Thursday, 6 June 2013

हळद पिकातून मिळवले प्रयत्नपूर्वक यश

अमरावती - यवतमाळ राज्य महामार्गावर नांदगाव खंडेश्‍वरपासून सहा किलोमीटर अंतरावर सावनेर गावालगतच 37 वर्षीय विरंजय अलोने यांची शेती आहे. त्यांनी डी. फार्मपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते अमरावती येथे औषध विक्रीचा व्यवसाय करायचे. मात्र वडिलोपार्जित शेती आणि व्यवसाय सांभाळताना खूप घालमेल व्हायची. त्यामुळे शेती हाच व्यवसाय म्हणून करायचे ठरवले. गेल्या चार वर्षांपासून ते पूर्ण वेळ शेती करतात. त्यांची 35 एकर शेती असून, पैकी 13 एकर ओलित आहे. दोन विहिरी आहेत. सोयाबीन-तूर, कापूस, गहू आणि हरभरा ही पिके घेतात. दोन बैल जोड्या आहेत.

हळद पिकाचे नियोजन हळद पिकाचे नियोजन करताना एक एकरावर कृष्णा जातीची निवड केली. बेणेप्रक्रिया करून झिगझॅग पद्धतीने बेणे लावले. लागवडीसाठी वखराच्या पासेला दोरी बांधून बेड तयार केले.

2) तंत्रज्ञान वापराचे ठळक मुद्दे- * लागवडपूर्व मशागतीवर भर.
* शेणखताचा भरपूर वापर.
* दर्जेदार बेण्याचा वापर व बेडचा वापर
* मे महिन्याच्या सुरवातीलाच लागवड केल्याने पीक वाढीस भरपूर कालावधी मिळाला.
* पाणी व खताचे योग्य नियोजन.
* ठिबकचा अनुभव नसल्याने तात्पुरत्या ठिबकचा वापर.
* हळदीत आंतरपीक फायदेशीर ठरले.
* मर लागलेली झाडे गड्यासहित उपटून घेतली.

हळदीचे पीक घेण्यासाठी कमी खर्चिक स्थानिक स्तरावरील तात्पुरत्या ठिबक सिंचनाचा वापर केला. त्यासाठी एकरी दहा हजार रुपये खर्च आला. आता चार एकरांवर दर्जेदार ठिबकसाठी तयारी केली आहे. एका एकरात 10 ट्रॉली शेणखत टाकले. काही विकतचे तर काही घरचे वापरले. शेणखत मशागत करतानाच शेतात पसरवून दिले. बेड तयार करतानाच बेसल डोस दिला. एकरी चार बॅग जिप्सम, दोन बॅग सुपर फॉस्फेट, प्रत्येकी एक बॅग डी.ए.पी. आणि पोटॅश व चार किलो बुरशीनाशक वापरले.

त्यानंतर 60, 120 व 240 दिवसांनी डी.ए.पी., पोटॅश, युरिया व मॅग्नेशिअम प्रत्येकवेळी मागच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात दिले. आवश्‍यकतेनुसार करपा व पाने कुरतडणारी अळी प्रतिबंधक कीडनाशकांची फवारणी केली.

जमिनीचा ओलावा पाहून पाण्याचे नियोजन केले. मे महिन्यात लागवड केल्याने त्या वेळी दोन ते तीन दिवसांत पाणी दिले. पावसाळ्यात पाण्याची गरज पडली नाही. डिसेंबरपर्यंत आठ ते 15 दिवसांच्या फरकाने पाणी दिले. जानेवारीत पाणी बंद केले.

"ऍग्रोवन'मधील यशकथा वाचूनच प्रयोग केला अलोने म्हणाले, की "ऍग्रोवन' दररोज घरी येतो. त्यातील यशकथा सर्वांत आधी वाचतो. त्यापासून शेतीत प्रयोग करण्याची प्रेरणा मिळते. बोरीअरबचे (जि. यवतमाळ) हळद उत्पादक रितेश भोयर व जगदीश चारोळे यांची ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध यशकथा वाचूनच मी हळदीचा प्रयोग केला. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

अलोने यांच्याकडून शिकण्यासारखे काही - * कमी शेतीत जास्त उत्पादन घेण्यावर भर.
* पारंपरिक पिकाऐवजी नवी पीकपद्धती वापरण्याकडे कल.
* प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून पिकाचा अंदाज व अनुभव घेतात.
* सातत्याने कृषिविषयक वाचन
* कृषी प्रदर्शनी, कार्यशाळांना कायम उपस्थिती
* नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे कल.
* परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी देतात.

4) एकरी जमा-खर्च - एकूण नियोजनातून सुमारे 300 ते 350 क्विंटल ओल्या, तर सुमारे 55 क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळाले. 100 क्विंटल गड्ड्यांची विक्री केली. 20 क्विंटल गड्डे घरच्या लागवडीसाठी ठेवले. वाळलेल्या विना पॉलिश केलेल्या हळदीचे प्रत्येकी 40 ते 50 किलो वजनाची पोती शेतावरील गोदामात साठवून ठेवली आहेत. सध्या प्रति क्विंटल साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर आहे. ऑगस्टमध्ये हा दर 10 हजार रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा असल्याने अद्याप विक्री केलेली नाही. हिंगोली मार्केटमध्ये विक्रीचे नियोजन आहे.

उत्पादन खर्च - बेणे 22,000 रु. तर 20 हजार फवारणी व खते, काढणी, शिजवणी, वाळवून साठवणे यासाठी मजुरी व सामग्री भाडेशुल्कासह 30 हजार रुपये खर्च आला. 5,000 रुपये पॉलिश, व 5,000 रुपये वाहतूक खर्च धरून 82,000 रुपये खर्च झाला. 10 हजार रु. तात्पुरत्या ठिबकचा व 6000 रु. शेणखत खर्चाचा समावेश केल्यास एकरी 98,000 रुपये खर्च आला.
विक्रीसाठी वऱ्हाकुऱ्हा (जि. अमरावती) जवळची बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी हिंगोलीवरून येणारे व्यापारीच हळदीची खरेदी करीत असल्याने हिंगोली मार्केटला विक्री केल्यास भाव चांगला मिळतो.
यंदा अर्धा एकर हळद क्षेत्र वाढवणार आहेत.

5) मार्केट स्टडी - हळद काढणीपासून उकळणे व वाळवणे यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. तसेच 30 दिवसांचा कालावधी लागतो. हळद विक्रीला आल्यावर भाव पडत असल्याचा अन्य पिकांचा अनुभव याही पिकाच्या बाबतीत आला. मात्र पुढे वाढलेल्या भावांचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने हळद राखून ठेवली आहे.
2011 मध्ये क्विंटलला 15 ते 21,000, 2012 मध्ये 3,500 ते 6,000 रु. असे हळदीचे भाव होते.

6) समस्या व उपाय - अलोने यांच्या मते हळद उत्पादकांचा गट झाल्याशिवाय अनुदान मिळत नाही. हळद काढणी, शिजवणी, वाळवणी व पॉलिश ही वेळ खाऊ व श्रमाची कामे आहेत. ट्रॅक्‍टरने हळद काढणी केल्यास मजूर, श्रम व वेळ वाचेल. मात्र लागवडीचे नियोजन तसे करावे लागेल. हळद शिजवणी व पॉलिश यंत्र महाग आहे. कृषी विभागाने ते उपलब्ध करून दिल्यास शेतकरी मोठ्या संख्येत या पिकाकडे वळतील. हळद विक्रीसाठी या परिसरात मार्केट उपलब्ध नाही.

अलोने यांनी दिल्या काही टिप्स- * हिरवळीची पिके, हळदीचा पाला यांचे जैविर आच्छादन फायदेशीर
* हळदीच्या रानाचा जास्त तुडवा करू नये.
* मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी आटोपून घ्यावी.
* हळद वाफेवर शिजवावी. त्यासाठी तीन लोखंडी टाक्‍याच्या सोप्या यंत्राचा वापर करावा.
* काढणीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करता येईल अशा पद्धतीनेच लागवड करावी.

संपर्क - विरंजय अलोने, 7875648024, 9503209824

No comments:

Post a Comment