील खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
10) उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खाद्य थंड वातावरणामध्ये द्यावे. भर उन्हामध्ये पक्ष्यांना खाद्य देऊ नये.
11) खाद्य साठवून ठेवताना ओलसर व दमट जागी साठवून ठेवू नये. त्यामुळे खाद्यामध्ये बुरशी फैलावण्याची दाट शक्‍यता असते.
12) अधूनमधून खाद्याची भांडी बुरशीसाठी तपासून घ्यावीत. भांड्यांमध्ये बुरशी आढळून आल्यास ती स्वच्छ धुवावीत व उन्हामध्ये पूर्णपणे वाळवून मगच वापरावीत.
13) पिल्लांची अथवा पक्ष्यांची मरतूक झाली असल्यास त्यांना लागलीच बाजूला करून रोग निदानासाठी जवळील प्रयोगशाळेमध्ये दाखल करावे.
14) शेडमध्ये आजारी पक्षी आढळून आल्यास लागलीच बाजूला ठेवून त्वरित उपचार करावेत.
15) मृत पक्षी उघड्यावर कधीही टाकू नयेत. त्यांची जाळून विल्हेवाट लावावी, अन्यथा रोग पसरण्याची शक्‍यता असते.
16) पक्ष्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा.
17) पक्ष्यांना लसीकरण अथवा हाताळणी केल्यावर त्यांच्यावरील ताण कमी करणारी औषधे पाण्यामधून द्यावीत.
18) अधूनमधून शेडमधील पक्षी हलवावेत. त्यामुळे पक्षी नव्या उमेदीने खाद्य खातात. त्यांच्या विक्रीच्या वजनात वाढ होण्यास मदत होते.
19) वेळोवेळी शेडला लावलेले पडदे वर करावेत, त्यामुळे पक्षिगृहामध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते.

संपर्क - डॉ. लोणकर - 9420243895
(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment