Friday, 29 March 2013

फुलली शेती टिश्यू कल्चर डाळिंबाची

अहमदनगर जिल्ह्यातील कनकुरी (ता. राहाता) येथील शिवाजी मारुती दुशिंग यांनी ऊस पिकाला रामराम ठोकून डाळिंबाची लागवड केली. पदार्पणातच त्यांनी अडीच एकरांवर टिश्यू कल्चर डाळिंबाची बाग फुलवत पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या टिश्यू कल्चर डाळिंब शेतीची प्रेरणा घेऊन अनेक शेतकर्‍यांनी आपापल्या गावांत बरड माळरानाला ‘हिरवा साज’ चढविला आहे. अगदी अठरा महिन्यांतच भरघोस उत्पन्न मिळवून देणारे हे टिश्यू कल्चर डाळिंब कृषी विभागाच्याही कौतुकाचा विषय ठरले आहे.
डाळिंबाचे नाव निघाले की, महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, संगमनेर, औरंगाबाद, जालना हा भाग डोळ्यांसमोर येतो. आता अवर्षणप्रवण पट्ट्यातील शेतकर्‍यांनीही डाळिंब शेतीकडे मोर्चा वळविला आहे. पाटपाण्याच्या पट्ट्यातही अनेकांनी उसाला पर्याय म्हणून डाळिंबाचे पीक घेऊन प्रगती साधली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील राहाता तालुका भंडारदरा धरणाच्या कालव्यावर अवलंबून आहे. उसाचा पट्टा म्हणून नावलौकिक असलेल्या राहाता तालुक्यातील शिवाजी दुशिंग या शिक्षकाने उसाचे पीक परवडत नसल्याने जैन टिश्यू कल्चर डाळिंबाची लागवड करून पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. वडील मारुती दुशिंग यांच्या मदतीने डाळिंबाचे उत्पादन घेत त्यांनी इतरांना आधुनिक शेतीची वाट दाखविली आहे.
डाळिंबाला हाय, उसाला बायबाय !
शिवाजी दुशिंग हे संगमनेर तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरी करतात. नोकरी करत-करत त्यांनी आपल्या शेतात डाळिंबाची बाग फुलवली. त्यांचे वडील मारुती दुशिंग हे संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यात ‘बॉयलर अटेंडंट’ म्हणून काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेती करण्याचे ठरवले. शिवाजीरावांनाही आधुनिक पद्धतीने शेती करून काहीतरी करण्याची हौस होती. २००७ साली मारुती दुशिंग हे सेवानिवृत्त झाले. साखर कारखान्याला घातलेल्या उसाचे पैसे तीन टप्प्यांत मिळायचे. शिवाय, उसाच्या दर ठरवण्यातही कारखान्यातील संचालकांची मक्तेदारी असायची. यामुळे ऊसशेतीला फाटा देऊन नवीन पीक घेण्याचा दुशिंग यांचा विचार होता.
‘जैन कंपनी’च्या टिश्यू कल्चर डाळिंबाची निवड
बाजारपेठेचा अंदाज घेत ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची लागवड करण्याचे ठरवले. त्यावेळी डाळिंब उत्पादक बजरंग पावसे (रा. हिवरगाव पावसा), नानासाहेब वामन (रा. जवळे कडलग), ‘क्रॉप गोल्ड’ कंपनीचे संचालक बापू वाघ, ‘युनिमॅक्स’चे बी. टी. गोरे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतील डाळिंबाच्या बागा ‘मर’ व ‘तेल्या’ रोगग्रस्त असल्याचे समजले. तेथील गुटी कलम आणण्यापेक्षा अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांकडून डाळिंबाची कलमे आणण्याचे ठरवले. त्यानुसार प्रति १५ रुपयाने एक हजार गुटी कलमे आणून लागवडीचे नियोजन केले. मात्र, त्याचवेळी ‘आरक्ता’बरोबरच आता ‘जैन इरिगेशन कंपनी’ने डाळिंबाच्या ‘भगवा’ जातीची टिश्यू कल्चर रोपे बाजारात आणल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यानुसार गुटी कलमे फेकून देऊन ‘जैन इरिगेशन कंपनी’ची विश्‍वासार्हता व टिश्यू कल्चर केळीच्या यशोगाथा यांचा विचार करून मी एक हजार टिश्यू कल्चर रोपांचे बुकिंग केले, असे दुशिंग यांनी सांगितले.
‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ गरजेचे
डाळिंबाची मालकाडी बळावण्यासाठी छाटणी तंत्राकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे दुशिंग सांगतात. ते म्हणाले की, डाळिंब ही जंगली झुडूपवर्गीय वनस्पती आहे. तरीही छाटणीद्वारे मालकाडी तयार करून झाडाला डेरेदार आकार देण्यासाठी ‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ करणे गरजेचे असते. लागवडीसाठी माती व पाणी परीक्षण करून डिसेंबर २००९ मध्ये रान तयार करून ठेवले होते. त्यावर खड्डे घेऊन त्यात ५० ग्रॅम फ्युरोडॉन टाकून ठेवले. २०१० च्या जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात एक हजार झाडांसाठी प्रत्येकी एक किलो याप्रमाणे ५०० किलो शेणखतात डॉर्स सेंद्रिय खत, ‘आनंदन कंपनी’चे निंबोळी, एरंड व करंजाचे मिश्रखत, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, बॅसिलोमायसिस, ऍझोटोबॅक्टर, स्फूरद विरघळवणारे जिवाणू, पोटॅश ऍटिव्हा, वॅम प्लस, न्यूट्रिमॅक्स, ई.एम. द्रावणासह एकूण एक हजार किलोचे कल्चर तयार केले. लागवडीच्या आदल्या दिवशी दोन तास ठिबक चालवून वाफशावर खड्ड्यात हे कल्चर टाकून त्यात १३ बाय १० फूट अंतराने रोपांच्या हुंडी लावल्या. अनेकदा कोरड्या जमिनीत उष्णतेने रोपांना ‘शॉक’ बसतो. हे टाळण्यासाठी वाङ्गशावर लागवड करावी.
तसेच लागवडीनंतर दोन महिन्यांत रोपांच्या मुळ्या जमिनीत स्थिर होताना व त्यानंतरही झाडांना बुरशीमुळे येणारा ‘मर’ रोग टाळण्यासाठी बुरशीनाशकांचे कल्चर वापरणे गरजेचे असते. झाडांना चांगला आकार देतानाच कोणत्याही बांबूकाठीचा आधार देणे टाळावे. लागवडीतील चुकांमुळेच अनेकदा पुढील नियोजन बिघडते. त्यामुळे लागवडीचे योग्य नियोजन करून लागवडीनंतर ‘कॅनॉपी’ व्यवस्थापन करावे. त्यासाठी पहिल्या वर्षी चार छाटण्यांचे नियोजन करून पहिली छाटणी लागवडीनंतर साडेतीन महिन्यांनी केली. छाटणीत प्रत्येक फांदीला इंग्रजी ‘वाय’ आकार देण्यासाठी शेंडे तोडावे लागतात. यासाठी जैन कंपनीचे ऍग्रोनॉमिस्ट चेतन गुळवे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
वर्षातच फळधारणेचे नियोजन
टिश्यू कल्चर डाळिंबाच्या रोपांची जोमाने वाढ होत असल्याने दुशिंग यांनी वर्षातच फळधारणेसाठी बाग ताणावर सोडली व विसाव्या महिन्यांपर्यंत एकूण साडेसहा लाख रुपये खर्चून १३ टन माल दहा लाख रुपयांना विकला. याविषयी त्यांनी सांगितले की, लागवडीनंतर या रोपांची वेगाने वाढ झाली. वेळोवेळी छाटणी केल्याने डिसेंबर २०१० मध्ये झाडांना साठ दिवसांच्या ताणावर सोडले. चांगली पातेगळ झाल्याने चालू वर्षी २ मार्चला पाणी देऊन बहाराचे नियोजन केले. लागवडीपासूनच अनेकदा शेतकरी डाळिंबाच्या रोपांना बांबूच्या काठ्या उभ्या करून आधार देतात. या झुडपाला आधाराची गरजच नसते. फक्त फळधारणा झाल्यानंतर फळसंभाराने फांद्या तुटू नयेत यासाठीच थोडासा आधार पुरेसा असतो. त्यासाठी जमिनीत खड्डे घेऊन गॅल्व्हनाईज्ड तारेने दगडास बांधल्यानंतर बांबूंना तारेचा आधार द्यावा. झाडांना सहा बाजूंनी ड्रिपरने पाणी दिल्यानेही आधाराची गरज कमी झाली. बांबूमध्ये बोअर किटक राहू शकत असल्याने बांबूला क्लोरोपायरिफॉसच्या द्रावणात प्रक्रिया करून वापरावे. तसेच जमिनीत खोचाव्या लागणार्‍या बांबूच्या बाजूस डांबर लावावे. योग्य नियोजनातूनच डाळिंबाची बाग फुलते. आम्हाला लागवडीनंतर टिश्यू कल्चरच्या या झाडांना हवामानानुसार येणार्‍या कळ्या तोडण्यासाठी वर्षभर एका मजुराला कामावर ठेवावे लागले. एप्रिलमध्ये एका-एका झाडाला पाचशेपर्यंत कळ्या आल्या होत्या. मात्र, फधारणेसाठी इतर कळ्या तोडून प्रतिझाड शंभर कळ्या स्थिर करण्याचे नियोजन ठेवले. जैन कंपनीच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी थेट बांधावर येऊन मार्गदर्शन केले. सप्टेंबरमध्ये तोडणीला आलेल्या काही फळांचे वजन ८०० ग्रॅमपर्यंत भरले. पहिलाच तोडा असल्याने झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी झाडांच्या क्षमतेपेक्षा जास्त फळे ठेवले असल्याने सरासरी ४०० ग्रॅमची फळे आली. पाकोळीने हल्ला केल्याने सुमारे एक टन फळे पंक्चर झाल्याने फेकावी लागली. बाजारात आमच्या फळांची गोडी व चकाकी यामुळे ११० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळाला.
टिश्यू कल्चरची दर्जेदार फळे
पस्तीस वर्षांपासून गुटी कलमांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड करून डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत. मात्र, दुशिंग यांच्या बागेची २६ मे २०१२ रोजी पाहणी केल्यावर आतापर्यंतची सगळ्यात दर्जेदार फळे मी पाहिली. दुशिंग यांच्या बागेतील पंधरा महिन्यांच्या झाडांच्या खोड व फांद्यांनाच फळे आहेत. ही बाग पाहून खूप समाधान वाटले.
- मोहन देशमुख,
रा. जवळे कडलग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
…अन् लखपती झालो !
साखर कारखान्यात मी ४५ वर्षे काम केले. महिन्याचा पगार अन् त्यानंतर रिटायरमेंटची मिळकत आतापर्यंत पाहिली. शेतीतूनही लखपती होता येतं, हे टिश्यू कल्चर डाळिंबातून अनुभवले. आपल्याकडचे शेतकर्‍यांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची मनोवृत्ती जास्त असून, चांगले सल्ले न देता शेतीतून लांब जाण्याचाच सल्ला अनेक जण देतात. आमच्या शेतातील ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची बहारदार बाग पाहण्यासाठी बाहेरच्या राज्यातून अनेक शेतकरी येऊन गेले आहेत. आम्ही शेतकर्‍यांना सगळी माहिती देतो; परंतु शेतकर्‍यांनी बागेत फेरफटका मारल्याने ‘तेल्या’ रोगाचा प्रसार होत असल्याने आम्ही आता बाग लांबूनच दाखवतो.
- मारुती दुशिंग,
रा. कनकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर
सुयोग्य नियोजनाचा फायदा
आमच्या कंपनीतर्फे दर्जेदार टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करून दिली जातात. शिवाजी दुशिंग यांनी काटेकोर नियोजन करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. त्याचा फायदा यापुढेही त्यांना मिळेल. कंपनी तुर्कस्तान येथील डाळिंबतज्ज्ञ डॉ. ओनुर यांचेही शेतकर्‍यांना थेट मार्गदर्शन अनेकदा उपलब्ध करून देते. दशकभराच्या अथक परिश्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाने प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात तयार केलेल्या या टिश्यू कलचर डाळिंबातून अनेकांनी प्रगती केली आहे. बरड माळरानाच्या जमिनीसाठी हे पीक वरदान ठरले आहे. जास्त पाणी लागत नसल्याने शक्यतो पावसाळा वगळता इतर ऋतूंमध्येच या डाळिंब रोपांची लागवड करावी. तसेच सहा ड्रिपरचा वापर केल्याने फायदा होतो. प्रयोगशाळेत पेशी विभाजनातून रोपे तयार करताना वापरलेल्या संप्रेरकांमुळे या झाडांची वाढ वेगाने होते. मात्र, पांढरी मुळी कार्यक्षम राहण्यासाठी ४ लिटर/तासापेक्षा जास्त पाणी देणारे ड्रिपर वापरू नयेत.
- डॉ. अनिल पाटील,
प्रॉडक्शन मॅनेजर, जैन टिश्यू कल्चर, जळगाव

No comments:

Post a Comment