Sunday, 24 March 2013

माशांना द्या गुणवत्तापूर्ण खाद्य

गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनामध्ये माशांची वाढ ही तळ्याची उत्पादकता, आकार आणि किती दिवसांतून त्यातून बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते. तळ्यांच्या नैसर्गिक सुपीकतेला जोड म्हणून खते वापरून तळ्याची उत्पादकता वाढविणे फायदेशीर ठरते. याचबरोबर तलावात मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी पाणवनस्पतींचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. शार्दूल गांगण, डॉ. के. डी. पाटील, डॉ. राम निर्मळे
गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाला आता व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रगत तंत्राचा वापर केल्यास दर वर्षी हेक्‍टरी 3500 कि.ग्रॅ. किंवा त्याहून अधिक उत्पन्न येऊ शकते. भारतीय जातींच्या जोडीला चिनी जातीच्या माशांचा वापर करून उत्पादनात वाढ करणे शक्‍य आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनामध्ये माशांच्या वाढीसाठी तीन प्रकारची तळी असतात -
(1) संगोपन तळे - या तळ्याचा आकार सामान्यतः 12 x 6 x 1 मी. असतो. या तळ्याचा उपयोग मत्स्य जिऱ्यांच्या वाढीसाठी दोन ते तीन आठवड्यांसाठी होतो. या तलावात पाण्याची खोली साधारणपणे एक मी. एवढी आहे.
(2) संवर्धन तळे - या तळ्याचा आकार हा 25 x 12 x 1 मी. असतो. या तळ्याचा उपयोग मत्स्यबीजाच्या वाढीकरिता एक ते दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होतो.
(3) उत्पादन तळे - मत्स्यबोटुकलीचे मोठे मासे होईपर्यंत ती या तलावात वाढविली जाते. तलावाचा आकार 1,000 ते 20,000 चौरस मी. एवढा असतो. तलावाची खोली ही दोन ते तीन मी.पर्यंत असते.

तलावातील पाणवनस्पतींचे निर्मूलन - तलावात मत्स्यबीज साठवणुकीपूर्वी पाणवनस्पतींचे निर्मूलन करणे आवश्‍यक असते. तलावात विविध प्रकारच्या पाणवनस्पती आढळतात. उदा. तरंगत्या पाणवनस्पती (वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस, डकवीड्‌स इ.), मुळे असणाऱ्या व पाने-फुले पाण्याच्या वर येणाऱ्या (कमळे, वॉटर लिली इ.), पूर्णपणे बुडालेल्या (हायड्रिला, नजास इ.) आणि तलावाच्या काठाकाठावर उगवणाऱ्या (सेजिस, वॉटर प्रिम्रोज, आयपोमिया, पाणगवत इ.)
या पाणवनस्पतींचे बरेच तोटे आहेत,
- या वनस्पती अनावश्‍यक माशांना आश्रय देतात.
- मासेमारीला अडथळा निर्माण होतो.
- प्लवंग निर्मितीला अडथळा येतो.
- पाण्यामध्ये प्राणवायूची कमतरता निर्माण होते.

... असे करा पाणवनस्पतींचे नियंत्रण - या वनस्पती थोड्या प्रमाणात व विखुरलेल्या असतील तर मनुष्याच्या मदतीने त्या काढून टाकाव्यात. ते शक्‍य नसल्यास खुरपीसारख्या छोट्या हत्यारांनी काढून टाकावी.
- वनस्पती जर दाट असतील तर योग्य रसायनांचा वापर करावा. उदा. टॅफिसाइड, हेक्‍झामार, फर्निक्‍झोन यांसारखी रसायने प्रति हेक्‍टरी आठ ते 10 कि.ग्रॅ. प्रमाणात वापरावीत. तसेच द्रवरूप अमोनिया दर दशलक्ष पाण्यात 15 ते 20 भाग वापरून मुळे धरणाऱ्या वनस्पती नष्ट करता येतात.
- जीवशास्त्रीय पद्धतीनेही पाणवनस्पतींवर नियंत्रण ठेवता येते. तळ्यामध्ये गवत्या मासा, तिलापिया आणि सिप्रिनस कार्प जातींच्या माशांची साठवणूक करून पाणवनस्पतींवर नियंत्रण ठेवता येते. साधारणपणे एक किलो वजनाचे 1200 गवत्या मासे 10 दिवसांत 11 टन हायड्रिला खाऊ शकतात.

(1) मत्स्यजिऱ्यांची आणि मत्स्यबीजांची साठवणूक - संगोपनासाठी मत्स्यजिरे सोडण्याचे प्रमाण हे संगोपन तळ्याची उत्पादकता, आकार आणि किती दिवसांतून त्यातून बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते.
- चांगली उत्पादकता असणाऱ्या आणि 200 ते 1000 चौरस मी. आकाराच्या तळ्यात 10 ते 15 दिवस संगोपन करून 15 ते 25 मि.मी. लांबीचे बीज काढावयाचे असल्यास हेक्‍टरी 50 ते 60 लाख मत्स्यजिरे सोडता येते. जर 12 ते 15 मि.मी. लांबीचे मत्स्यबीज बोटुकलीपर्यंत वाढविण्यासाठी सोडावयाचे असल्यास त्यांचे प्रमाण हेक्‍टरी पाच लाख बीजे एवढे असावे.
- 900 चौरस मी. आकाराच्या शेततळ्यामध्ये सहा ते आठ सें.मी. आकाराची 650 बोटुकली साठवावी.
तळ्यातील मूळच्या तसेच खत योजनेने वाढविलेल्या नैसर्गिक खाद्याच्या जोडीला असलेले पूरक खाद्य, मत्स्यजिऱ्याला किंवा बीजाला दिल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. भाताचा कोंडा आणि शेंगदाण्याची पेंड यांचे समप्रमाणात मिश्रण हे पूरक खाद्य म्हणून वापरता येते. मत्स्यसंवर्धनामध्ये वापरावयाच्या पूरक खाद्याचे प्रमाण हे संवर्धनाच्या सुरवातीला माशांच्या वजनाच्या दहा टक्के तसेच शेवटी एक ते दोन टक्के एवढे असावे. हे प्रमाण खालील बाबींवर अवलंबून असते.
- साठवणुकीचे प्रमाण
- बोटुकलीची वाढ
- संवर्धनाचा कालावधी

(2) संवर्धन तलावाचे व्यवस्थापन - संवर्धनासाठी मत्स्यबीज सोडण्याचे प्रमाण हे संवर्धन तळ्याची उत्पादकता व आकार, किती दिवसांत त्यातून मत्स्यबोटुकली बीज काढणे शक्‍य होईल यावर अवलंबून असते. चांगली उत्पादकता असणाऱ्या आणि 50 ते 100 चौरस मी. आकाराच्या तळ्यात 1.5 ते 2.5 महिने संगोपन करून 60 ते 70 मि.मी. लांबीची बोटुकली काढावयाची असल्यास हेक्‍टरी 80 हजार ते एक लाख बीजाची साठवणूक करता येते.

(3) उत्पादक तलाव व्यवस्थापन -
तळ्यांच्या नैसर्गिक सुपीकतेला जोड म्हणून खते वापरून तळ्याची उत्पादकता वाढविणे फायदेशीर ठरते. जमिनीचा दर्जा आणि सामू लक्षात घेऊन प्रति हेक्‍टरी 200 ते 500 कि.ग्रॅ. चुना एकदाच वापरावा.
सेंद्रिय व रासायनिक खतांचे प्रमाण सामान्यतः खालीलप्रमाणे असावे.

मोहाची पेंड वापरली असेल तर पहिल्या महिन्यात शेण देण्याची आवश्‍यकता नाही. कारण पेंड हेच उत्कृष्ट खत आहे. निवडक जातीची बोटुकली तळ्यात 10 ते 15 सें.मी. लांबीची असताना सोडावी. तळ्यामध्ये संहारक मासे नसतील तर बोटुकली लहान (सहा ते आठ सें.मी.) असली तरी चालतात. बोटुकली दूरवरून आणली असल्यास प्रथम ती हाप्यामध्ये 24 ते 48 तास ठेवावी. नंतर त्यामधील निरोगी बोटुकली निवडून व मोजून तळ्यात सोडावीत. रोगट व जखमी बोटुकली तळ्यात सोडू नयेत. मत्स्य बोटुकली तळ्यात सोडण्यापूर्वी ती तीन टक्के तीव्रतेच्या मिठाच्या द्रावणात किंवा फिकट गुलाबी पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणात दहा मिनिटे ठेवून मगच सोडणे अधिक चांगले ठरते. वरील आकाराची बोटुकली पाच ते दहा हजार नग प्रति हेक्‍टर या प्रमाणात तलावाच्या उत्पादकतेनुसार साठवणूक करावी.
उत्पादक तलावात माशांची साठवणूक खालीलप्रमाणे करावी.

उत्कृष्ट मत्स्यशेतीसाठी आणि अधिकाधिक मत्स्य उत्पन्नासाठी केवळ नैसर्गिक उत्पादकतेवर अवलंबून राहून चालत नाही. नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्यही देणे अत्यंत आवश्‍यक आहे. शेंगदाणा पेंड आणि भाताचा कोंडा यांचे समभाग मिश्रण माशांना पूरक खाद्य म्हणून वापरतात. हे पूरक खाद्य माशांना दररोज ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळीच द्यावे. म्हणजे माशांना त्याची सवय होऊन ते त्या वेळी खाण्यासाठी जमतील आणि अन्न वाया जाणार नाही. पेंड आणि भाताचा कोंडा काही तास पाण्यात भिजवून त्याचे घट्ट गोळे बनवून माशांना द्यावेत.

साधारणपणे तीन ते चार महिन्यांपासून माशांच्या आवश्‍यकतेनुसार तीन ते चार दिवसांचे खाद्य म्हणजेच शेंगदाण्याची पेंड आणि भाताचा कोंडा एकत्रित करून एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरावा. त्या बॅगेला करंगळीच्या आकाराएवढी भोके पाडावीत. त्यानंतर या पिशवीच्या दोनही बाजूंना दोरी बांधून ती तलावाच्या मध्यभागी राहील अशी ठेवावी. माशांना खाद्याची सवय झाल्यावर मासे पिशवीला असलेल्या भोकातून येणारे खाद्य खातात. खाद्य संपून पिशवी पाण्यावर तरंगती दिसल्यास त्यामध्ये पुन्हा खाद्य भरून द्यावे. अशा प्रकारे खाद्य दिल्यास ते कमी वाया जाते, तसेच बाजारामध्ये विविध कंपन्यांचे पाण्यावर तरंगणारे कृत्रिम खाद्य उपलब्ध आहे.
माशांना पूरक खाद्याचे प्रमाण खालीलप्रमाणे द्यावे.

संपर्क - 022 - 27452775
(लेखक शार्दूल गांगण, डॉ. के. डी. पाटील हे खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे आणि डॉ. राम निर्मळे हे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जिल्हा रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment