Wednesday, 3 April 2013

14 वर्षांपासून 100 टक्के सेंद्रिय शेती

-सांगली जिल्ह्यातील श्रीनिवास बागल यांची आदर्श शेती
-सेंद्रिय अन्नाला बाजारपेठही मिळवली
-जमिनीची सुपीकता वाढवली
सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे (ता. वाळवा) येथील श्रीनिवास बापूराव बागल सुमारे 14 वर्षे सेंद्रिय शेती करीत असून, त्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांनी निर्माण केला आहे. आपल्या सेंद्रिय उत्पादनांसाठी त्यांनी आपली बाजारपेठही विकसित केली आहे. जमिनीची प्रतही सुधारल्याचा फायदा या शेतीतून त्यांना मिळत आहे.
श्‍यामराव गावडे
श्रीनिवास बागल यांची चिकुर्डे येथे 16 एकर जमीन आहे. चार भावांचे म्हणजे 32 सदस्यांचे कुटुंब एकत्र नांदते. बागल यांनी औषध निर्माण शास्त्राची पदवी घेतली आहे. औषध निर्माणच्या पदविका वर्गासाठी ते अध्यापनाचे काम करतात. त्यांनी 1999 च्या पूर्वी 20 गुंठ्यांत ढोबळी मिरची घेतली. त्या वेळी किडी-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक फवारण्या व खर्च केला. अखेर पीक काढून टाकण्यापर्यंत परिस्थिती आली. या घटनेने बागल अंतर्मुख बनले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सुरू केला. काही सेंद्रिय जाणकार व्यक्तींच्या संपर्कात ते आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेतीला सुरवात केली. मात्र या पद्धतीने उत्पादन कसे मिळणार अशी लोकांत चर्चा होती. बागल यांनी मात्र निष्ठेने कामाला सुरवात केली. सुरवातीला एक- दोन वर्षे उत्पादन जेमतेम होते. परंतु सततच्या प्रयत्नाने त्यात यश येत गेले. जमिनीची सुपीकता वाढत गेली. उत्पादनात वाढ होऊ लागली.

सेंद्रिय शेती गट - -बागल यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील सेंद्रिय उत्पादकांचे गट तयार करून त्यांच्या शेतीचे प्रमाणीकरण करून देण्यास पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या परस्पर सहभाग कार्यक्रमातून हे प्रमाणीकरण साधले. शेतकऱ्यांचा सेंद्रिय माल एका छताखाली मिळावा यासाठी बागल यांनी वसुंधरा शाश्‍वत शेती संवर्धन संस्था स्थापन केली. विविध 18 ठिकाणी सेंद्रिय शेती प्रदर्शने भरवून जागृती केली.

सेंद्रिय मालाला मिळवली बाजारपेठ- बागल यांच्या चविष्ट, दर्जेदार मालाचा खास ग्राहक वर्ग तयार झाला आहे. बाजारपेठेच्या तुलनेत 25 ते 30 टक्के अधिक दराने त्यांचा माल खरेदी केला जातो. इंग्लंड येथील डेव्हिड ग्रावर ज्या वेळी भारतात येतात, त्या वेळी बागल यांच्याकडून ते खपली गहू, तांदूळ खरेदी करतात. गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शेतीमाल पुरवला जातो.
2) काही कुटुंबेही बागल यांची ग्राहक म्हणून जोडली गेली आहेत. मालाची मागणी आगाऊ नोंदवली जाते.
3) पुणे, मुंबई येथेही गूळ, हळदीचे पदार्थ नियमित पाठवले जातात.

बागल यांच्या सेंद्रिय मालाला मिळणारे काही दर उदाहरणादाखल असे- (बागल यांनी सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गूळ, काकवी आदी पदार्थ कोणतीही रसायने न वापरता तयार केली आहेत. ग्राहकांच्या पसंतीस ती उतरली आहेत.)
-सेंद्रिय गूळ- 50 रुपये प्रति किलो
काकवी-
-गूळ पावडर- 100 रुपये प्रति किलो
-तांदूळ- 75 रुपये प्रति किलो
-खपली गहू- 50 रुपये किलो
-भाजीपाला सेंद्रिय असला तरी तो स्थानिक स्तरावर विकला जातो. त्याला सेंद्रिय म्हणून खास दर मिळत नाही. मात्र दर्जेदार माल अशी ओळख असल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. शिवाय घरचे 32 जणांचे कुटुंब असल्याने घरीच पौष्टिक अन्न म्हणून त्याचा वापर होतो.

बागल यांची हळद पावडर निर्मितीची पद्धत वेगळी आहे. हळद न शिजवताच तिचे बारीक तुकडे करून वाळवली जाते. त्यानंतर दळून पावडर तयार केली जाते. प्रति किलो 300 रुपये दराने विक्री होते. या सर्व पदार्थ विक्रीवर सेंद्रिय प्रमाणीकरणाचा शिक्का व नोंदणी क्रमांक असणारे लेबल आहे.

अंतर्गत गुण नियंत्रण समिती - बागल यांच्या पुढाकाराखालील सेंद्रिय उत्पादकांनी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. गुऱ्हाळ करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सहा लोकांची समिती केव्हाही येऊन तपासणी करू शकते.

बागल यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये - -सन 1999 पासून संपूर्ण सेंद्रिय शेती. तेव्हापासून रासायनिक घटकांचा अंशदेखील शेतात वापरलेला नाही.
-मिश्र पीक पद्धतीला प्राधान्य. उसाच्या सहा फुटाच्या पट्ट्यात विविध पिके घेतात. उदा. कोबी, बीट, मेथी, कांदा, हरभरा, हळद, सोयाबीन. मिश्र पीक पद्धतीमुळे किडी-रोगांचे प्रमाण कमी राहते. जैवविविधता टिकून राहते.
-देशी गाईंचे शेण, मध, तूप, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जिवामृत, जिवाणूखते आदींचा वापर
-देशी गाईंचे संगोपन, त्यांच्या शेणखताचा वापर
-एकरी पाच टन गांडूळखत, शेतात गांडूळखत निर्मिती प्रकल्प आहे.
-सेंद्रिय कर्ब 0.8 टक्का. जमिनीतील ह्युमसच्या प्रमाणात वाढ.
-पिकांचा पालापाचोळा जागेवरच कुजवला जातो.
-शेतात मित्रकीटकांची संख्या चांगल्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्याद्वारे किडींचे नियंत्रण सोपे होते
-शेजारील शेतकऱ्याचे रासायनिक अंश आपल्या शेतात येऊ नये म्हणून कुंपण शेती व चर काढले.

सेंद्रिय शेतीत उत्पादन व उत्पन्नाबाबत- बागल उसाचे 50 ते 55 टन, भुईमुगाचे एकरी 12 क्विंटल (वाळलेले), गव्हाचे सात ते आठ क्विंटल, हळदीचे 11 ते 11 क्विंटल (सर्व उत्पादन एकरी) उत्पादन घेतात. बागल म्हणाले, की सेंद्रिय शेतीत रासायनिक खते, कीडनाशके आदी घटकांच्या वापराचा खर्च कमी होतो. आंतरपिकांतून उत्पन्न वाढते. सेंद्रिय मालाला दरही थोडा जास्त मिळत असल्याने तेथे फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीत जमिनीची सुपीकता मात्र कायम वाढतच जाते.
बागल यांना राज्य शासनाने 2011 मध्ये सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

श्रीनिवास बागल, 9822493117

No comments:

Post a Comment