Monday, 10 June 2013

घटसर्प, काळपुळी, फुफ्फुसदाह रोगांकडे नको दुर्लक्ष

1) घटसर्प - गला घोटू किंवा परपड या नावाने हा आजार ओळखला जातो. गाय, म्हैस, शेळी, लहान वासरे इत्यादी सर्व वयोगटांतील जनावरांत या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. इतर जनावरांपेक्षा म्हैसवर्गीय प्राण्यांत हा आजार अतितीव्र स्वरूपात आढळतो.

रोगप्रसार -
या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या श्‍वसनसंस्थांमध्ये आढळतात. रोगी जनावरांच्या नाकातून, तोंडातून येणाऱ्या स्रावातून किंवा स्रावाने संपर्कात आलेल्या चारा, पाणी व दूषित पाण्यानेसुद्धा हा रोग पसरतो.
लक्षणे -
- सडकून ताप (106 ते 107 डिग्री) येतो, जनावर थरथर कापते.
- घशाखाली व गळ्यावर सूज येते (सूज येण्याअगोदर बाधित जनावरे श्‍वसन करताना घरघर आवाज येतो).
- डोळे लाल होतात, श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. श्‍वास घेण्यास त्रास होतो, जनावरे जीभ बाहेर काढतात.
- नाकातून व तोंडातून पाण्यासारखा स्राव येतो, जनावरे जमिनीवर पडून राहतात.

औषधोपचार - आजारी जनावराला तीव्र स्वरूपात किंवा काही वेळेस अतितीव्र स्वरूपात हा आजार होतो. यामुळे हा आजार होऊ नये म्हणून अगोदरच लसीकरण करून प्रतिबंध करणे संयुक्तिक ठरते.
प्रतिबंधात्मक उपाय -
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्व जनावरांना घटसर्परोधक प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

2) फऱ्या - हा रोग एकटांग्या, धावऱ्या किंवा घाट्या या नावाने ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग असून गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी इत्यादी जनावरांना होतो. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील शरीराने धष्टपुष्ट असलेल्या जनावरांत सर्वाधिक आढळतो.
रोगप्रसार -
क्‍लॉस्ट्रिडिअम चोवाई या जिवाणूने बाधित चारा, पाणी व मातीमार्फत जनावरांना होणाऱ्या लहानसहान जखमा, तोंडातील व जिभेवरील व्रण यांतून सदरील जिवाणू जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. शरीरातील मांसल भागात (उदा. मांडी) काही काळ सुप्तावस्थेत राहून अनुकूल वातावरण मिळताच जिवाणूंची संख्या वाढते. जनावरे रोगाची लक्षणे दाखवू लागतात.
लक्षणे -
- सडकून ताप (106 ते 108 डिग्री) येतो, जनावर सुस्त पडते, काळवंडते.
- श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, श्‍वास घेण्यास त्रास होतो.
- जनावरांचा मांसल भाग उदा. मांडी (फरा), मान इत्यादीवर अचानक जास्त प्रमाणात सूज येते. या सुजेवर दाबले असता करकर असा आवाज येतो.
- सूज आलेल्या पायाने जनावर लंगडते, सूज आलेला भाग सुरवातीच्या अवस्थेत अतिशय गरम व वेदनादायी असतो, त्यानंतर तो भाग थंड व वेदनारहित होतो. जनावर जमिनीवर पडून राहते आणि 12 ते 48 तासांत दगावते.
औषधोपचार -
आजारपणाची लक्षणे दिसताच ताबडतोब पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
प्रतिबंधात्मक उपाय -
पावसाळ्यापूर्वी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात फऱ्या रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

3) काळपुळी (अँथ्रॅक्‍स) - बेसिलस अँथ्रॅसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा हा रोग शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हैस, घोडा व पक्षी इत्यादी सर्व वयोगटांच्या जनावरांना होऊ शकतो. या आजारास फाशी, काळपुळी इत्यादी नावांनी ओळखले जाते. हा संसर्गजन्य रोग आहे.
रोगप्रसार - अँथ्रॅक्‍सचे जिवाणू जमिनीत व संसर्गित चारा- पाण्यामध्ये आढळतात. श्‍वसनाद्वारे व चावक्‍या माश्‍यांमुळेसुद्धा हा आजार पसरतो.
लक्षणे -
- अचानक ताप (104 ते 108 डिग्री) येतो. जनावरे चारा- पाणी वर्ज्य करतात, सुस्त होतात.
- जनावरांचे पोट फुगते, दुधातून रक्त येते, जनावर झटके देते.
- अतितीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर अचानक मृत्युमुखी पडते आणि मेलेल्या जनावराच्या तोंडातून, गुद्‌द्‌वारातून, नाकातून, कानातून काळसर रंगाचे रक्त येते, हे रक्त गोठत नाही.
उपचार -
आजारपणाच्या सुरवातीच्या अवस्थेत जनावरे औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देतात, यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने तातडीने उपचार करावेत.
प्रतिबंध -
ज्या भागात अँथ्रॅक्‍स आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची माहिती ऐकिवात आहे, त्या भागात दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला जनावरांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.

4) तिवा - हयाबडो व्हायरस या विषाणूंमुळे होतो. मुख्यत्वेकरून गाय, म्हैस बाधित होतात. जनावरांना तीन दिवस कालावधीचा सडकून ताप आणणारा हा आजार विषाणूजन्य असून, चावक्‍या माश्‍या पसरवितात.
लक्षणे -
- जनावरास सडकून ताप येतो, जनावर काळवंडते, थरथरते, सुस्त होते.
- एका पायाने लंगडते, ताठरते; मान, छाती, पाठ व पायांचे स्नायू आकुंचित पावतात.
प्रतिबंध -
हा आजार चावक्‍या माश्‍या व डासांमुळे पसरत असल्यामुळे डासांचे व माश्‍यांचे निर्मूलन करावे. गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू जरी होत नसला, तरी तीन दिवसांच्या आजारपणामुळे जनावर खंगते. यामुळे जनावरांवर त्वरित उपचार करून घ्यावेत.

5) फुफ्फुसदाह (निमोनिया) -
हा जिवाणू, विषाणू, बुरशी व अस्वच्छता इत्यादी विविध कारणांमुळे होणारा आजार असून, सर्वच प्राणिवर्ग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, वराह इत्यादींना होतो.
लक्षणे -
- जनावरांना थंडी वाजून ताप येतो, श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो.
- श्‍वास घेताना घरघर आवाज येतो, जनावरांना खोकला येतो.
- सुरवातीच्या अवस्थेत नाकपुड्यांतून पाण्यासारखा स्राव येतो, त्यानंतरच्या अवस्थेत (जुनाट निमोनिया) पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो. डोळ्यांतून पाणी वाहते, डोळे निस्तेज व मलूल बनतात.
औषधोपचार -
शिफारशीत प्रतिजैविकांचा वापर तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सतत पाच ते सात दिवस केल्यास जनावरे पूर्णपणे ठणठणीत बरी होतात.
प्रतिबंधात्मक उपाय -
- जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
- आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे, जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी झूल पांघरावी.

6) सर्रा - हा आजार गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा व उंट इत्यादी प्राण्यांत सर्वसाधारणपणे पावसाळ्यात सर्वांत जास्त आढळतो.
रोगप्रसार - टॅबानस नावाच्या चावक्‍या माश्‍या हा आजार पसरवितात.
लक्षणे -
- अचानक ताप येतो, जनावर गोल गोल फिरते
- अडखळत चालते, झाडावर- भिंतीवर डोके आदळते
- झटके देते व मृत्युमुखी पडते
उपचार -
या आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजारांशी मिळतीजुळती असल्याने तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच या आजाराची खात्री करून ताबडतोब उपचार अवलंबल्याने आजार पूर्णपणे बरा होतो.
प्रतिबंध - चावक्‍या माश्‍या हा आजार पसरवण्यामागे मुख्य कारण असल्याने त्यांचे निर्मूलन करावे. गोठा तसेच परिसरात स्वच्छता व कोरडेपणा ठेवावा. सतत हा आजार आढळणाऱ्या भागात किंवा गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

7) आंत्रविषार - शेळी- मेंढी, त्यांची करडे व गाई- म्हशींची लहान वासरे यांना होणारा अत्यंत भयंकर आजार आहे. क्‍लॉस्ट्रिडिअम परफ्रिनजन्स जिवाणू मातीत आढळतात. चारा- पाण्याच्या माध्यमातून शेळी- मेंढीच्या आतड्यात प्रवेश करून वास्तव्य करून राहतात.
रोगप्रसार - जिवाणूंमुळे दूषित अन्न, चारा, पाणी सेवनाने जिवाणू पोटात जाऊन आतड्यात विष निर्माण करतात. आतड्यात विष तयार झाल्याने ते रक्तातून शरीरात भिनते, यामुळे जनावरांना बाधा होते.
लक्षणे -
- शेळ्या- मेंढ्या अचानक मलूल होतात व त्यांना रक्तमिश्रित पातळ हगवण लागते
- आजारी मेंढ्यांना उभे राहता येत नाही, पाय झाडतात, पोटशूळ होते, बेशुद्ध पडतात
- शेळ्या- मेंढ्या तडकाफडकी मृत्युमुखी पडतात
- चार ते सहा आठवड्यांची करडे फार लवकर मृत्यू पावतात
उपचार - या आजारावर औषधोपचार तेवढा परिणामकारक ठरत नाही; पण तोंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचा वापर केला जाऊ शकतो.
प्रतिबंध - पावसाळ्यापूर्वी शेळ्या- मेंढ्या, त्यांची करडे व लहान वासरे यांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

8) नीलजिव्हा (ब्लू टंग) - अरबोव्हायरस या विषाणूंमुळे हा आजार होतो, मुख्यत्वेकरून मेंढ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव होतो.
रोगप्रसार - सर्वसाधारणपणे पावसाळ्यात होणारा हा आजार कुलीकॉईड्‌स नावाच्या चावक्‍या माश्‍या पसरवितात.
लक्षणे -
- ताप येतो, जीभ, हिरड्या व ओठांवर सूज येते
- जिभेवर सालपटे निघतात, जीभ निळी-जांभळी रंगाची होते
- मेंढ्या लाळ गाळतात व त्यांच्या नाकातून स्राव येतो
- मेंढ्यांच्या पायांतील सांध्यांवर सूज येते व त्या लंगडतात
औषधोपचार - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत. रोगी मेंढीचे तोंड पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुऊन घ्यावे. त्यानंतर जिभेवर, हिरड्यांवर व ओठांवर शिफारशीत मलम लावावे.
लसीकरण - या आजारावर कुठल्याही प्रकारची लस अद्याप उपलब्ध नाही. यासाठी हा आजार पसरवणाऱ्या चावक्‍या माश्‍यांचे निर्मूलन करणे फार महत्त्वाचे आहे.

डॉ. गजानन ढगे : 9423139923.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ (पशुवैद्यकशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment