Tuesday, 5 March 2013

सकस तेच पिकवायचं थेट ग्राहकांनाच विकायचं!

सातारा जिल्ह्यातील निनामपाडळी येथील कृषक आश्रमाचे श्रीरंग सुपनेकर यांनी शाश्‍वत शेतीतून शाश्‍वत बाजारपेठ या सिद्धांतावर आधारित शेतीपद्धती आकाराला आणली आहे, त्यासाठी कृषक आश्रमाचं मॉडेल विकसित केलं. परिसरातील शेतकऱ्यांच्या गटांना सोबत घेऊन पुण्यातील काही रहिवासी सोसायट्यांना थेट शेतीमालाची विक्री पद्धतीही त्यांनी यशस्वीपणे सुरू केली आहे.
 मंदार मुंडले 
हॅलो, कृषक आश्रम? पुण्यावरून एका रहिवासी सोसायटीचा (रेसिडेन्सल) चेअरमन बोलतोय. तुम्ही विविध प्रकारचा भाजीपाला थेट ग्राहकांना पुरवता असं कळलं. आमच्या सोसायटीत सहाशे कुटुंबं राहतात. आम्हाला नियमित माल पुरवू शकाल का?

हा कॉल संपतो, तोपर्यंत दुसऱ्या सोसायटीचा कॉल. त्यांचंही हेच म्हणणं, आम्हाला भाजीपाला, फळं पुरवू शकाल का? दररोजच ग्राहकांचे असे कॉल घेऊन- घेऊन कृषक आश्रम संस्थेचे शेतकरी थकून गेले; मात्र हैराण झालेले नाहीत. उलट प्रत्येक कॉलगणीक त्यांचा उत्साह वाढतच आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट बाजारपेठ किती आश्‍वासक आहे, हे त्यांना प्रत्यक्ष दिसू लागलं आहे.

आज चांगली शेती किंवा पीक उत्पादनवाढ या गोष्टी शेतकऱ्याच्या हाती आहेत; पण आपल्या मालाचे दर आपण ठरवायचे आणि त्यातून मनासारखा फायदा शेतीत कमवायचा, हे मात्र त्याच्या हातात नाही. शेतकरी ते ग्राहक अशी थेट बाजारपेठ सक्षम होणं, हे त्यावरचं चांगलं उत्तर आहे आणि कृषक आश्रमाने नेमकी हीच गोष्ट हेरून आपली वाटचाल सुरू केली आहे.

कृषक आश्रमाची संकल्पना व विस्तार
सातारा जिल्ह्यात निनामपाडळी येथे श्रीरंग सुपनेकर यांचा कृषक आश्रम वसला आहे. ते राहण्यास पुण्याला असले तरी इथली सुमारे 15 एकर शेती ते जाऊन- येऊन सांभाळतात. शेतकरी ते ग्राहक असा थेट शेतीमाल विक्रीचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. तो अभिनव या अर्थाने, की शेतकऱ्याने शेतात माल उत्पादित करण्यापासून ते थेट ग्राहकाच्या घरात तो जाईपर्यंत प्रत्येक टप्प्याचा अभ्यास सुपनेकरांच्या टीमने सूक्ष्मपणे केला आणि त्यानंतर उत्पादन व विक्रीचं कृषक आश्रम मॉडेल विकसित केलं (त्यावर अद्याप काम सुरूच आहे).

सध्या पुण्यात त्यांच्या शेतीमालाची थेट विक्री होते, त्याला ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद आहे; मात्र तेवढ्यावर सुपनेकर समाधानी नाहीत. शहरी ग्राहकांची संख्या, त्यांची शेतीमालाची गरज प्रचंड असल्याचं दृश्‍य त्यांच्यासमोर आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे द्यायचीही ग्राहकांची तयारी आहे, कमतरता आहे फक्त पुरेशा शेतीमालाची. तो उपलब्ध करायचा तर राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे, त्यासाठी त्यांना एकाच छताखाली आणण्याची सुपनेकर यांची धडपड आहे.

त्यांची याबाबतची वाटचाल पाहताना कृषक आश्रमाची शेती पद्धती व विक्री पद्धती असे दोन प्रकार अभ्यासावे लागतील.

शेती पद्धती - सुपनेकर म्हणाले की कृषक आश्रमाची संकल्पना सुमारे दहा वर्षांपूर्वीची. प्रथम शेतीविषयी आमचे सिद्धांत पक्के केले. शेतीत मूलभूत काम केल्याशिवाय उपयोग नव्हता. केवळ शेतीमालाची विक्री हे ध्येय ठेवून फायद्याचं नव्हतं. शेतीतल्या निविष्ठा (इनपुट्‌स) चांगल्या दर्जाच्या असल्याशिवाय तेवढाच चांगला "आऊटपूट' (उत्पादन) मिळणार नाही. भारतीय शेतीला प्राचीन वारसा आहे. ज्ञानाचं प्रचंड भांडार खुलं आहे. संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध आहेत. हे सगळं ज्ञान वाया का घालवायचं? त्यासोबत परदेशांतलं फायदेशीर तंत्रज्ञानही उपयोगात आणायचं. त्यातून कृषक आश्रमाची शेती विकसित होत चालली आहे.

कृषक आश्रम या सिद्धांतावर विश्‍वास ठेवून कार्य करतो - सुस्था भवन्तु कृषका धनधान्यसमान्वितः
(सर्व शेतकऱ्यांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो)

1) वेगवेगळ्या कृषी पद्धतींचा परिचय, त्यातील विज्ञान व तंत्रज्ञानातील घटकांची ओळख, कृषीविषयक विविध विषयांवर संवादासाठीची आश्रम ही योग्य जागा.
2) शेतीत निसर्ग आणि शेतकरी असे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे. आश्रमात प्रत्येक पुरुष व स्त्री ही श्रमिक असून इथे सर्वजण समान आहेत, कोणी लहान वा मोठा नाही, नोकर वा मालक नाही.
3) आश्रमाशी संबंधित शेतकरी मातीची निगा राखतोय. तो मातीशी संघर्ष करत नाही. मातीला अधिक ऊर्जितावस्था येण्यासाठी त्याची धडपड आहे. एखाद्या वेळेस निसर्गाने त्याच्या तोंडचा घास हिरावून नेला, तर तो रागावत नाही. आत्मविश्‍वास आणि प्रतिष्ठेने वावरणारा आनंदी शेतकरी इथे तुम्हाला आढळेल.
4) भारताला प्राचीन काळापासून कृषीची परंपरा आहे. हजारो वर्षांपासून कृषीविषयक निरीक्षणे, परीक्षणे आणि त्याच्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. मुनी पराशर, सुरपाल, मिश्र चक्रपाणी, कश्‍यप आदी ऋषी-मुनींचे अनेक ग्रंथ हा आपला वारसा आहे. पाणी व तंत्रज्ञानासोबत मातीही तितकीच सर्वांत महत्त्वाची आहे.
5) "सोन्याचा धूर' निघणारा देश म्हणून भारताचा गौरव झाला, त्याच्या मुळाशी भारतीय "कृषी सिद्धांतच' होते.
6) शाश्‍वत कृषी पद्धती हीच शाश्‍वत विकासाकडे जाण्याचा मार्ग आहे.

लागवडीतील महत्त्वाच्या बाबी कृषक आश्रमाचं क्षेत्र सुमारे 15 एकर असलं तरी टप्प्याटप्प्याने क्षेत्र पिकांखाली आणण्यास सुरवात केली आहे.
यात सध्या कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, वांगी, पालेभाज्या, कडधान्यं आदी पिकं आहेत. प्रत्येक भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध व्हावी यासाठी ती ठरावीक दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या क्षेत्रावर घेतली जाते. पाण्यासाठी सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन टाकून शेतात विविध ठिकाणी वापरली आहे. माती परीक्षण करून एकरी 40 गाड्या शेणखताचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खते, विद्राव्य खते, संजीवके आदींचा वापर होतो.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय गोवंशावर लक्ष केंद्रित करून शेणखताचा वापर अधिकाधिक होतो. देशी गाईंचे संगोपन आश्रमात केले जाते. रासायनिक खतांचा वापर किमान करण्याचे धोरण आहे. मातीचा पोत सुधारण्याचे प्रयत्न आहेत. भारतीय गोवंश व माती जिवंत ठेवणारी शाश्‍वत कृषी पद्धती आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक विकसित केली आहे. यासंबंधीचे प्रयोग आश्रमात राबवले जातात. गोमूत्राचा वापर कीडनियंत्रणासाठी केला जातो.
आश्रमात बायोगॅसची निर्मिती होते, त्यातून मिळणाऱ्या स्लरीवर पुन्हा प्रक्रिया केली जाते. माती परीक्षणानंतर जमिनीच्या पोतानुसार तिचा शेतात वापर केला जातो. आपण जे अन्न खातो, ते कोणत्या प्रकारच्या जमिनीतून आपण घेतले आहे, हेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


भाजीपाला उत्पादनाची वितरण व्यवस्था -शेतकरी गट
-संकलन व प्रतवारी केंद्र
-प्रक्रिया उद्योग
-शेतकरी भाजीपाला विक्री केंद्र - फ्रॅंचायसी
-ग्राहक
-निवासी सोसायट्या
-दुकानं

शाश्‍वत शेतीचा आधारस्तंभ -मातीचा पोत व तिची सकसता
-त्यासाठी आवश्‍यक घटक
-भारतीय गोवंश जातींचा सांभाळ
-मिश्र आंतरपिके
-फेरपालट
-कृषक आश्रम मॉडेल
-देशी गाईंची शाळा
(खिलार, देवणी, लाल कंधारी आदी)
-देशी गाईचं दूध
-गोमूत्र, औषधं आदी
-शेण, बायोगॅस प्लॅंट, स्लरी, स्लरीवरील संस्कार
-ग्राहक (शहरात चांगली मागणी)
-थेट ग्राहकास वितरण व विक्री

कृषक आश्रमाचे सिद्धांत
-भारतीय सिद्धांतावर आधारित शेती
-यातील घटक - गोठा, बायोगॅस व स्लरी पद्धती, कंपोस्ट खड्डा
-स्लरीसाठी मड पंप
-विहीर, ठिबक सिंचन

शेतकरी प्रशिक्षणासाठी सुविधा -वसतिगृह
-प्रोजेक्‍टर व स्क्रीन
-दूरचित्रवाणी, डीव्हीडी प्लेअर,
-लायब्ररी

उद्याच्या भागात - कृषक आश्रमाची थेट ग्राहकांना शेतीमाल विक्री पद्धती

No comments:

Post a Comment