Monday, 20 May 2013

जैविक खताच्या वापरासाठी करा योग्य पद्धतीचा वापर -

विविध पिकांसाठी जैविक खते वापरण्याच्या पद्धती जाणून घेतानाच जैविक खतांचा वापर करताना कशी काळजी घ्यावयाची याविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ. योग्य प्रकारे जैविक खते वापरल्यास पिकांच्या उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. डॉ. सरिता मोवाडे, डॉ. ऋषिपाल सिंह, डॉ. अजयसिंग राजपूत, रमेश चंद्र
फळबागांसाठी जैविक खते - दोन- चार किलो नत्रयुक्त जैविक खत (ऍझोटोबॅक्‍टर) व दोन- चार किलो स्फुरदयुक्त जैविक खत + 40-100 किलो कंपोस्ट + दोन लिटर पाणी + शेणखत (दोन किलो) + माती (एक किलो) + मायकोरायझा दोन किलो याप्रमाणे मिश्रण करून घ्यावे. या मिश्रणाचा 50 ग्रॅमचा एक गोळा याप्रमाणे गोळे तयार करावेत. फळबागेत प्रत्येक झाडाच्या आळ्यात चार गोळे समोरासमोर ठेवून, मातीने झाकावेत. नंतर पाणी द्यावे.

- कडधान्य पिकांसाठी त्यांच्या गटानुसार योग्य ती रायझोबियम जैविक खते वापरावीत.
- तृणधान्ये व अन्य पिकांसाठी (उदा. गहू, ज्वारी, मका, तीळ, कापूस, संत्रा, मोहरी, कांदा, बटाटा, भाजीपाला व फळबागांसाठी) ऍझोटोबॅक्‍टरचा वापर करावा.
- ऊस, ज्वारी व भातासाठी ऍझोस्पीरिलम जैविक खत वापरावे.
- पिकांची स्फुरदाची गरज भागविण्यासाठी स्फुरदयुक्त जैविक खत वापरावे. जैविक खताच्या वापराचा पूर्णपणे फायदा होण्यासाठी त्याच्या वापरण्याच्या पद्धती योग्य असणे आवश्‍यक आहे.

जैविक खतांचा वापर करण्याची पद्धती - 1) बीज उपचार पद्धती - ही पद्धती मुख्यतः बी पेरून घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी वापरतात. या पद्धतीत 10 ते 15 किलो बियाण्यासाठी 200 ग्रॅम जैविक खत पुरेसे असते. 200 ग्रॅम जैविक खत प्रति 500 मि.लि. पाण्यात मिसळून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात 10-15 किलो बियाण्यावर योग्य पद्धतीने लेप बसेल या पद्धतीने चोळावे, जेणेकरून प्रत्येक बी वर जैविक खताचा थर येईल. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत थोडा वेळ (पाच मिनिटे) वाळवून लगेच पेरणी करावी. जर माती आम्लधर्मी असेल तर चुन्याच्या निवळीचा वापर आपण करू शकतो.

2) मुळावरील उपचार पद्धती - - रोपाची लागवड होणाऱ्या पिकांसाठी ही पद्धती वापरतात. उदा. भात, टोमॅटो, मिरची इत्यादी.
एका बादलीत एक किलो नत्रयुक्त जैविक खत आणि पुरेसे पाणी घ्यावे (एक एकरमध्ये किती रोपांची लागवड करायची आहे, त्यानुसार पाच ते दहा लिटर पाणी घ्यावे), या जैविक खताच्या मिश्रणात रोपांची मुळे बुडवून ठेवावीत. या प्रक्रियेमुळे रोपांची चांगली वाढ होते.

- भात रोपांसाठी जैविक खताचा वापर - लागवडीपूर्वी जैविक खतांच्या मिश्रणात रोपांची मुळे 25 ते 30 मिनिटे बुडवून ठेवावीत. भाताच्या लागवडीसाठी पुरेशा आकाराचे वाफे (2 मी. x 1.5 मी. x 0.15 मी.) शेतात तयार करावेत. त्यामध्ये दोन इंच पाणी टाकून, दोन किलो प्रत्येकी ऍझोस्पीरिलम व स्फुरदयुक्त जैविक खते मिसळावीत. या मिश्रणात भाताचे रोपटे सहा ते दहा तास बुडवून ठेवावे, त्यानंतर लागवड करावी.

3) मृदा उपचार पद्धती - स्फुरदयुक्त जैविक खते नेहमीच मृदा उपचार पद्धतीनेच वापरावी. दोन ते चार किलो स्फुरदयुक्त जैविक खत 40 ते 50 किलो मातीत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून एक एकर जमिनीत पेरणीपूर्वी सकाळी जमिनीत मिसळून द्यावे.

फायदे - 1) नत्रयुक्त ऍझोटोबॅक्‍टर जैविक खतातील जिवाणू नत्र स्थिर करण्यासोबत विशिष्ट प्रकारचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक तयार करतात, त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पिके निरोगी होतात.
2) जमिनीत पिकांच्या वाढीला आवश्‍यक इंडाल ऍसिटिक ऍसिड, जिब्रॅलिक ऍसिड हे जिवाणू तयार करतात. जमिनीचा पोत सुधारतात.
3) सेंद्रिय पदार्थाचे लवकर विघटन होते. जैविक खताच्या वापराने त्या जिवाणूशिवाय अन्य फायदेशीर जिवाणूंची संख्या जमिनीत वाढते. माती जिवंत राहण्यास मदत होते.
4) मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांच्या उत्पादनात 10-15 टक्के वाढ होते.
5) मायकोरायझा खताच्या वापराने पिकांची चांगली वाढ होते. पिकांना रोग निर्माण करणाऱ्या बुरशीची लागण होत नाही. तसेच, सूत्रकृमींपासून मुळांचे रक्षण करते.

जैविक खतांचा वापर करताना घ्यावयाची काळजी - 1) वेगवेगळ्या पिकांसाठी विशिष्ट जैविक खत कार्यक्षम असते. पिकांच्या वाढीला नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नघटकांची गरज असते. म्हणून नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त व मायकोरायझा जैविक खते वापरणे आवश्‍यक आहे.
2) नत्रयुक्त जैविक खते वापरताना पिके कोणत्या वर्गात येतात हे बघून जैविक खत निवडावे. उदा. डाळवर्गीय पिकासाठी योग्य ते रायझोबियम जैविक खत निवडावे.
3) शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचे जैविक खत वापरणे आवश्‍यक आहे. जैविक खत विकत घेतल्यानंतर वापर होईपर्यंत थंड ठिकाणी साठा करावा, त्यासाठी मडके, रांजणाचा वापर करावा.
4) जैविक खते विकत घेताना त्यावरील पिकांचे नाव, उत्पादन तिथी व वापरण्याची अंतिम तिथी, बॅच नंबर, वापरण्याच्या पद्धती या गोष्टी वाचाव्यात.संपर्क - डॉ. सविता मोवाडे - 09423636052
(लेखक क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, जबलपूर येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment