Monday, 20 May 2013

हिरवळीची पिके वाढवितात जलधारण क्षमता

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात सुधारणा होते. हिरवळीची खते हलक्‍या जमिनीची जलधारण क्षमता वाढवितात. समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडतात.
ताग ः
ताग (बोरू) हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारे हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर हेक्‍टरी सर्वसाधारणपणे 17.5 ते 20 टन सेंद्रिय खत मिळते. त्यापासून 60 ते 100 किलो प्रतिहेक्‍टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत तागाची योग्य वाढ होत नाही.

धैंचा ः
हे तागापेक्षा काटक हिरवळीचे पीक आहे. या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावरही गाठी निर्माण होतात. त्यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पतींपेक्षा 5 ते 10 टक्के जास्त आहे. पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त चोपण जमिनीतसुद्धा धैंचा पीक वाढू शकते. पावसाळ्याच्या सुरवातीला हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे पेरावे. पीक सहा ते सात आठवड्यांत 90 ते 100 सें.मी. उंचीचे वाढल्यानंतर जमिनीत नांगराने गाडावे. या कालावधीत धैंचापासून 18 ते 20 टन इतके हिरव्या वनस्पतीचे उत्पादन मिळते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 इतके असून, मुळावरील व खोडावरील गाठींतील जिवाणूंमुळे प्रतिहेक्‍टरी 150 कि. ग्रॅ.पर्यंत स्थिर केले जाते.

द्विदलवर्गीय पिके ः

मूग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, कुळीथ, गवार ही पिके फुलोऱ्याआधीसुद्धा गाडून चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर सर्व अवशेष जमिनीत गाडल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.

हिरव्या कोवळ्या पानांची खते ः
शेतात बांधावर किंवा पडीक जागेवर गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, मोगली, एरंड पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा कोवळ्या फांद्या तोडून जमिनीत मिसळावीत. या हिरवळीच्या पिकांचा एक मुख्य फायदा म्हणजे या पिकांसाठी ज्या जमिनीत मुख्य पीक घ्यावयाचे आहे, तेथे हिरवळीच्या पिकाच्या लागवडीसाठी वाट बघावी लागत नाही. केवळ बांधावर या पिकांची लागवड करून त्यांच्या कोवळ्या फांद्या, पाने तोडून ते मुख्य पिकातील जमिनीवर मिसळता येतात. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्‍यता नसते.

गिरिपुष्प ः
गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये 8.5 टक्के कर्ब, 0.40 टक्का नत्र असते. या वनस्पतीची बांधावर लागवड करून त्याची पाने वरचेवर जमिनीत मिसळता येतात. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते.

हिरवळीचे पीक घेताना तागाची लागवड फायदेशीर ठरते. त्याखालोखाल धैंचा, शेवरी, उडीद, मूग, मटकी, चवळी ही पिके आहेत. याशिवाय गिरिपुष्प, करंज, सुबाभळीचा पाला, मोगली, एरंड इत्यादी पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर करता येईल. धैंचा व शेवरी ही पिके क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. विशेषकरून विदर्भातील पूर्णा खोऱ्याच्या खारपाण पट्ट्यात ही पिके वापरण्यास चांगला वाव आहे. मूग, सोयाबीन, चवळी ही बेवडाकरिता लावावीत. कारण या पिकांच्या मुळावरील गाठी हवेतील नत्र शोषून तो जमिनीत स्थिर करतात.

प्रमुख हिरवळीच्या पिकामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण ः
अ.क्र. +हिरवळीचे पीक +नत्र +स्फुरद +पालाश +जस्त +लोह +तांबे +मॅंगेनीज
+ +टक्‍क्‍यांमध्ये +मिलिग्रॅम/किलोमध्ये
1 +शेवरी +2.62 +0.30 +1.25 +40 +1968 +36 +210
2 +जंगली धैंचा +3.98 +0.24 +1.30 +50 +480 +44 +110
3 +गिरिपुष्प +3.49 +0.22 +1.30 +30 +550 +19 +150
4 +चवळी +1.70 +0.28 +1.25 +--
5 +मूग +2.29 +0.26 +1.26 +--

हिरवळीच्या खतांमुळे होणारे फायदे ः 1) हिरवळीच्या खतांमुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात सुधारणा होते.
2) जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते.
3) हिरवळीच्या खतामुळे जमिनीत सूक्ष्म जिवांना अन्न व ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांची संख्या व कार्यशक्तीत वाढ होते. परिणामी, जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात.
4) जमिनीत सूक्ष्म जिवांची वाढती संख्या व कार्यशक्तीमुळे हिरवळीच्या पिकांचे विघटन चांगले होते. या खतांमधून पिकांना पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून ती पिकांना सहज प्राप्त होतात.
5) या खतामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढून जमिनीत हवा खेळती राहते. मातीची जडणघडण, संरचना आणि जमिनीचे फूल सुधारते.
6) ही खते भारी जमिनीत मातीच्या रवाळ घडणीस मदत करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून निचरा सुधारतो.
7) हिरवळीची खते हलक्‍या जमिनीची जलधारण क्षमता वाढवितात.
8) ही पिके जमिनीवर आच्छादन तयार करतात. त्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. याशिवाय पावसाचे थेंब आणि पाण्याच्या प्रवाहाने होणारी जमिनीची धूप थांबते.
9) लवकर कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची विद्राव्यता वाढवून ते पिकांना उपलब्ध होतात.
10) जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह इत्यादींची उपलब्धता वाढते.
11) हिरवळीच्या खतांमुळे अन्नद्रव्ये वरच्या थरातून खालच्या थरात वाहून जाण्यास प्रतिबंध होतो.
12) द्विदलवर्गीय हिरवळीची पिके हवेतील नत्र जमिनीत स्थिर करतात व या नत्राची हिरवळीच्या पिकाचे विघटन होत असताना भर पडून पुढील पिकास त्याची उपलब्धता वाढते.
13) हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवांद्वारे व विघटन होत असताना निर्माण होणाऱ्या आम्लामुळे चुनखडी आणि स्फुरद (फॉस्फेट) तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची द्राव्यता वाढते.
14) हिरवळीचे पीक योग्य वातावरणात एका हंगामात जवळपास प्रतिहेक्‍टरी 60 ते 100 किलो नत्राची भर घालते.
15) तणांची वाढ हिरवळीच्या पिकांमुळे खुंटली जाते. त्यामुळे मुख्य पिकावाटे अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
16) हिरवळीची खते समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडतात. धैंचा या हिरवळीच्या पिकाची क्षारयुक्त चोपण जमिनीत लागवड केल्यास जमिनीच्या निचऱ्यामध्ये वाढ होते. पिकांना अपायकारक क्षार कमी होऊन जमिनीची सुधारणा होते.
17) हिरवळीच्या खतांमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात जवळपास 15 ते 20 टक्के वाढ होते.

संपर्क ः डॉ. खर्चे - 8275013940
(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment