Wednesday, 20 March 2013

बीजोत्पादन दाखवते मार्ग आर्थिक उन्नतीचा


बियाणे क्षेत्रातील कंपनी व शेतकरी यांच्यात संकरित भाजीपाला बीजोत्पादन कार्यक्रम कसा चालतो याबाबत काही माहिती आपण कालच्या भागात घेतली. मराठवाड्यात बीजोत्पादनाचे असे अनेक पट्टे पाहायला मिळतात. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत ही बीजोत्पादन शेती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. जालना जिल्ह्यातील पोखरी (सिंदखेड) गावचे शेतकरी काही वर्षांपासून खासगी कंपन्यांसाठी बीजोत्पादन घेतात. त्यातील काही निवडक प्रातिनिधिक उदाहरणे.

दुष्काळातही मिरचीने वाचवले दत्ता जगन्नाथ खरात यांच्या टोमॅटो बीजोत्पादन प्लॉटविषयी माहिती कालच्या भागात पाहिली. दुष्काळी स्थितीतही अन्य पिके जगवणे जिथे मुश्‍कील झाले होते तिथे खरात यांनी टोमॅटोसोबत मिरचीचाही बीजोत्पादन प्लॉट चांगल्या प्रकारे निभावण्याचा प्रयत्न केला होता.

जानेवारीतील त्यांच्या सुमारे 10 गुंठे मिरची प्लॉटची ही परिस्थिती- -या वेळी मिरचीचे हार्वेस्टिंग जवळपास संपले होते.
-दोन ओळींतील अंतर पाच फूट, तर दोन झाडांतील अंतर तीन फूट.
-बेड अडीच फुटाचा असून लांबी 110 फूट.
-प्रत्येक नेटचा आकार ठरलेला. 120 फुटांत बेड घेतला तर लांबी 110 फूट मिळते.
पाच फूट प्रत्येकी दोन्ही बाजूंस सोडली जाते.
-रोपांची संख्या- मादी 600, नर- 300 प्रति 10 गुंठे

बीजोत्पादन कालावधी- मिरची- सहा ते सात ते आठ महिने, टोमॅटो- चार ते पाच महिने.

बीजोत्पादनातून आर्थिक उन्नती
राजीव खरात यांचा बीजोत्पादन कार्यक्रम दृष्टिक्षेपात.

-एकूण शेती सात एकर, त्यातील बीजोत्पादन क्षेत्र दोन एकर.
-दोन हंगामांत बीजोत्पादन कार्यक्रम (यात पाच वर्षांचा अनुभव)
त्यातील पिके- टोमॅटो, मिरची, काकडी- (क्षेत्र प्रत्येकी सुमारे 10 गुंठे )
-व्यापारी शेतीच्या तुलनेत बीजोत्पादनातून दुपटीपर्यंत फायदा होऊ शकतो.

-बीजोत्पादनातील दर प्रति किलो (वाणानुसार बदलतात) मिरची- प्रति किलो- 2000 ते 2300 रु.
टोमॅटो- 12 ते 14 हजार रु.

-किमान 10 गुंठ्यांत टोमॅटोतून उत्पन्न- एक लाखापर्यंत, उत्पादन खर्च- 40 हजार रु.
-या वर्षी दुष्काळ होता. मात्र विहिरी, बोअरवेल यातून प्रयत्न करून पाणी कमी पडू दिले नाही.
-टोमॅटो, मिरचीसोबत काकडीचाही बियाणे प्लॉट होता. दुष्काळात बीजोत्पादनाने साथ दिली. पिकांची अवस्था चांगली राहिली.
-बियाणे कंपनीशी लेखी करार असतो. धोका काही नाही.
-पॉलीनेशन किंवा सर्व तांत्रिक बाबींमध्ये कुशलता मिळवली आहे.

