Friday, 24 May 2013

अशा आहेत हळदीच्या वाढीच्या अवस्था

1) आपल्याकडे हळदीची काढणी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात होते. काढणीनंतर मिळणारे बेणे लागवडीसाठी वापरलेले जाते. हे बियाणे उत्तम मानले जाते, कारण काढणीनंतर लागवड करेपर्यंत अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असते. बेण्याचे डोळे फुगलेले असतात. न कुजलेले बियाणे लागवडीस वापरावे.
2) सरी-वरंबा पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूस 30 सेंटिमीटर अंतरावर कुदळीने आगऱ्या घेऊन गड्डे लावावेत किंवा वाकोरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात तीन पाच सें.मी. खोल दाबून घ्यावेत.
3) रुंद वरंबा पद्धतीने पहिले पाणी देऊन जमीन वाफशावर आल्यानंतर 30 x 30 सें.मी. अंतरावर गड्डे लावून घ्यावेत, गड्डे पूर्ण झाकले जातील आणि लागवड करताना डोळे बाहेरच्या बाजूला राहतील याची दक्षता घ्यावी.
4) कंदाची निमुळती बाजू वरती राहील या पद्धतीने कंदाची लागवड करावी.

वाढीच्या अवस्था - हळदीची शेती यशस्वी करण्याकरिता हळदीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य त्या अवस्थेमध्ये खतांची मात्रा देणे किंवा कीड व रोग व्यवस्थापन करण्यास फायदेशीर ठरते. हळदीच्या वाढीच्या प्रमुख चार अवस्था आहेत.

अ. नं. हळदीचे वय वाढीची अवस्था तपशील तापमान (अंश सेल्सिअस)
1) 0 ते 45 दिवस उगवणीची अवस्था या अवस्थेमध्ये हळदीची उगवण पूर्ण होऊन हळदीस एका किंवा दोन पाने येतात. 35 ते 40
2) 46 ते 150 दिवस शाकीय वाढ या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या या अवस्थेमध्ये निश्‍चित होते. 25 ते 35
3) 150 ते 210 दिवस हळकुंड फुटणे फुटव्यांपासून हळकुंडे फुटण्यास सुरवात होते. 20 ते 25
4) 210 ते 270 दिवस हळकुंडे भरणे हळकुंडाची जाडी आणि वजन या दिवसांमध्ये वाढते... 18 ते 20

मध्यम पाऊस व चांगल्या प्रकारच्या जमिनीत हळदीची चांगली वाढ होते. पाण्याचा ताण अगर जास्त पाऊसमान हे पीक काही काळ सहन करू शकते. परंतु जास्त वेळ पाणी साचून राहणे या पिकास हानिकारक आहे. हळदीच्या लागवडीसाठी मे ते जून महिन्यांतील उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. हळदीच्या वाढीसाठी उष्ण, दमट आणि हिवाळ्यातील थंड हवामान उपयुक्त ठरते. थंडीमुळे हळदीची पालेवाढ काही अंशी थांबते व जमिनीत कंदाची (फण्याची वाढ) वाढ होते. कोरडी व थंड हवा कंद पोषणास अनुकूल असते. पावसाळी हंगामातही हळदीच्या खोडांची, फुटव्यांची वाढ भरपूर होते. दमटपणा हा हळदीच्या पिकास अनुकूल असतो. शिवाय हळदीची लागवड जेथे कायमस्वरूपी सातत्याने केली जात नाही, तेथे कंदमाशीसारख्या किडीचा उपद्रव नगण्य असतो.

डॉ. कदम - 9404366141
(लेखक हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment