Monday, 15 April 2013

योग्य प्रकारे करा आंबा, काजू काढणी अन्‌ हाताळणी

आंब्यामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये मोहोर येत असल्याने फळे एकाच वेळी काढणीस तयार होत नाहीत. फळांची काढणी आणि हाताळणी योग्य पद्धतीने करावी. काजू काढणीनंतर फळांची सुकवणी व साठवणूक याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.

कोकणामध्ये हापूस आंब्याला या वर्षी तीन-चार टप्प्यांमध्ये मोहोर आल्यामुळे फळे गोटीपासून ते काढणीपर्यंतच्या अवस्थेमध्ये आहेत. काही फळांची काढणी यापूर्वी झाली असून येत्या आठ ते 10 दिवसांत काही बागांमधील फळांची काढणी होईल. बहुतांशी बागांमधील फळे ही अंड्यापेक्षा मोठी झालेली असून या फळांची काढणी अद्याप 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.
1) गेल्या आठवड्यापासून बहुतांशी भागांमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी तापमान 38 अंश ते 40 अंश से.पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी काही वेळा अति उष्णतेमुळे फळे भाजण्याचे, गळून पडण्याचे प्रकार घडू शकतात. या बागांमध्ये विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी. ज्या बागांमध्ये ही फवारणी केली नसल्यास ती त्वरित केल्यास त्याचा फळगळ कमी करण्यासाठी, तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी उपयोग होतो.
2) अशा बागांमध्ये पाणी देण्याची सोय असल्यास प्रत्येक कलमांना 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. या अवस्थेमध्ये असणारी फळे काढणीस तयार होण्यासाठी अद्याप 45-50 दिवसांचा कालावधी असल्याने या झाडांच्या बुंध्यानजीक गवताचे आच्छादन केल्यास ओलावा टिकून राहण्यासाठी तसेच फळगळ कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल.
3) ज्या बागांमधील फळे अंड्यापेक्षा मोठ्या आकाराची आहेत अशी फळे काढणीस तयार होण्यासाठी अद्याप 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. या अवस्थेमध्ये फळगळ होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते. परंतु तापमानात अचानक वाढ झाल्यास फळगळ होण्याचे, तसेच फळे भाजण्याचे प्रकार होऊ शकतात. कातळावरील बागा तसेच काही ठराविक ठिकाणच्या बागा ज्या ठिकाणचे तापमान अचानक वाढण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत, अशा बागा या दृष्टीने जास्त संवेदनशील असतात. त्यादृष्टीने बागायतदाराने जागरूक राहणे अत्यंत आवश्‍यक आहे. या फळांवर जर एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी घेतली नसल्यास त्वरित ही फवारणी घेणे फायदेशीर ठरेल.
4) कातळावरील बागा, झाडाचा विस्तार कमी असलेल्या माळरानांवरील बागांमध्ये बुंध्यालगत गवताचे आच्छादन करावे. उष्णता वाढल्यावर उष्ण वाऱ्यांची फळांना बसणारी झळ काही प्रमाणामध्ये आच्छादनामुळे कमी होण्यास मदत होईल. बागायतदारांनी दैनंदिन तापमान वाढीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. जास्त उष्णता वाढत असल्यास व बागेमध्ये पाणी देण्याची सोय असल्यास एक वेळ पाणी दिल्यामुळे उष्णतेची झळ काही प्रमाणामध्ये टाळता येईल.

फळांची काढणी ः
हापूस आंब्यामध्ये काढणीस अनन्य साधारण महत्त्व आहे. काढणीयोग्य आंबा झाडावर असताना ओळखणे हे कौशल्य आहे. फळधारणा झाल्यापासून आंब्याची फळे तयार होण्यास सर्वसाधारणपणे 100 ते 125 दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी त्या ठिकाणचे तापमान व जातीपरत्वे बदलतो.
1) हापूस या जातीस रत्ना, केसर इ. जातींच्या तुलनेमध्ये कमी कालावधी लागतो, मात्र एकाच वेळी फलधारणा होत नसल्याने काढणीसुद्धा तीन ते चार टप्प्यांमध्ये करावी लागते. 14 आणे म्हणजेच 85 टक्के पक्व फळांची काढणी करणे आवश्‍यक आहे. यापेक्षा कमी पक्वतेच्या फळांची काढणी केल्यास अपेक्षित स्वाद व चव येत नाही.
2) 16 आणे (100 टक्के) पक्वतेच्या फळांची काढणी केल्यास साका येण्याची शक्‍यता जास्त असते. काढणीस तयार झालेल्या फळांच्या देठाजवळ खड्डा तयार होतो. अशा फळांना लालसर, गुलाबी रंग येतो, फळे फुगीर होतात. फळांवरील पांढरट ठिपके (लेंटीसेल्स) ठळक होतात, तसेच फळांना चकाकी येते अशा फळांची काढणी करावी.
3) भर दुपारी उन्हात काढणी करणे टाळावे. सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा प्रखर ऊन नसेल व तापमान कमी असेल अशावेळी आंबा काढणी करावी.
4) आंबा फळ काढताना देठ तुटल्यास झालेल्या जखमेतून चीक बाहेर येऊन तो फळांवर पसरतो. अशा चिकामुळे पिकल्यावर फळांवर डाग दिसू लागतात आणि फळांची प्रत कमी होते. फळांना बाजारात चांगली किंमत मिळत नाही. शिवाय देठ काढल्याने देठालगत झालेल्या जखमेतून रोगजंतूचा प्रादुर्भाव होऊन फळे पिकताना देठाकडील बाजूस काळी पडून कुजू लागतात. तसेच देठासहित काढलेले आंबे दोन ते तीन दिवस अधिक टिकतात. त्यामुळे आंबे झाडावरून काढताना देठासहित काढणे आवश्‍यक आहे.
5) आंबे काढल्यावर देठावरील पेराच्या वरच्या बाजूस देठ (एक ते 1.5 सें.मी. ठेवून) कापून टाकावा. आंबे देठासहित काढण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या "नूतन' झेल्याचा वापर करावा. या झेल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जवळ जवळ 100 टक्के आंबे देठासहित निघतात. फळे काढताना फांद्यांना हिसका बसत नसल्यामुळे फांद्या मोडत नाहीत. प्रचलित झेल्यापेक्षा दिवसाला 35 ते 37 टक्के जादा फळे सुधारित झेल्याच्या वापरामुळे निघू शकतात.
6) आंबा काढताना प्रत्येक आंबा स्वतंत्रपणे काढावा. तो काढतेवेळी किंवा टोपलीत ठेवतेवेळी हळुवारपणे हाताळावा. फळांची अयोग्य हाताळणी केल्यास फळांवर पडणारे सूक्ष्म ओरखडे फळे पिकतेवेळी तीव्र होऊन फळे कुजू लागतात. काढलेली फळे ओबडधोबड पृष्ठभाग असलेल्या टोपल्यात न ठेवता किलतानाचे अस्तर लावलेल्या टोपलीत ठेवावी. सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक क्रेट्‌सचा वापर केल्यास उपयुक्त होईल.
7) आंबे झाडावरून काढल्यानंतर पॅकिंग करेपर्यंत थोडा वेळसुद्धा उन्हात राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. आंबे काढल्यानंतर अल्पावधीसाठी जरी उन्हात राहिले तरी त्या पिकांना साका होण्याचे प्रमाण वाढते. बागेतील फळांची वाहतूक करताना टोपलीवर सावलीसाठी वर्तमानपत्र किंवा कापडाचे आच्छादन वापरून वाहतूक करावी.

साठवणूक ः
झाडावरील फळे अलगद उतरविल्यानंतर पिकण्यासाठी ठेवण्यापूर्वी सर्व फळे 500 पी.पी.एम. कार्बेन्डाझीम किंवा 0.1 टक्का कॅप्टान यांच्या द्रावणात पाच मिनिटे बुडवून काढावीत आणि 15 मिनिटे हवेत कोरडी करावीत. पाच ते सात दिवसांनी आढी उघडून फळे बाहेर काढावीत. चांगली व खराब फळे वेगळी करावीत. निवडलेल्या आंब्याची वजनानुसार प्रतवारी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी 200 ते 250 ग्रॅम, 252 ते 300 ग्रॅम आणि 301 ते 350 ग्रॅम अशा ग्रेडमध्ये काटेकोरपणे प्रतवारी करावी. थोड्याशा अनुभवावरून फळाच्या आकारावरून सुद्धा अशी प्रतवारी करणे शक्‍य होते.

पॅकिंग ः
वर्गवारी केलेले आंबे 1, 2, 3, 4 डझन क्षमतेच्या आकर्षक अशा पुठ्ठ्याच्या (कोरूगेटेड फायबर) बॉक्‍समध्ये पॅक करावेत. अशा खोक्‍यांना वायुविजनासाठी रुंदीच्या बाजूला दोन से.मी. व्यासाची दोन-दोन छिद्रे असावीत आणि आवश्‍यकतेप्रमाणे वायुविजनासाठी छिद्रे असलेले पुठ्ठ्याचेच विभाजक वापरावेत. या बॉक्‍समध्ये गवत, भाताचा पेंढा किंवा इतर कोणतेही पॅकिंग साहित्य वापरू नये. व्यवस्थितपणे भरलेली खोकी टेपने बंद करावीत. खोक्‍यावर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, आंबा जातीचे नाव, फळांची संख्या, वजन बॉक्‍स भरल्याची तारीख आणि उघडण्याची तारीख लिहावी. आंबा भरलेली खोकी उन्हात ठेवू नयेत.

काजूची योग्य प्रकारे वाळवणी करा...
काजू बीची काढणी मार्च महिन्यांपासून सुरू झाली असून, कलमी काजू बागांमधील काढणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर पारंपरिक काजू बागांमधील काढणी सुरू झाली आहे. काजू बीची काढणी बोंड पक्व झाल्यावरच करावी किंवा पिकलेली बोंडे आपोआप गळून पडल्यावर काजू बी बोंडांपासून वेगळी करावी. बऱ्याच वेळा काजू बी अपक्व असताना त्यांची काढणी करून उन्हामध्ये सुकवून त्यांची विक्री केली जाते. अशा बियांना बाजारभावदेखील कमी मिळतो.
1) काजू बीची काढणी झाल्यानंतर काढलेल्या बिया कडक उन्हामध्ये आठवडाभर चांगल्या सुकवाव्यात. बिया चांगल्या सुकविल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा बिया जास्त काळापर्यंत साठविता येऊ शकतात. सुकवण चांगली झाली नसल्यास साठवणुकीच्या कालावधीत अशा बिया बुरशीमुळे खराब होतात व प्रक्रियेनंतर मिळणाऱ्या काजूगराच्या उताऱ्यावर व प्रतीवर त्याचा परिणाम होतो.
2) उन्हात सात-10 दिवस वाळलेल्या बियांमधील खराब पोचट बिया वेगळ्या काढाव्यात. चांगल्या बिया 300 गेज प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून हवाबंद कराव्यात. या पिशव्या गोणपाटात ठेवून सुतळीने गोणपाटाचे तोंड शिवून घ्यावे. या पिशव्यांची साठवणूक थंड व कोरड्या जागेमध्ये करावी.
3) पिशव्या थेट जमिनीवर रचून न ठेवता लाकडी फळ्यांवर रचून ठेवाव्यात. पिशव्या ठेवताना त्या भिंतीला टेकणार नाहीत याचीदेखील काळजी घ्यावी. साठवणुकीच्या खोलीमध्ये उंदीर, पावसाचा ओलावा येणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

संपर्क ः 02358-282415, 282130 विस्तार क्रमांक- 250, 242
(लेखक उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment