Monday, 20 May 2013

योग्य कांदा साठवणुकीतून मिळवा "मार्केट'

कांद्याची योग्य वेळी काढणी करून तो चांगला सुकविल्यास कांद्याची प्रत आणि आकर्षकपणा टिकून राहू शकतो. कांदा सुकविल्यानंतर साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे असते. शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवण केल्यास साठवणुकीतील नुकसान कमी होते. कांदा चांगला सुकवून कांदाचाळीत भरला की तो पाच महिने चांगला टिकतो. डी. एम. साबळे
देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी अंदाजे 30 ते 40 लाख टन कांद्याची आवश्‍यकता असते. खराब वातावरणामुळे खरीप हंगाम वाया गेल्यास रब्बी हंगामात तयार झालेला व साठवणुकीत असलेला हा कांदा फेब्रुवारीपर्यंत पुरवून वापरावा लागतो. अशा वेळेस कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मागील वर्षी देशात 29 लाख टन कांद्याची साठवण झालेली होती, त्यापैकी राज्यात एकूण 15.5 लाख मे. टन कांदा साठविला होता. शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळीत 10 लाख टन, तर पाच लाख टन पारंपरिक कांदाचाळीत साठविला होता. खरीप 2012 मध्ये अपुऱ्या पावसामुळे राज्यात खरीप हंगामातील कांद्याच्या क्षेत्रात व उत्पादनात घट झालेली होती; परंतु राज्यात शेतकऱ्यांच्या स्तरावर उभारण्यात आलेल्या शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळींमुळे कांद्याची पुरेशी उपलब्धता झाली.

खरीप व लेट खरीप हंगामात उत्पादन होणाऱ्या कांद्याची साठवणूक क्षमता कमी असते, तसेच कांदा सुकविण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने खरिपाचा कांदा साठविला जात नाही, तसेच साठवणुकीतील कांदासाठा संपुष्टात आलेला असल्यामुळे बरेचदा चांगले बाजारभाव खरीप हंगामातील कांद्याला मिळत असतात, त्यामुळे शेतकरी हा कांदा काढणीनंतर त्वरित बाजारात विक्रीला आणतात. रब्बी हंगामातील कांदा हा साठवणुकीस योग्य असतो. तो पाच महिने टिकू शकतो, त्यामुळे हा कांदा साठवणूक करणे योग्य असते.

योग्यवेळी काढणी आणि सुकवणी महत्त्वाची : राज्यात एकूण उत्पादनापैकी रब्बी हंगामाचा हिस्सा 25 ते 30 लाख टन (60 टक्के) इतका आहे. शेतकऱ्यांनी हा कांदा साठवणूक न करता बाजारपेठेत एप्रिल ते मेमध्ये काढणीनंतर विक्रीला आणल्यास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही. बाजारभावात स्थिरता आणण्यासाठी व देशांतर्गत बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी मालाची उपलब्धता वाढविण्यासाठी कांदा साठवण आवश्‍यक आहे.
1) कांद्याची योग्य वेळी काढणी करून तो चांगला सुकविल्यास कांद्याची प्रत आणि आकर्षकपणा टिकून राहू शकतो. साठवणुकीसाठी उत्पादित होत असलेल्या कांद्यास जास्तीत जास्त शेणखताचा अथवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
2) अति नत्राचा वापर केल्यास त्याचे आकारमान वाढते; परंतु तो जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे साठवणुकीतील कांद्यास लागवडीनंतर 60 दिवसांच्या आत नत्र द्यावे. उशिरा नत्र दिल्यास माना जाड होतात, कांदा टिकत नाही. यासाठी कांद्याची लागवड करताना कांदा साठवायचा की काढणीनंतर त्वरित विक्री करावयाचा याचे नियोजन करावे.
3) रब्बी/ उन्हाळी हंगामातील कांदा काढणीपूर्वी दोन ते तीन आठवडे आधीपासून पाणी तोडावे, त्यामुळे कांदा पक्व व घट्ट होतो आणि मान पडण्यास सुरवात होते. 50 टक्के माना मोडल्यानंतर लगेच कांद्याची काढणी करावी. कांदे पात व मुळासकट शेतात ओळीने पसरवून सुकवावेत. मागच्या ओळीतील कांद्याच्या पातीने पुढच्या ओळीतील कांदे झाकून जातील अशा बेताने कांदे एकसारखे शेतात पसरावेत, त्यामुळे उघड्या रानात कांदे उन्हाने खराब न होता त्यातील पाण्याचा अंश कमी होतो.
4) काढणीनंतर कांदा शेतात तीन ते पाच दिवस पातीसकट व्यवस्थित सुकवावा, त्यानंतर मानेची ठराविक लांबी ठेवून (तीन- पाच सें.मी.) पीळ देऊन पात कापावी. ही प्रक्रिया साठवणुकीच्या कांद्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पीळ देऊन मान कापल्यास त्यामध्ये रोगजंतूंचा शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो.
5) मान कापलेला कांदा झाडाखाली सावलीत पसरून चांगला सुकवावा. सावलीमध्ये सुकविलेल्या कांद्यास दुहेरी पापुद्रा येऊन आकर्षक रंग प्राप्त होतो.
6) कांदा पूर्ण सुकलेला आहे किंवा नाही याची खूण म्हणजे त्यातील तीन ते पाच टक्के पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे.
7) मान बारीक होऊन पूर्णपणे मिटलेली असावी. कांदा घट्ट आणि वरचा पापुद्रा सुकून त्याचा रंग आकर्षक झाला पाहिजे.

साठवणुकीपूर्वीची प्रतवारी व हाताळणी : 1) कांदा सुकविल्यानंतर साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे असते. रोगट व इजा झालेले कांदे साठवणुकीत इतर कांद्यांचे नुकसान करतात, त्यामुळे कांदा साठवणुकीत प्रतवारी करावी.
2) रोगट व इजा झालेले, जाड मानेचे, चिंगळी, जोड कांदे आणि डेंगळे असलेले कांदे बाजूला करावेत, ते त्वरित बाजारात विक्री करावेत.
3) सर्वसाधारण काढलेल्या कांद्याची मोठा (सहा सें.मी. व्यास आणि वरचे), मध्यम (चार ते सहा सें.मी. व्यासाचे) व लहान (दोन ते चार सें.मी. व्यासाचे) अशा रीतीने तीन गटांत प्रतवारी करावी.
4) लहान तसेच मोठ्या आकाराच्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात वजनात घट येते, त्यामुळे मध्यम आकाराचे कांदे साठवणुकीसाठी वापरणे योग्य असते, तर उर्वरित आकारमानाचे कांदे जुलै- ऑगस्टपर्यंत विक्रीचे नियोजन करावे.

सुधारित चाळीमध्येच कांदा साठवणूक - 1) शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवण केल्यास साठवणुकीतील नुकसान 25 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी करता येते. कांदा चांगला सुकवून कांदाचाळीत भरला की तो पाच महिने चांगला टिकतो.
2) कांदा साठवणुकीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेल्या कांदाचाळीचा वापर करावा, ज्यामध्ये नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून कांदाचाळीतील तापमान 25 ते 30 अंश व आर्द्रता 65 ते 70 टक्के या मर्यादेत ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येते.
3) कांदाचाळीची आतील रुंदी जास्तीत जास्त चार फूट असावी. रुंदी वाढली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात.
4) जमिनीपासून 1.5 ते दोन फूट मोकळी जागा ठेवून कांदा साठवण ठेवावी. तळासाठी अर्धगोल बांबू वापरावा. तळासाठी कॉंक्रिटचा वापर करू नये. तळाशी दोन ते तीन फूट माती काढून रेतीचा थर द्यावा. खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते व गरम झालेली हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होऊन बाहेर जाते.
5) कांदाचाळीच्या दोन्ही बाजूस उभ्या भिंतीसाठी बांबू, जंगली लाकूड किंवा पऱ्हाट्या इत्यादी साहित्याचा वापर करावा, तर छतासाठी सिमेंट पत्रे किंवा मंगलोरी कौले यांचा वापर करावा. शक्‍यतोवर टीन पत्र्यांचा वापर करू नये.
6) कांदाचाळीच्या छतावर उन्हाळ्यात आच्छादनासाठी गवत, उसाचे पाचट अथवा ज्वारीचा कडबा यासारख्या उष्णतारोधक साहित्याचा वापर करावा, जेणेकरून आतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
7) कांदाचाळीची उभारणी करताना उंच व मोकळ्या जागेवर करावी, तसेच पत्र्यांना पुरेसा ढाळ देऊन दोन मीटरपर्यंत पत्रे बाहेर काढावेत, त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या ओसांड्यापासून बचाव होतो.
8) कांदाचाळीस मध्यभागी अधिक उंची व जास्त उतार दिल्यास चाळीमध्ये हवा जास्तीत जास्त खेळती राहून पावसाळ्यात आतमध्ये आर्द्रता साठत नाही.
9) कांद्यावर सरळ सूर्यप्रकाश येण्याचे टाळावे, त्यामुळे कांद्याचा रंग फिका पडतो व गुणवत्ता खालावते, त्यामुळे दुपाखी कांदाचाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम, तर एकपाखी कांदाचाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. शक्‍यतोवर बाहेरील बाजूस शेडनेटचा वापर करावा.
10) साठवणुकीपूर्वी, साठवणुकीनंतर तसेच मधून-मधून कांदाचाळी व परिसर निर्जंतुक करून घ्यावा, म्हणजे सड कमी होते.
11) कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक उंची चार ते पाच फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते, हवा खेळती राहत नाही, त्यामुळे विशेषतः खालील थरातील कांद्याचे नुकसान होते.
12) साठवणुकीसाठी निवड केलेला कांदा, साठवणूकगृहाची रचना या दोन्ही बाबी शास्त्रोक्त पद्धतीने अमलात आणल्यास कांदा चार- पाच महिने चांगल्या रीतीने सुरक्षित राहू शकतो. ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या महिन्यांत त्यांच्या विक्रीचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक उत्पन्न या साठवणूक केलेल्या कांद्यापासून मिळू शकते.

कांद्याची उपलब्धता - 1) देशात मागील वर्षी अंदाजे 150 लाख टन कांद्याचे उत्पादन, त्यापैकी महाराष्ट्रात अंदाजे 50 लाख टन उत्पादन.
2) राज्यात खरीप, लेट खरीप व रब्बी या तीन हंगामांत कांद्याचे उत्पादन होते. त्याची सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये 20 टक्के, फेब्रुवारी- मार्चमध्ये 20 टक्के आणि एप्रिल- मे मध्ये 60 टक्के याप्रमाणे काढणी होते.
3) जून ते सप्टेंबर वगळता संपूर्ण आठ महिने ताजा कांदाच बाजारात उपलब्ध असतो.

No comments:

Post a Comment