Monday, 20 May 2013

तीळ लागवडीविषयी माहिती द्यावी

तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. हे पीक खरीप, अर्धरब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये घेता येते. खरीप हंगामामध्ये जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीळ लागवड करावी. हेक्‍टरी दीड ते दोन किलो बियाणे लागते. लागवडीसाठी एकेटी- 64 या जातीची निवड करावी. ही जात 90 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी नऊ क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 48 टक्के आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम, तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडीची बीजप्रक्रिया करावी.

बियाणे फार बारीक असल्यामुळे पेरताना समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्रपीक म्हणून घेता येते. लागवड करताना तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (2 ः1) तीळ + कपाशी (3ः1) अशी आंतरपीक पद्धती वापरावी.

माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा. माती परीक्षणानुसार कमतरता असेल तर पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या खतांच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात दिल्या असता उत्पादनात वाढ होते.

पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन- तीन कोळपण्या, खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. उन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
संपर्क - 02452 - 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

No comments:

Post a Comment