Tuesday, 9 April 2013

प्रयत्नांची पराकाष्टा केली, संरक्षित पाण्यातून शेती फुलली

"प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे' हा वाक्‌प्रचार सार्थकी लावत आपल्या प्रयोगशीलतेला प्रयत्नांची जोड देत परभणी जिल्ह्यातील मानवत येथील राजू कोक्‍कर यांनी शेती फुलविली आहे. शेती व्यावसायिक करताना पाण्याची सुविधा बळकट करण्यावर त्यांनी दिलेला भर व त्यासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य ठरले आहेत. विनोद इंगोले
राजू कोक्‍कर यांच्याकडे वडिलोपार्जित सुमारे 90 एकर जमीन. या क्षेत्रात पाण्याचा निचरा होत नसल्याने जास्त पाऊस झाल्यास समस्या निर्माण व्हायच्या. खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न जेमतेम असल्याने त्यांचे कुटुंब थोडीफार शेती कसत. उर्वरित पडीक ठेवत होते. कोक्‍कर कुटुंबात चौघा भावंडांचा समावेश असून विठ्ठल, मनोहर, राजू व पुतण्या दयानंद यांचा समावेश आहे. एकत्रित कुटुंबपद्धतीचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

परिवर्तनाचा लढा ! राजू यांचा मानवत येथे हार्डवेअर सामग्रीचा व्यवसाय आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे समाधानी नसलेले राजू यांनी शेतीत आश्‍वासक दृष्टिकोन ठेवला. केळी, संत्रा यासारखी व्यावसायिक पिके त्यांना घ्यायची होती. त्याकरिता पाण्याचे स्रोत भक्‍कम करण्याची गरज होती. सन 2004 मध्ये आपल्या शेतात 70 फूट विहीर खोदत संरक्षित सिंचनाची सोय करण्याचा प्रयत्न केला. परंतु विहिरीला पाणी लागले नाही. परिणामी हिरमोड झाला. मात्र खचून न जाता नेटाने परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार केला. राष्ट्रीय बॅंकेच्या स्थानिक शाखेकडून साडेपाच लाख रुपये कर्ज घेतले. त्यातून शेतापासून सहा किलोमीटर अंतरावरील झरी गावशिवारात 2006 मध्ये अकरा गुंठे जमीन खरेदी केली. या परिसरात पाण्याची उपलब्धता चांगली होती. जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या या जमिनीवर 40 फूट विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीला मुबलक पाणी लागल्याने आशा वाढल्या. चार इंची पाइपलाइन विहीर ते शेतापर्यंत टाकली. याकामी साडेसहा लाख रुपये खर्च आला. बॅंकेचे कर्ज व गाठीशी असलेल्या पैशातून हा निधी उभारला होता. भगीरथ प्रयत्नांतून सुमारे सहा किलोमीटरवरून पाणी शेतापर्यंत पोचविले. शेतात पूर्वी खोदलेल्या कोरड्या विहिरीचा उपयोग पाणी साठवणुकीसाठी केला जातो.

शेततळ्याचे केले पुनर्भरण ! विहीर पुनर्भरणाचा प्रयोग करणाऱ्या राजू यांना या वर्षीच्या हंगामात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. त्यांच्या बागेत एक हजार संत्रा झाडे, साडेचार हजार नवीन केळी लागवड या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने पाण्याचे स्रोत बळकट करण्याची गरज वाटली. याच गरजेतून कृषी विभागाच्या पाच लाख 33 हजार 614 रुपये अनुदानावर 54 x 54 मीटर आकाराचे शेततळे घेतले. एक कोटी 30 लाख लिटर एवढी त्याची पाणी साठवणक्षमता आहे. डिसेंबर 2012 मध्ये घेण्यात आलेल्या या शेततळ्याचे पुनर्भरण झरी शिवारातील विहिरीच्या बळावर केले. त्या वेळी त्यांच्या शेतात कपाशी व ऊस होता. उसाची तोड झाल्यानंतर कपाशीचे पाणी कमी करून ते शेततळ्यात वळते केले.

शेती व्यवस्थापनाचा आदर्श एकत्रित कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या 90 एकरांपैकी 22 एकर शेती राजू कसतात. सन 2002 मध्ये 200 झाडे, 2003-04 व 05 या वर्षात नवी लागवड करीत एक हजारावर संत्रा झाडे त्यांच्या बागेत आजमितीस आहेत. नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून रोपे खरेदी केली. 18 x 16 फूट अंतरावर लागवड आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना साडेतेरा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे संत्र्यांची विक्री केली. सुमारे एक हजार झाडांपैकी 350 झाडांपासून 20 टनांचे उत्पादन, तर दोन लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न यंदाच्या हंगामात झाले. एक हजार झाडांच्या व्यवस्थापनावर 65 हजार रुपयांचा खर्च झाला. मात्र केळी व संत्रा बागेला लागणाऱ्या पाण्याची सोय होणे भविष्यात अवघड असल्याच्या जाणिवेतून या वर्षी संत्रा बाग काढण्याचा निर्णय घेतला आहे.

केळी लागवडीत सातत्य सुमारे साडेतीन एकरावर ऑगस्ट 2012 रोजी साडेचार हजार नवीन उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी एकरी 28 ते 30 टन उत्पादन मिळाले होते. कमाल बारा हजार तर किमान सात हजार रुपये प्रति टन दर गेल्या हंगामात मिळाला. दोन लाख दहा रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून एकरी 40 हजार रुपयांचा व्यवस्थापनावर होणारा सरासरी खर्च वजा जाता एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. केळी कंदाची विक्री करून अतिरिक्‍त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. चार रुपये प्रति कंद याप्रमाणे 13 हजार 500 कंदाच्या विक्रीतून त्यांना 54 हजार रुपयांचे अर्थार्जन झाले. कपाशी लागवडीतही सातत्य असून कोरडवाहूत एकरी दहा क्‍विंटल, तर बागायतीत 15 क्‍विंटल याप्रमाणे उत्पादन घेतले आहे.

तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या गोष्टी -कपाशीची उत्पादकता व जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उसाची मळी आणि सेंद्रिय खत एकरी सहा टन दिले जाते.
-उसाच्या मळीमुळे कपाशीची वाढ चांगली होत असल्याचा राजू यांचा अनुभव आहे.
-केळी पिकात बाष्पीभवन रोखण्यासाठी उसाचे पाचट बेडवर अंथरले आहे. पाचट कुजल्यानंतर सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर होईल.

बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती नाही. ही बाब लक्षात घेता पीक फेरपालट किंवा बहुविध पिकांचा पर्याय अवलंबण्याची गरज राजू यांनी व्यक्‍त केली. एका पिकाला कमी दर मिळाल्यास अन्य पिकांमधून नुकसान कमी करणे शक्‍य होईल. शेतीला मनुष्यबळाची उपलब्धता होत नाही. उपाय म्हणून यांत्रिकीकरणाकडे वळण्याचा त्यांचा मानस आहे.

संपर्क
राजू कोक्‍कर, 9423738125

No comments:

Post a Comment