Friday, 29 March 2013

देवरे कुटुंबाच्या एकीची मात चिकाटीला लाभली प्रगतीची साथ

"ज्याच्या शेतात शेणखत, गावात पत आणि घरात एकमत असते, तो खरा शेतकरी' अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. भऊर (ता. देवळा, जि.नाशिक) येथील देवरे कुटुंबीयांची शेतीतील प्रगती पाहताना या म्हणीची प्रचिती येते. चोवीस एकरांत पिके आणि पूरक व्यवसाय अशी एकात्मिक पद्धत राबवताना नियोजन, मेहनत, चिकाटी यातून या कुटुंबाने आदर्श निर्माण केला आहे.
...
ज्ञानेश उगले
...
नाशिक जिल्ह्यातील देवळा हा सातत्याने कमी पावसाचा राहिला आहे. तालुक्‍याच्या दक्षिण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होतात. गेल्या तीन वर्षांत कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्‍यांच्या "कसमादे' पट्ट्याकडेच पावसाने पाठ फिरवली असल्याने गिरणा धरणातील पाणीसाठा जेमतेमच राहिला आहे. परिणामी, उसाची जागा घेणारे डाळिंब तीनच वर्षांत 50 हेक्‍टरवरून 150 हेक्‍टरपर्यंत वाढले आहे.

देवळ्याच्या उत्तरेस सहा-सात किलोमीटरवर देवरे कुटुंबीयांचा बंगला, त्यामागे विस्तीर्ण पसरलेले 24 एकर क्षेत्र लक्ष वेधून घेते. शेताच्या प्रत्येक विभागात देवरे कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात मग्न असे दृश्‍य नेहमी दिसते.
--
या कुटुंबातील प्रमुख म्हणजे बाबूभाई श्‍यामभाऊ देवरे. वयाच्या सत्तरीतही नातवंडांना सांभाळण्याबरोबरच ते घरादाराला मार्गदर्शन करतात. सुभाष आणि दादाजी ही त्यांची दोन मुले. यापैकी सुभाष यांचे 2000 मध्ये अपघाती निधन झाले. त्यामुळे घराची प्रमुख जबाबदारी दादाजींवर. सुभाष यांच्या पत्नी कल्पना, मुलगा प्रशांत, दादाजी, दादाजी यांच्या पत्नी चंद्रकला, मुलगा किशोर, मनीष तसेच रेणुका व राजश्री या सुना, असे घरातील सर्व सदस्य रोज सकाळी लवकर नियोजन करून शेतात राबतात. सायंकाळी जेवणानंतर रोजच्या कामांचा आढावा घेतला जातो. परस्परातील सामंजस्य, प्रोत्साहनामुळे प्रत्येक कामाचा "परफॉर्मन्स' उंचावतो. परिणामी, प्रत्येक विभाग निश्‍चित केल्याप्रमाणे उद्दिष्ट साध्य करतो, असे दादाजी म्हणतात.
--
देवरे कुटुंबाची शेती दृष्टिक्षेपात
डाळिंब 13 एकर, कांदे 12 एकर, मिरची चार एकर, ऊस दोन एकर
सिंचन ः गिरणा नदीवरून चार किलोमीटर वरून दोन पाइपलाइन, विहीर

दादाजी म्हणाले, की 1994 मध्ये सुरवातीला 24 एकरांवर गणेश डाळिंब होते. एकरी आठ ते 10 टन उत्पादन निघायचे. दरम्यान, सुधारित भगवा वाणाची माहिती झाल्यानंतर 9 x 6 फूट लागवड अंतर बदलून ऑगस्ट 2011 मध्ये 14 x 9 फूट अंतरावर नऊ एकरांवर लागवड केली. सुरवातीला घरच्याच गोठ्यातील शेणखत व गांडूळ खताचा वापर केला. खोल काळी जमीन असल्याने पाण्याचे योग्य नियोजन केले. लागवडीपासून एकरी आठ तास पाणी देण्याची क्षमता असलेल्या ठिबक संचातून रोज एक तास व फुलोरा ते पक्वता काळात दोन तास पाणी दिले. लागवडीनंतर दर दोन दिवसांनी प्रत्येकी दोन किलो या प्रमाणे विद्राव्य खते दिली. नव्याने जानेवारी 2013 मध्ये भगवा वाणाची लागवड केली आहे. आंबे बहरावर भर असतो. या काळात एकसारखी फळधारणा होते. बहुतांशी वातावरण कोरडे असल्याने किडी-रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. फळ पक्वतेच्या सुरवातीच्या स्थितीत बऱ्याचदा सुरसा अळीचा प्रादुर्भाव होतो. बारकाईने लक्ष ठेवून प्रादुर्भाव होण्याआधीच कीटकनाशकांचा वापर होतो. पावसाळ्यात रोग आटोक्‍यात ठेवणे मुश्‍कील बनते. या काळात बोर्डो मिश्रण, स्ट्रेप्टोमायसीनवर आधारित जिवाणूनाशक, अन्य बुरशीनाशकांचा गरजेनुसार वापर होतो. रोगनियंत्रण आटोक्‍याबाहेर गेले तर हस्त बहर धरतो. छाटणीनंतर बागेत रोगग्रस्त काडीकचरा साचून राहणार नाही याची काळजी घेतो.
--
डाळिंबाला गणेश चतुर्थी व ईद सणांच्या काळात मागणी वाढते. कमाल 100 रुपये प्रति किलोपर्यंत दर वाढतात. तरीही आमच्या डाळिंबाला सरासरी 50 रुपये दर मिळाला आहे. एकरी सात टन सरासरी उत्पादन आहे. एकरी खर्च एक लाख 25 हजार रुपये वजा जाता 10 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
-----
कांदा हे देवरे कुटुंबाचे पारंपरिक पीक. सप्टेंबरमध्ये लागवड होते. मागील दहा वर्षांपासून एकरी सरासरी 150 क्विंटल उत्पादन राहिले आहे.
--
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी..
पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन
वाढीच्या अवस्थेत "थ्रिप्स'चे नियंत्रण
शेणखताचा प्रमाणित वापर
पात पक्व होताना क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (प्रमाण : एक लिटर पाण्यास अर्धा मि.लि. )+ 00:00:50 विद्राव्य खत (प्रति लिटर पाण्यास पाच ग्रॅम) ही फवारणी उपयुक्त ठरली.
--
उत्तम पोल्ट्री व्यवस्थापन
देवरे कुटुंबाने उद्योजक उद्धव अहिरे यांच्या आनंद हॅचरीज कंपनीशी करार करून 8000 पक्षी क्षमतेचे दोन शेड उभारले. दादाजी यांचे पुत्र मनीष व सूनबाई सौ. राजश्री यांच्याकडे पोल्ट्रीची जबाबदारी आहे. सुरवातीपासूनच मनीष ऐकू व बोलू शकत नाही. मात्र पक्ष्यांची भाषा त्यांनी चांगली अवगत केल्याचे त्यांच्या पोल्ट्री व्यवस्थापनावरून जाणवते. आहार, पाणी, लसीकरण आदी व्यवस्थापन वेळेवर असल्याने 45 दिवसांत वाढ झालेल्या पक्ष्यांचा फूड कन्झम्शन रेशो (एफसीआर) चांगला असल्याने करार केलेल्या कंपनीकडून पक्ष्यांना चांगले दर मिळतात. 45 दिवसांच्या प्रत्येक बॅच मधून 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 20 हजार रुपये खर्च वजा जाता 40 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. वर्षातून सुमारे पाच बॅच निघतात. पोल्ट्रीतून वर्षाला दोन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. 2009 मध्ये बांधलेल्या दोन शेडच्या बांधकामासाठी एकावेळी पाच लाख रुपये कायमस्वरूपी खर्च झाला आहे.
---
मका व कांदा यांची फेरपालट केली जाते. गेल्या वर्षी मक्‍याचे एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळाले. क्विंटलला 1300 रुपये दर मिळाला. दहा एकरातून एकूण तीन लाख 90 हजार रुपये मिळाले.
---
कांद्याला मागील दोन वर्षांत सरासरी 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हा दर परवडणारा नाही. यातून खर्च निघत नाही. कांद्याच्या बाजाराची चढ उताराची स्थिती वर्षानुवर्षे राहिली आहे. कांदा साठवून ठेवता येतो. बाजाराच्या स्थितीनुसार विकता येतो. कांद्याला दर कमी मिळाले तरी अन्य पिकांसाठी, सण, लग्न आदींसाठी लागणारे खेळते भांडवल मिळते ही कांदा शेतीची जमेची बाजू.
---
ऊस चार एकरात आहे. चार फुटांची सरी, इनलाईन ठिबक, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर या पिकात होतो. गेल्या चार वर्षांत एकरी उत्पादन 40 टनांवरून 60 टनांपर्यंत वाढले आहे.
--
पशुपालनाचा शेतीला आधार
गोठ्यात सहा म्हशी, दोन गाई, दोन बैल आहेत. आठ उस्मानाबादी शेळ्या, दोन बोकड व करडे आहेत. आठ वर्षांपासून पशुपालन केले जाते. गाईंपासून घरातील सदस्यांपुरतेच दूध काढले जाते. जनावरांपासून मिळणारे खत ही महत्त्वाची उपलब्धी मानली जाते. थोड्याशा गाभण म्हशींची खरेदी करून त्यांची काही महिने काळजी घेऊन वेताअगोदर विक्री केली जाते. 25 हजाराला खरेदी केलेल्या बऱ्याच म्हशींना विक्रीवेळी 50 हजारांचा दर मिळाला आहे. सुमारे पाच ते 20 हजारांचे निव्वळ उत्पन्न प्रति म्हशीच्या व्यवहारातून मिळते.
-----

देवरे कुटुंबाकडून शिकण्यासारखे...

*यशासाठी "टीमवर्क' खूप महत्त्वाचे
*व्यावसायिक दृष्टिकोन अत्यावश्‍यक
*सदस्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारीचे वाटप
*मिश्रपीक पद्धती फायद्याची
*काळानुरूप शेतीत बदल आवश्‍यक
*उत्तम नियोजन हा यशाचा पाया
--------
संपर्क :
दादाजी श्‍यामभाऊ देवरे, 7588096083
प्रशांत सुभाष देवरे, 7588096082
किशोर दादाजी देवरे, 7588096084

No comments:

Post a Comment