दत्ता खरत- -एकूण क्षेत्र 10 एकर, बीजोत्पादन- दोन एकर
-पावसाळ्यात काकडी, ढोबळी मिरची व टोमॅटो
-सात वर्षांपासून बीजोत्पादन. एका कंपनीसोबत पेमेंटबाबत अडचण आली, त्यानंतर त्या कंपनीसोबत काम करणे बंद केले.

बीजोत्पादनासाठी रेट असे मिळतात. (प्रति किलो)
काकडी- 2200 रु.
साधी मिरची- 1900 रु.
सिमला मिरची- 11,000 रु.
टोमॅटो- 14, 000 रु.

उत्पादन खर्च असा असतो. (10 गुंठे) काकडी- 30 ते 35 हजार रु., टोमॅटो- 50 हजार, तिखट मिरची-70 ते 80 हजार रुपये.
स्वीट पेपर- 30 ते 35 हजार रु.

उत्पादन- 10 गुंठे- तिखट मिरची- सुमारे एक क्विंटल 30 किलो
सिमला मिरची- दुष्काळी परिस्थितीत 25 किलो उत्पादन अपेक्षित.
टोमॅटो उत्पादन- 10 ते 20 किलो (वाणानुसार)

यंदा पाण्याची झळ जोरात बसली. काकडीला पाणी पुरले नाही. त्यानंतर थोडा पाऊस आल्यावर त्यात थोडे भागवले. त्यानंतर बोअर घेतले. बियाणे प्लॉटला पाणी कमी पडू दिले नाही. ड्रीपसोबत मल्चिंगही केले तर मध्यम प्रमाणातील पाणीही पुरते.
-अजूनपर्यंत कंपनीकडून फसवणुकीचा अनुभव नाही. मात्र पॉलीनेशन वा बियाणे वेगळे करण्याची प्रक्रिया योग्य पार पाडली नाही तर प्लॉट नापास होऊ शकतो.
-नेहमीच्या शेतीत बाजारभावांचे काही खरे नाही. त्या तुलनेत बीजोत्पादन परवडते. यात मार्केट ढासळण्याची भीती नाही. 10 गुंठ्यांत नेहमीच्या शेतीत 10 हजार रुपये मिळतील याची गॅरंटी नसते. त्याचवेळी 10 गुंठ्यांत बीजोत्पादन एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देते. काहीवेळा जास्तही रक्कम मिळते. भावाची हमी असते.
-सात वर्षांपासून बीजोत्पादनात कुशल झालोय.

यंदा दुष्काळातही बीजोत्पादन फेल गेले नाही. बोअर, ड्रीप, मल्चिंग केले आहे. शेततळे करणार आहे. बीजोत्पादनात हमी भाव असतो. दुसरी बाजू म्हणजे मजूर जास्त लागतात. पॉलीनेशनपासून ते बी काढणीपर्यंत विविध टप्पे असतात. दरवर्षी महागाई वाढते. तुमचे एकाच कंपनीसोबत कायमचे संबंध असतील तर कंपनीच शे- दोनशे रुपये रेट दरवर्षी वाढवतेही.

बीजोत्पादनातून शेतकरी काय शिकले? -योग्य उत्पादनासाठी हवामान चांगले निवडावे.
-पॉलीनेशन, बी वेगळे करणे, प्रूनिंग, रोग-कीटक पाहिल्याबरोबर त्वरित उपाययोजना. रोगांची ओळख होणे गरजेचे. शेतात पालापाचोळा तसाच न ठेवता ताबडतोब त्याची विल्हेवाट लावणे.
-रोपांत भेसळ होऊ नये यासाठी दोऱ्यांचे टॅग. योग्य विलगीकरण अंतर
शेडनेटच्या अँटी चेंबरमध्ये हात, पाय विशिष्ट द्रावणाने निर्जंतुकीकरण करून मगच शेडनेटमध्ये प्रवेश
-शेडनेटमध्ये हिरवा ऍप्रन घालावा लागतो.
पोखरी गावात बहुतांश शेतकरी बीजोत्पादन करतात.

No comments:

Post a Comment