Friday, 29 March 2013

हरितगृहातील लागवडीसाठी वाफ्याचे नियोजन

हरितगृहाची उभारणी केल्यानंतर लागवडीसाठी आवश्‍यक माध्यम (म्हणजेच माती, कोकोपीट किंवा अन्य सुधारित माध्यमे) याचा विचार करणे आवश्‍यक आहे. हरितगृहातील बहुतांश लागवड ही एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची असल्याने माती किंवा माध्यमाची निवड काळजीपूर्वक करावी. आजच्या लेखामध्ये माती या माध्यमाविषयी माहिती घेऊ.
---
माती ः योग्य सामू आणि विद्युतवाहकता या गुणधर्माबरोबरच निचरा होणारी माती लागवडीसाठी आवश्‍यक असते. हरितगृहामधील पिकांच्या लागवडीसाठी लाल मातीचा वापर करावा. लोहाची विविध ऑक्‍साईड्‌स असल्याने विशिष्ट असा लाल रंग मातीला प्राप्त होतो. या प्रकारची माती हलक्‍या सच्छिद्र, चुनाविरहित, कमी विद्राव्य क्षार व कमी सुपीकता असलेली असते. या जमिनीचा पी.एच. (सामू) 5.5 ते 6.5 असावा. क्षारता ही एकपेक्षा कमी असावी. हरितगृहामध्ये प्रस्तावित पिकाच्या वाफ्यांचा आकार, उंचीनुसार गरजेनुसार योग्य तितकी ब्रास माती टाकून घ्यावी. ती सर्वत्र समप्रमाणात पसरून घ्यावी. या मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक असते.

मातीचे निर्जंतुकीकरण ः
जमिनीतील रोगकारक जीव, कीटक व तणांचा नाश करण्याची प्रक्रिया म्हणजेच निर्जंतुकीकरण होय. सूक्ष्मजीव हे काही भौतिक, रासायनिक अथवा आयर्न्सच्या स्वरूपातील घटकांचा वापर करून मारले अथवा दूर केले जातात.

निर्जंतुकीकरणाच्या पद्धती ः
निर्जंतुकीकरणाच्या विविध पद्धती उपलब्ध असून प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादा आहेत. त्यामुळे पद्धत निवडताना आपल्याला अपेक्षित असणारी कार्यक्षमता, त्याची उपयुक्तता, विषारीपणा, उपलब्धता व खर्च या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. निर्जंतुकीकरणासाठी खालील रासायनिक घटकांचा वापर केला जातो.
---------------------------------------------------
1) फॉरमॅलिन
2) डॅझोमेट
3) व्हॅपम (VAPAM)
-----------------
या रासायनिक घटकांतील मिथिल ब्रोमाईडसारखे काही घटक हे सामान्य तापमानाला वायुरूप धारण करतात. तसेच ते अत्यंत विषारी असल्याने योग्य प्रशिक्षित आणि परवाना असलेल्या लोकांच्या साह्यानेच त्याचा वापर करावा लागतो. अर्थात त्याचा खर्च अधिक पडतो. आर्थिकदृष्ट्या आपल्या भागामध्ये फॉरमॅलिन या रसायनाचा वापर मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते.
---------------------------------------------------
फॉर्मल्डेहाईड (फॉरमॅलिन) ः
बाजारात फॉरमॅलिन नावाने मिळणारे द्रावण 37-40 टक्के फॉर्मल्डेहाईडयुक्त असते. ज्याच्यात झिरपण्याची व सर्वत्र पसरण्याची क्षमता कमी असते. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉरमॅलिन पाण्यात 1ः10 या प्रमाणात मिसळावे. ड्रेचिंगसाठी 7.5 लि./फॉरमॅलिन 100 चौ. मीटरसाठी म्हणजेच पाच गुंठ्याच्या (500 चौ. मी.) पॉलिहाऊससाठी 37.5 लिटर फॉरमॉलिनची गरज असते.
- हे रसायन वापरण्याआधी माती ही वाफसा स्थितीत असावी.
- रसायन पहाटे किंवा सकाळी लवकर जमिनीवर टाकावे.
- रसायन टाकल्यानंतर उपलब्ध उष्णतेनुसार साधारणतः तीन ते सात दिवस त्यावर काळ्या रंगाचे पॉलिथिन पसरावे. त्यात निर्माण होणारा वायू बाहेर जाऊ नये, याकरिता मातीने पॉलिथिनच्या कडा किंवा बाजू व्यवस्थित गाडून घ्याव्यात.
-सात दिवसांनंतर पॉलिथिन काढून एक दिवस हरितगृहाच्या सर्व खिडक्‍या आणि दरवाजे उघडे ठेवून वायू बाहेर जाऊ द्यावा.
- भरपूर पाण्याने रसायन मातीतून धुऊन जाईल असे पाहावे.
- त्यानंतर वाफसा आल्यानंतर (ड्रेचिंगनंतर दोन आठवड्यांनी) वाफे बनविण्यास सुरवात करावी.

मातीचे वाफे तयार करणे ः
फुलझाडे व भाज्या लागवडीसाठी शेडहाऊससाठी लाल माती, शेणखत, भाताचे तूस पुढील प्रमाणात वापरून माध्यम तयार करावे.
1) लाल माती - 70 टक्के
2) शेणखत (एफवायएम) - 20 टक्के
3) भाताचे तूस - 10 टक्के
या शिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ. उदा. निंबोळी पेंड, बोनमील, खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना घालाव्यात.

1) शेणखताचे महत्त्व ः
शेणखत वापरताना त्यातील सूक्ष्मजीव मारण्यासाठी आधी निर्जंतुकीकरण करावे. याचा वापर केल्यास मातीची रचना सुधारते, कारण-
* त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची मातीची क्षमता वाढते.
* जमिनीची रचना (पोत, छिद्रांचे प्रमाण) सुधारते.
* सेंद्रिय मूलद्रव्ये हळूहळू मिळत राहतात.

2) भाताच्या तुसाचे महत्त्व व वापरण्याची आवश्‍यकता ः
- हवा खेळती राहते ः प्रत्येक प्रकारच्या मातीत हवा व घनपदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. लागवडीत सुरवातीला हवेचे प्रमाण जास्त लागते. मातीमध्ये भाताचे तूस व शेणखत मिसळून हे प्रमाण वाढविले जाते. याच्या वापराने मातीतील ओलावाही वाढतो.
- मातीतील निचरा ः मातीतील पाणी झिरपण्याची क्षमता चांगली असणे आवश्‍यक असते. वरचा थर निचरा होणारा व खालील थर तसा नसेल तर खालील प्रकारचे धोके संभवतात.
अ) झाडांची मुळे कडक थराला फोडण्याचा व त्यात शिरण्याचा प्रयत्न करतात व त्याचा परिणाम झाडांची वाढ कमी होण्यात होतो.
ब) तळात पाणी साठून राहिल्याने फायटोफ्थोरा क्रिप्टोजिया किंवा अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा थरांवर पाणी साठते.
क) मातीत असे थर असल्यास खोल नांगरणी करून व भाताचे तूस वापरून निचरा सुधारता येतो.

3) वाफे तयार करण्याची पद्धत ः
अ) वाफ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम असावी.
ब) वाफे शेडहाऊस व पिकाप्रमाणे योग्य प्रकारे आखलेले असावेत.
क) मुख्य रस्त्यासाठी, विविध कामांसाठी पुरेशी जागा शेडहाऊसच्या आकाराप्रमाणे योग्य अशी ठेवावी.
ड) शेडहाऊसचे कॉलम्स शक्‍यतो वाफ्यांवर यावेत. चालण्याच्या पाथमध्ये येऊ नयेत.
इ) वाफे तयार केल्यावर त्यावरून चालू नये.
ई) दोन वाफ्यांत मशागतीची कामे करण्यासाठी पुरेसे रुंद रस्ते असावेत.
फ) पिकांच्या आवश्‍यकतेनुसार आधाराच्या रचना आधी बनवून मग वाफे करावेत. नंतर रचना करताना वाफे मोडले जातात.
---------------
संतोष डोईफोडे, 9422052777
(लेखक हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथे सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment