Friday, 15 March 2013

सुधारित तंत्रातून साधली दर्जेदार भेंडी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पट्ट्यामध्ये भेंडीचे पीक चांगले रुजलेले आहे. या तालुक्‍यातील वैशाखरे येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र घरत यांनी सुधारित पद्धतीने भेंडी लागवड केली आहे. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा अवलंब करीत त्यांनी दर्जेदार भेंडीचे उत्पादन घेतले आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी घरत यांची शेती मार्गदर्शक बनली आहे. मारुती कंदले
गेल्या काही वर्षांपासून वाढता उत्पादन खर्च, घटते उत्पन्न आणि दरातील चढ- उतारामुळे मुरबाड तालुक्‍यात भेंडी लागवड कमी होत आहे; परंतु ठाणे, मुंबई, पुण्यासारख्या बाजारपेठेत दर्जेदार भेंडीला मिळत असणारा दर लक्षात घेऊन वैशाखरे (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र घरत यांनी भेंडीची लागवड कमी न करता सुधारित लागवड तंत्राचा अवलंब करीत दर्जेदार भेंडी उत्पादन घेण्यास सुरवात केली. या प्रयत्नाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे.

सुधारित पद्धतीने भेंडी लागवडीबाबत माहिती देताना रवींद्र घरत म्हणाले, की आमच्या भागात गेल्या 20 वर्षांपासून भेंडीची लागवड केली जाते. शहरी बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने आम्ही भात कापणीनंतर भेंडी लागवडीचे दरवर्षी नियोजन करतो. सध्याच्या काळात खते, कीडनाशके, बियाण्यांचा वाढता दर, मजुरांची टंचाई आणि बाजारपेठेतील दररोजचे चढ-उतार यामुळे भेंडी लागवडीतून अपेक्षित नफा कमी होत चालला होता; परंतु मी यंदाच्या वर्षी दोन एकर क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने भेंडी लागवड न करता ठिबक सिंचन, पॉलिथिन मल्चिंग पेपर, एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करीत दर्जेदार उत्पादन घेत आहे. सुधारित तंत्रामुळे पाण्याची बचत केली, खुरपणीचा खर्च वाचविला. पारंपरिक पद्धतीपेक्षा मला दीडपट उत्पादनात वाढ मिळाली.

अशी केली भेंडी लागवड - सुधारित पद्धतीने भेंडी लागवडीबाबत घरत म्हणाले, की माझी चार हेक्‍टर जमीन आहे; परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे यंदा दोन एकर भेंडीची लागवड केली आहे. लागवडीसाठी संकरित जात निवडली. भात काढणी करून, ऑक्‍टोबर महिन्यात जमिनीची मशागत करून चार फूट रुंद आणि शेताच्या लांबीनुसार वाफे तयार करून घेतले. त्यानंतर पुरेसे शेणखत आणि 70 किलो 15ः15ः15 रासायनिक खत मिसळून दिले. त्यानंतर वाफ्यावर दोन लॅटरल अंथरल्या. वाफ्यावर 30 मायक्रॉनचा चंदेरी रंगाचा मल्चिंग पेपर अंथरला. दोन ओळींत 40 सें.मी आणि दोन रोपांत 20 सें.मी. अंतरावर लागवड करण्याच्यादृष्टीने पेपरला छिद्रे पाडून घेतली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गादीवाफ्यावरील मल्चिंग पेपरच्या प्रत्येक छिद्रामध्ये दोन बिया टोकल्या. एकरी तीन किलो बी लागले. बाजारात बियाणे खरेदी करताना शेतकरी गटाच्या माध्यमातून थेट कंपनीकडूनच बियाणे खरेदी केले, त्यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात बियाणे मिळाले. लागवडीच्या वेळी पहिल्यांदा ठिबक सिंचनाने तीन तास पाणी दिले, त्यानंतर आता पिकाच्या गरजेनुसार दररोज एक तास पाणी दिले जाते. पिकाच्या वाढीच्यादृष्टीने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 19ः19ः19 आणि 0ः52ः34 या विद्राव्य खतांचा आलटून पालटून दर तीन दिवसांनी शिफारशीनुसार वापर करतो. पीकवाढीच्या काळात तुडतुडे, मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दर दहा दिवसांच्या अंतराने कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. फळांचे उत्पादन सुरू झाले की फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असतो. यंदाच्या वर्षी मी दोन एकरांत 12 कामगंध सापळे लावले आहेत. या सापळ्यांत किडीचे पतंग येऊन अडकतात, त्यामुळे पिकावर या किडीचा प्रादुर्भाव अटोक्‍यात आला. नियंत्रणासाठीच्या किमान तीन फवारण्या वाचल्या. फवारणीतील अंतर वाढले. शेतात चिकट सापळे लावले आहेत. या सापळ्यांमुळे रसशोषक किडीचे नियंत्रण होत आहे. कीडनाशकांच्या फवारणीसाठी एचटीपी पंप घेतला आहे, त्यामुळे योग्य प्रमाणात फवारणी होते. मजुरांचा खर्च वाचला. गरजेनुसार पिकाला दशपर्णी अर्काचा वापर केला जातो, त्यामुळे पिकाची चांगली वाढ दिसून आली. शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली जाते.

उत्पादनाचे गणित - भेंडी उत्पादनाबाबत घरत म्हणाले, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडणी सुरू झाली. पहिला तोडा 132 किलोचा झाला. त्यानंतर एक दिवसाआड तोडणी सुरू आहे. खते, पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन सुरू झाले. मधल्या टप्प्यात प्रत्येक तोड्याला चार क्विंटलपर्यंत भेंडी उत्पादन मिळाले. सध्या 2.5 क्विंटलचे उत्पादन मिळत आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये भेंडीचा हंगाम मार्चमध्येच संपून जात होता आणि उत्पादनही एकरी चार ते साडेचार टनांपर्यंतच मिळत होते; परंतु आता आच्छादन केल्याने पाण्याची बचत झाली. हे पीक आता जूनपर्यंत चालेल असे वाटते. चालू हंगाम संपेपर्यंत एकरी आठ ते नऊ टन भेंडी मिळेल असा अंदाज आहे.

आमच्याकडे व्यापारी येऊन थेट शेतातच खरेदी करतात. मी भेंडी तोडणीनंतर लहान आणि मोठी भेंडी अशी प्रतवारी करतो, त्यामुळे दरही चांगला मिळतो. प्रतवारी केलेली भेंडी क्रेट आणि 40 किलोच्या पोत्यांत भरून बाजारपेठेत पाठविली जाते. जानेवारीमध्ये मला प्रति किलोला 30 ते 32 रुपये आणि फेब्रुवारी- मार्चमध्ये 18 ते 20 रुपये असा दर मिळतो आहे. यंदाच्या वर्षी सरासरी 25 रुपये प्रति किलो असा दर मिळेल असा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत सरासरी 18 ते 25 रुपयांच्या दरम्यान भेंडीचा दर राहिला आहे. सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मजुरी, पाणी, वीज, खते यांच्यावरील खर्चात अर्ध्याहून अधिक बचत झाली. दोन एकरांतील भेंडीला लागवडीपासून काढणीपर्यंत 90,000 रुपये खर्च झाला. सध्याचा दर पाहता खर्च वजा जाता हंगामाअखेर एक लाख रुपये नफा मिळेल असा विश्‍वास आहे.

ठिबक, आच्छादन ठरले फायद्याचे... घरत यांना भेंडी लागवडीत मल्चिंग पेपरचा वापर फायदेशीर ठरला. या पेपरमुळे तणनियंत्रण झाले. पूर्वी तणनियंत्रण, पीक व्यवस्थापनासाठी किमान 15 हजार रुपये खर्च येत होता. मल्चिंग पेपरचा आतला भाग काळा आणि वरचा भाग चंदेरी रंगाचा असल्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले, तसेच त्यामुळे कीटकही पिकाजवळ येत नाहीत. लागवड सुटसुटीत झाली. तोडणी करताना भेंडी अंगाला घासत नाही, परिणामी अंगाची खाज टळली. त्यामुळे मजूरही आवडीने कामाला येतात. कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर तोडणी पूर्ण झाल्याने मजुरी खर्चात बचत झाली. ठिबकमुळे भेंडीला दिवसातून अर्धा तास पाणीपुरवठा केला तरी पुरेसा ठरतो. पाणीवापरात 60 टक्के बचत झाली. उत्पादनात दीडपट वाढ मिळाली.

कृषी विभागाचे मार्गदर्शन - घरत यांनी कृषी विभागाकडून मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतला. मल्चिंग पेपरला एकरी दहा हजार रुपये खर्च होतो, त्यामागे चार हजार रुपयांचे अनुदान मिळाले. ठिबक सिंचन प्रणाली आणि एसटीपी पंपासाठीही पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे. घरत यांनी शेतात पॅक हाऊसची उभारणी केली आहे. या ठिकाणी भेंडीची प्रतवारी आणि पॅकिंग केले जाते. पॅक हाऊससाठी पन्नास टक्के अनुदान मिळाले. येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन घरत यांनी शेततळे केले आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रयोग आत्मा योजनेअंतर्गत तालुक्‍यात भेंडीच्या लागवडीसाठी प्रथमच मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि पहिल्याच प्रयोगाला चांगले यशही मिळाले. उत्पादन खर्चात बचत साधताना उत्पन्न वाढण्यासही मोलाची मदत झाली. आत्माअंतर्गत स्थापन झालेल्या कनकविरा शेतकरी गटाच्या माध्यमातून घरत यांच्यासह आणखी तीन शेतकऱ्यांनी भेंडीच्या लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगला ठिबकची सुयोग्य सांगड घालत बाळू शंकर टोहके, एकनाथ बाबू ठाकरे आणि वसंत रामचंद्र देशमुख या शेतकऱ्यांनीही चांगले उत्पन्न घेतले आहे. तालुका कृषी अधिकारी डी. एस. घोलप, मंडळ अधिकारी ए .पी. वडते, आत्माचे गोकुळ जाधव, कृषी सहायक मनीष राठोड, मनोज कदम यांचे शेतकरी गटाला मार्गदर्शन मिळते.

रवींद्र घरत - 8806834362

1) मल्चिंग पेपरच्या वापरामुळे कमी खर्चात भेंडीचे दर्जेदार उत्पादन मिळाले.
2) सुटसुटीत लागवडीमुळे कमी वेळेत अधिक तोडणी शक्‍य झाली.
3) पॅक हाऊसमध्ये घरत कुटुंबीय भेंडीची वर्गवारी करतात.
4) कीडनियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर.

No comments:

Post a Comment