Monday, 20 May 2013

जांभळापासून पेये बनविण्याची पद्धत

जांभळाच्या फळांना व बियांना औषधी महत्त्व प्राप्त झाले असल्याने त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास फार चांगला वाव आहे. जांभळाच्या फळांमध्ये जातीपरत्वे 50 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत खाण्यायोग्य गराचे प्रमाण असते. ही फळे अतिशय नाजूक व नाशवंत असल्याने एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवता येत नाहीत. यासाठी फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा उपयोग होईल, हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल. अशा प्रक्रिया उद्योगातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल.

जांभळापासून पुढील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात -रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाइन, कार्बोनेटेड शीतपेये, जॅम, जेली, बर्फी, टॉफी, जांभूळपोळी, गराची पावडर, बियांची पावडर, कच्च्या फळांपासून व्हिनेगार इत्यादी पदार्थ तयार करता येतात.

जांभळापासून विविध प्रकारची पेये तयार करण्याची पद्धत 1) सरबत, नेक्‍टर, स्क्वॅश, सिरप - जांभळाच्या पिकलेल्या फळांना गर्द जांभळा रंग असल्याने त्यांच्यापासून तयार केलेल्या पेयांना आकर्षक रंग येतो. जांभळापासून विविध प्रकारची पेये तयार करता येतात. उदा. सरबत, नेक्‍टर, स्क्वॅश, सिरप इत्यादी व त्यांना बाजारपेठेतदेखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
वरील पेये तयार करण्यासाठी एफपीओच्या कायद्यानुसार पुढील घटकांचे प्रमाण असावे -
चौकट आहे.

अ.क्र. + पेयाचे नाव + रसाचे (%) + टीएसएसचे (%) + आम्लता (%) + सोडिअम बेन्झोएटचे प्रमाण (पीपीएम)
1. +रस +85 +10 +-- +610
2. +सरबत +10 +13 +0.30 +100 - 125
3. +नेक्‍टर +20 +15 +0.30 +100 - 125
4. +स्क्वॅश +25 +45 - 55 +1.00 - 1.50 +610
5. +सिरप +25 - 45 +65 - 68 +1.50 - 2.00 +610

जांभळापासून पेये तयार करण्यासाठी फळातील रसाच्या टीएसएसचे प्रमाण व आम्लता लक्षात घेऊन योग्य प्रमाणात साखर, सायट्रिक आम्ल, पाणी व परिरक्षक घेऊन पेये तयार केली जातात.

- जांभळापासून पेये तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या, निरोगी, चांगल्या फळांची निवड करावी.
- नंतर फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
- स्वच्छ धुतलेली फळे ब्रश टाइप पल्परमधून काढून घ्यावीत. यामध्ये बिया वेगळ्या होतात व फळांचा एकजीव झालेला गर वेगळा होतो.
- हा एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 60 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाला 15 ते 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते.
- हा लगदा थंड झाल्यावर हायड्रॉलिक बास्केट प्रेसमधून काढून घ्यावा किंवा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. या रसाचा टीएसएस, आम्लता लक्षात घेऊन साखर, सायट्रिक आम्ल, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
- नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरून, बाटल्या हवाबंद करून, लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
- सरबत व नेक्‍टरमध्ये पाणी न घालता थंड झाल्यावर प्यावे, तर स्क्वॅश व सिरपमध्ये 1ः3 व 1ः4/5 पट पाणी मिसळावे. चवीनुसार जिऱ्याची पावडर व मीठ वापरल्यास पेयाला चांगला स्वाद प्राप्त होतो.
- अशा प्रकारे तयार केलेला स्क्वॅश व सिरप एक वर्षापर्यंत चांगला टिकवून ठेवता येतो.

2) जांभळापासून मद्य (जामून वाइन) - भारतामध्ये इतर अल्कोहोलयुक्त मद्यांच्या तुलनेने फळांपासून तयार केलेल्या वाइनचे उत्पादन फारच कमी आहे. जांभळाचा रस मधुमेहावर फार गुणकारी असल्याने जांभळाची वाइनसुद्धा आरोग्यासाठी पोषक असते. वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विंचूर व सांगली जिल्ह्यात पलूस या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने वाइन पार्क्‍स स्थापन केलेले आहेत. या उद्योगास शासनातर्फे विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत.

संपर्क - डॉ. गरंडे, 9850028986
(लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत.)

No comments:

Post a Comment