Monday, 15 April 2013

अन्नद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे

जमिनीतील कर्ब इतर सर्व मूलद्रव्यांना पूरक असते. चुन्यामुळे रोपांची नत्र, लोह, बोरोन, जस्त, तांबे आणि मंगल (मॅंगेनीज), ग्रहणशक्ती वाढते. गंधकामुळे इतर मूलद्रव्ये खास करून नत्र आणि स्फुरद शोषण्यासाठी रोपांची कार्यक्षमता वाढवते. सर्व अन्नद्रव्यांविषयी एक-दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा, की ही सर्व प्रमाणशीररीतीने रोपात वापरली जातात. एखादे द्रव्य प्रमाणापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात इतर द्रव्यांचा वापर होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशिष्ट प्रकारचे जिवाणू, बुरशी, मोल्ड, किण्वक, ऍक्‍टिनोमायसेट्‌स वगैरे जमिनीमध्ये योग्य प्रमाणात असल्याशिवाय यातील काहीही रोपास मिळणे कठीण असते.
जमीनही सर्व मूलद्रव्ये एका विशिष्ट समतोलात ठेवते. एखादा जहाल पदार्थ जसे चुनखडी, राख, रासायनिक खते वगैरे जमिनीत एकाएकी मिसळली तर तो समतोल बिघडतो. जमिनीत प्रथम सेंद्रिय पदार्थ मिसळावेत. त्यानंतर अन्नद्रव्ये शिफारशीत मात्रेत द्यावीत. यामुळे प्रमाणात बदल न होता तीव्रता कमी होते. चुना किंवा राख पूर्ण मात्रेत देऊन जमिनीस स्थिर होण्यास पुरेसा अवधी द्या. कृत्रिम नत्र खते केवळ पीक वाढीच्या काळात लहान लहान मात्रेत द्यावीत. इतर खते चुन्याप्रमाणे अगोदर देऊन जमिनीस स्थिर होण्यास पुरेसा अवधी द्या. उसासारख्या अधिक कालावधीच्या पिकास खते वर्षभरात शिफारशीप्रमाणे विभागून द्या.

जमीन सजीव करा ः
जमिनीत योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे जिवाणू असल्याशिवाय खनिजे, मौल, घटक, वाढ, संप्रेरके, जीवनसत्त्वे वगैरे जमिनीत असूनही सारे व्यर्थ होते. त्यांचा उपयोग नसतो. हे असंख्य सूक्ष्म जीवही आपल्याला जगवायला हवेत. यासाठी हिरवळीच्या खतांची लागवड करावी. हिरवळीच्या खतातून जमिनीला काही पुरवण्यापेक्षा आपण तेथील जिवाणूंना खाद्य पुरवत असतो. या हिरवळीतून विघटन करून ते जे जमिनीत सोडतात, ती खरी खते. जमिनीस केवळ कंपोस्ट देऊन भागत नाही तर काही प्रमाणात हिरवी पानेही द्यावीत. यामुळे जमीन सातत्याने सजीव राखण्यात यश येते. हिरवळ खते, हिरवळीचे आच्छादन, जागेवर कंपोस्ट अशा जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या युक्‍त्या आहेत. हिरवळीची पाने ताजी किंवा वाळवूनही वापरता येतात किंवा त्यांचे कंपोस्ट बनवूनही वापरता येते. सूक्ष्मद्रव्ये नैसर्गिक असोत, की कृत्रिम, शेणात मुरवून वापरावीत. ती जास्त परिणामकारक होतात. द्रव्ये आणि सूक्ष्मद्रव्ये यांचा पुरवठा पिकास करण्याचे अनेक मार्ग आहेत. जमिनीतून नव्हे तर पर्णछिद्रांद्वारेही ती पिकास देता येतात.

अन्नद्रव्यांचे महत्त्व ः
* लोह ( Fe) : नत्र व सल्फेटचे अतिरेक टाळण्यात याची मदत होते. बाकी बऱ्याच मूलद्रव्यांशी याचे पटत नाही.
* जस्त (Zn) : रोपांचा विकास आणि कर्बोहायड्रेट्‌स आणि स्फुरद यांच्या चयापचयात हे महत्त्वाची भूमिका बजावते.
* क्‍लोरिन (CI) : रोपातील क्षारांच्या अणू-रेणू घन भारितेस ते जबाबदार असते; त्यामुळे रोपातील पाण्याच्या अनुषंगाने सर्व जीवनसत्त्वांचे अभिसरण होते. रोपांच्या (द्रव्ये) शोषण्यात नत्राशी याची स्पर्धा असते.
* निकेल (Ni) : युरियेस या विकराची कार्यक्षमता निकेलमुळे वाढते; युरियेस, युरियाचे विघटन करून नत्र मोकळा करते. नैसर्गिक किंवा बनावट युरियातून नत्र वेगळे करण्यात आणि लोहाच्या शोषणात त्याचा सिंहाचा वाटा असतो.
* सोडिअम (Na) : पोटॅशिअम ऐवजी हे शोषले जाण्याची शक्‍यता असते. अशा रीतीने ते हानिकारक होऊ शकते.

No comments:

Post a Comment