Thursday, 20 June 2013

नियंत्रण उसावरील पोक्का बोंग रोगाचे...

पावसाळा सुरू झाल्यानंतर पोक्का बोंग या बुरशीजन्य रोगाची लागण उसामध्ये दिसून येते. त्यानंतर सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्याने पिकांमध्ये सापेक्ष आर्द्रता वाढते, तापमान कमी होते. अशा परिस्थितीत या रोगाची बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. राज्यात कोसी 671, को 86032, कोएम 0265, को 8014, को 94012, कोव्हीएसआय 9805, व्हीएसआय 434, को 7527, को 7219 आणि को 419 या ऊस जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

रोगाची लक्षणे - 1) पावसामुळे हवेत आर्द्रता वाढल्याने पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फ्युजारियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानांवर दिसून येते.
2) सुरवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्‍यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट- पिवळसर पट्टे दिसून येतात. रोगाची लागण झालेल्या पानांवर सुरकुत्या पडून पाने आकसतात, तसेच त्यांची लांबी घटते. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने सडतात/ कुजतात व नंतर गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात.
3) पाने कुजल्याने किंवा गुरफटल्याने कांड्यांचे पोषण होत नसल्याने कांड्या आखूड व वेड्यावाकड्या होतात. कधी कधी रोगाची तीव्रता वाढल्यावर पोंगा मर किंवा शेंडा कुज दिसून येते.
4) काही वेळेस रोगग्रस्त उसाच्या कांड्यांवर कांडी काप (नाईफ कट) रोगाची लक्षणे दिसून येतात. शेंडा कुज व कांडी काप (नाईफ कट) झालेल्या उसातील शेंड्याचा जोम नष्ट होतो, त्यामुळे उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात, कालांतराने असे ऊस वाळतात.
5) रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगशा फुटल्याने उसाच्या उत्पादनात घट येते. रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त उसाचेच नुकसान होते, तथापि बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही.

रोगाचा प्रसार - या रोगाचा प्रसार हवेमार्फत तसेच पाणी, पाऊस व कीटकांद्वारे देखील होतो. मात्र, बेण्याद्वारे रोगाचा प्रसार होत नाही.

रोग नियंत्रणाचे उपाय - 1) रोगामुळे शेंडे कुज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढून नष्ट करावेत, त्यामुळे रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात आळा बसतो.
2) पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर लगेचच खाली सुचविल्याप्रमाणे बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
अ) मॅंकोझेब 0.3 टक्के (एक लिटर पाण्यात तीन ग्रॅम मॅंकोझेब) किंवा
ब) कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 0.2 टक्के (एक लिटर पाण्यात दोन ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड) किंवा
क) कार्बेन्डाझिम 0.1 टक्के (एक लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्बेन्डाझिम)
रोगाची लागण दिसून आल्यानंतर वरीलपैकी एका बुरशीनाशकाच्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. एक एकरास मोठ्या बांधणीनंतर फवारणीसाठी 200 लिटर द्रावण लागेल. फवारणीच्या द्रावणात सर्फेटन्ट मिसळावा.
3) माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची (मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची) मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी.
4) शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा.

संपर्क - 020 - 26902100, 26902268
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे येथे ऊस रोगशास्त्र विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment