Thursday, 9 May 2013

जरबेरा फुलशेतीतून दुणावला आत्मविश्‍वास

द्राक्ष शेतीत एका वर्षी मोठा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. मात्र खचून न जाता लातूर जिल्ह्यातील कल्याण पाटील यांनी जरबेरा पिकाचा आधार शोधला. आज द्राक्ष शेतीचे त्यांचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र योग्य व्यवस्थापनातून जरबेरा शेतीतून त्यांचा शेतीतील आत्मविश्‍वास दुणावला आहे.

सध्या उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळताहेत. ही समाधानाची बाब असली तरी शेतीत अनेक समस्यांना तोंड देऊन येणाऱ्या अडचणींवर स्वार होता आले पाहिजे. पाणी, मजूर, हवामान, मार्केट, रोगराई, पीकबदल, भांडवल, तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टींना पुरून उरलात तरच शेतीतून चार पैसे शिल्लक राहतील. अन्यथा, बॅंकेचे कर्ज डोंगर बनून प्रगतीला आडवे येते. मात्र धाडस करून पीक बदलातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचे काम रेणापूर तालुक्‍यातील (जि. लातूर) मोहगाव या सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीच्या गावातील एम.एस्सी. (कृषी) झालेले माणिकराव पाटील यांनी केले आहे.

कल्याण यांचे वडीलही प्रयोगशील शेतकरी. शेतीत नवनवे प्रयोग करून त्यांनी 1990 मध्ये तालुक्‍यात पहिल्यांदा दीड एकर थॉमसन जातीची द्राक्ष लागवड केली. ती फायद्यात आणून दाखविली. आपल्या दोन्ही मुलांनी शिकून शेतीत करिअर करावे ही त्यांची मनोमन इच्छा होती. मोठ्या बाळासाहेबांना पदवीपर्यंत शिकवले. लहान कल्याणला कृषीचे शिक्षण दिले. युरोपात द्राक्ष निर्यात करण्यापर्यंतची क्षमता तयार केली. कल्याण यांनीही आपली जबाबदारी ओळखून शेतीत पुढाकार घेतला. सन 2003 मध्ये माणिकराव यांना राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाला. त्यातून स्फूर्ती घेऊन अनेकांनी पुढे येत तालुक्‍यात 50 हेक्‍टरवर द्राक्ष लागवड केली. सुमारे तीन कोल्ड स्टोअरेज उभारले गेले. तुकाराम येलाले, राजकुमार दाडगे सारखे तरुण द्राक्षनिर्यातीत पुढे आले.

कल्याण यांनी आपल्या शिक्षणाची चुणूक दाखविताना द्राक्ष निर्यातदार म्हणून आपली ओळख निर्माण केली. सन 2010 मध्ये क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईडच्या अवशेषांवरून युरोपातून भारतीय द्राक्षे माघारी आली. त्यात कल्याण यांना मोठा तोटा सहन करावा लागला. एवढी वर्षे शेतीत आटवलेले रक्‍त, मेहनतीने कमावलेला पैसा पाण्यात गेला. एका फटकाऱ्यासह लाखोंचे नुकसान झाले. त्यातून सुधारायला दोन वर्षे गेली. दहा एकरांवरील द्राक्ष शेती अवघ्या तीन एकरांवर आली. तेथून खऱ्या अर्थाने कल्याण नवीन पिकाच्या शोधात लागले.

जरबेराच्या शेतीने दिला हात

माहिती सर्वेक्षणाअंती कल्याण यांना फूलपिकाचा पर्याय योग्य वाटला. सांगली, पुणे भागांत शेतकऱ्यांचे ग्रीनहाऊसमधील जरबेरा, कार्नेशन, गुलाब आदी प्रयोग पाहिले. अन विचारांचे चक्र फिरू लागले. पीकबदलाबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली. पुरेशा अभ्यासाअंती 2012 मध्ये रेणापूर येथील राष्ट्रीय बॅंकेच्या शाखेकडून सुमारे 35 लाख रुपयांचे कर्ज काढले. जरबेरा फुलाचा पर्याय निवडला. या पिकातून अन्य पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत उत्पादन व उत्पन्न सुरू होणार होते. त्यानुसार एका एकरात प्रत्येकी 20 गुंठ्यांची दोन पॉलिहाऊस पुण्याच्या कंपनीची मदत घेऊन उभारली. 50 x 40 मीटरचे दोन शेड उभारले गेले. दोन स्वतंत्र शेड उभारण्याचे कारण म्हणजे ग्रीनहाऊसमधील जोखीम त्यामुळे कमी होणार होती. किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाला तरी एकाच प्लॉटमध्ये होऊ शकणारे नुकसान कमी करणे शक्‍य होते.

ग्रीनहाऊसमध्ये लागवडपूर्व नियोजन करताना लाल माती, निंबोळी पेंड, शेणखत, सुपर फॉस्फेट, डीएपी, ह्यूमिक ऍसिड यांचा वापर केला. रासायनिक पद्धतीने जमिनीचे निर्जंतुकीकरण केले. 70 सें.मी. रुंदी असलेले दीड फूट उंचीचे बेड बनवले. दोन बेडमध्ये 30 सें.मी.चा रस्ता सोडून एकूण 100 बेड बनवले गेले. त्यावर ठिबकच्या दोन लाइन अंथरून घेतल्या. फॉगर तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारलेल्या शेडसाठी सुमारे 43 लाख रुपये खर्च आला. पुण्यातील कंपनीकडून 33 रु. प्रति नग या प्रमाणे रोपे आणून प्रत्येकी 30 सें.मी. वर एक याप्रमाणे एका बेडवर दोन ओळी लावल्या. प्रत्येक प्लॉटमध्ये सुमारे साडेबारा हजार रोपे बसली. एका प्लॉटमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रोपांचे नुकसानही झाले. सहा ते सात रंगाची म्हणजे पिवळी, लाल, गुलाबी, श्‍वेत, पर्पल आदी फुले लावली आहेत. मागील वर्षी 25 जुलै रोजी लावण केली. ठिबक संचातून विद्राव्य खते देण्यात येत आहेत. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही केला जातो. भुरी, माईट, फुलकिडे, नागअळी आदींच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी फवारण्या केल्या. जैविक उपायांमध्ये निंबोळी अर्क, स्टिकी ट्रॅप यांचा वापर केला आहे.

तोडणी व विक्रीचे नियोजन
सुमारे 90 दिवसांनी फुले पहिल्या तोडणीस आली. 25 ऑक्‍टोबर 2012 पासून आतापर्यंत एक दिवसाआड तोडणी चालू आहे. प्रति तोडणीस सुमारे सात हजार फुले मिळतात. महिन्याला एक लाखांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते. अर्थात ऋतूप्रमाणे त्यांच्या संख्येत बदल होतो. अडीच फुटांचा दांडा ठेवून प्लॅस्टिक कॅप बसवून प्रत्येकी दहा फुलांचे बंडल केले जाते. बॉक्‍समध्ये 400 फुले (प्रत्येक रंगाची) पॅक करून लेबल लावले जाते. फुले
हैदराबाद व औरंगाबाद येथे एसटी परिवहन मंडळाच्या किंवा खासगी बसने पाठवली जातात.
सध्या फुलांना लग्नसराईमुळे प्रति नग सहा रुपये दर सुरू आहे. दरात कायम चढ-उतार होतात. एक रुपया किमान, तर नऊ रुपयांपर्यंत कमाल दरही मिळाली आहे. दर महिन्याला मजूर, बॉक्‍स, पॅकिंग, प्लॅस्टिक कॅप, लेबर, खते, कीडनाशके, वाहतूक, वीज, सूक्ष्म अन्नद्रव्ये, बॅंकेचे व्याज असा खर्च येतो.
जरबेरा शेती योग्य प्रकारे केली तर परवडते असे कल्याण म्हणतात. कृषी विभागाचे अनुदान असल्याने ती किफायतशीर होत असल्याचे ते म्हणतात.

सध्या उन्हाळ्यात तापमान नियंत्रित ठेवताना फॉगिंगच्या माध्यमातून आर्द्रता टिकवली जाते. संरक्षित पाण्याच्या सोयीसाठी दीड कोटी लिटरचे शेततळे घेतले आहे. बोअर व विहिरीतून ते भरले जाते. सध्या पाण्याची तशी अडचण नाही. कल्याण यांच्याकडून प्रेरणा घेत लातूर जिल्ह्यांत सुमारे चार- पाच जणांनी एक, अर्धा एकर, दहा गुंठ्यांची पॉलिहाऊस उभी केली आहेत. कल्याण यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, देवेंद्र जाधव, दिलीप भिसे, प्रदीप रेड्डी, श्री. फड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कृषी खात्याच्या सहकार्याने सुमारे 19 लाख रुपयांचे अनुदान व स्वतःचे तीन लाख अशी 22 लाख रुपयांची कर्जाची रक्कम कल्याण यांनी बॅंकेला परत केली आहे.

अन्य पिकांत एकरी क्षेत्राच्या मर्यादेत अनुदान दिले जाते. मात्र ग्रीन हाऊसमध्ये ठिबक सिंचनासाठी खर्च जास्त येतो. तसेच फॉगर्स, फिल्टरसाठी एकरी 3.50 लाख रुपयांचा खर्च असतो. अनुदानात बदल होऊन वेगळा निकष असावा, असे कल्याण यांनी म्हटले आहे.

कल्याण व बाळासाहेब या दोन भावांत 65 एकर शेतीत केवळ दोन एकर द्राक्ष, ऊस व अन्य पिके आहेत. संरक्षित शेतीमुळे उत्पन्नाचा चांगला पर्याय मिळाला आहे. थोड्या क्षेत्रात, कमी मजुरांत उत्पन्नाची हमी फुलशेतीत असल्याने कल्याण यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी तरुणांसह अनेक शेतकरी भेट देत आहेत. सुशिक्षित तरुणाची फळीच्या फळी जिल्ह्यात शेतीत पुढे येते आहे हे चित्र निश्‍चितच स्वागतार्ह आहे.

संपर्क ः कल्याण पाटील, 9890565013
मु.पो. मोहगाव, ता. रेणापूर, जि. लातूर

(लेखक लातूर कृषी विभागात कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment