Monday, 10 June 2013

कमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब

पुणे - उसासारखं नगदी पीक देणाऱ्या जमिनीवर डाळिंबाची लागवड. वाचून आश्चर्य वाटलं ना! हो, हे खरंय. कदाचित तुम्हाला शेतकऱ्यानं घेतलेला हा निर्णय चुकीचा वाटेल. पण, अवर्षणग्रस्त भागातील पाण्याच्या कमतरतेवर मात करत कमी जागेत आणि कमी खर्चात आपल्या दूरदृष्टीनं मोहन धुमाळ या शेतकऱ्यानं डाळिंबाचं भरघोस पीक घेऊन नवा शेतकऱ्यांना आदर्श दिलाय.
 फळबागांची लागवड एक उत्तम पर्याय
शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या गावातल्या मोहन धुमाळ यांनी पारंपरिक शेती न करता दोन एकरात डाळिंबाची लागवड केलीय. या फळबागेला बहर धरला असून यातून त्यांना आता ४ लाख २० हजार रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी आलेला दीड लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना यातून दोन लाख रुपये निव्वळ नफा होणार आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं या अवर्षणग्रस्त स्थितीत ऊस, ज्वारी आणि चारा ही नगदी पिकं घेणं नुकसानकारक होतं. यासाठी धुमाळ यांनी एकूण आठ एकर जमिनीपैकी दोन एकरात डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची निवड केली. त्यांच्या या प्रयत्नाला आलेलं भरघोस यश बघून तालुक्यातले अनेक शेतकरी आपल्या कसदार जमिनीत नगदी पिकाचं उत्पन्न न घेता फळबागांची लागवड करू लागलेत.
लागवडीसाठी एकूण खर्च
मोहन धुमाळ यांना लागवड केलेल्या डाळिंबाच्या जमिनीची मशागत करण्यासाठी ५ हजार रुपये खर्च, तर डाळींब रोपांच्या आधारासाठी लागणारी बांबू काठी, खतं, औषध फवारणी यांचा एकूण खर्च १६,२०० रुपये झाला. तसंच मजुरीचा खर्च २०,००० रुपये आला. तर यंदाच्या ढगाळ हवामान आणि अनियमित पावसामुळं कीड आणि रोगांच्या बंदोबस्ताकरता २६,००० रुपये हा अधिकचा खर्च करावा लागला. असा एकूण दीड लाख रुपये खर्च आला.
कमी पाण्यात उत्पादन
मोहन धुमाळ यांनी डाळिंबाची लागवड करताना आजूबाजूला पाणी उपलब्ध नसल्याचं लक्षात येताच ही पाण्याची गरज भागवण्यासाठी आपल्या विहिरीला ठिबक संच लावून त्याद्वारे बागेला पाणी दिलं. त्याच्या कष्टाला फळ येऊन या बागेतून त्यांना एकूण सहा टन डाळिंब मिळण्याची शक्यता आहे. या भगव्या जातीच्या डाळिंबाला पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या या डाळिंबाला ६० ते ७० रुपये किलो असा भाव मिळत आहे.
सुरुवातीला परिसरातल्या शेतकऱ्यांनी धुमाळ यांचा डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु त्यांच्या निर्णयाला आलेलं यश बघून येणाऱ्या काळात पाण्याचा कमी वापर करून शेती करणं हीच काळाची गरज बनली आहे, हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलंय. त्याकरिता मोहन धुमाळ यांच्यासारखी दूरदृष्टी ठेवून उपलब्ध असणाऱ्या थोड्या क्षेत्रात का होईना फळबाग लागवड करणं हिताचं राहील, असंच जणू निदर्शनास येत आहे.

No comments:

Post a Comment