Monday, 10 June 2013

२५ एकर पपईतून ५० लाखांचा नफा!

विदर्भातील शेती ही पावसाच्या भरवशावर पिकते. त्यामुळं कपाशी, सोयाबीनसारखी पारंपरिक पिकं घेण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर वाजले बारा... अशा अनिश्चिततेची टांगती तलवार बळीराजाच्या मानेवर नेहमीच असते. त्यामुळंच चाकोरीबाहेर जाऊन वेगळी पिकं घेणारे शेतकरी हे इथल्या बळीराजाचे आयकॉ़न्स ठरतात. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री इथले देवीदास राऊत-पाटील त्यापैकीच एक. ६५व्या वर्षी या बहाद्दरानं २५ एकर शेतीत पपईची लागवड केली आणि ५० लाखांचं उत्पन्न मिळवलं. त्यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी एवढे शेतकरी येतायत की, त्यांची शेती म्हणजे आता पर्यटन स्थळच झालंय.

Papaya 1.png२५ एकर शेतीमध्ये केली पपईची लागवड
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आज विदर्भात सिंचनाच्या फारशा सुविधा नाहीत. ज्यांच्याकडं विहीर, बोअर आहे, असे मोजके शेतकरी आता परंपरेची चाकोरी तोडून वेगवेगळी पिकं घेतायत. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री इथले शेतकरी देवीदास राऊत त्यापैकीच एक. वयाच्या साठीनंतर आजही त्यांचा शेती करण्याच्या उत्साह तरुणाला लाजवेल असा आहे. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय असल्यानं ते मातीत मनापासून राबतात. जगाचा कानोसा घेण्याची वृत्ती असल्यानं आपण नवीन काय करू शकतो, याचाही ते सतत पाठपुरावा करीत असतात. अशीच त्यांना पपईच्या शेतीबद्दल माहिती मिळाली. सर्व विचार करून त्यांनी आपल्याकडच्या २५ एकर शेतीमध्ये पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आजमितीला त्यांची पपईची शेती फळारूपास आलीय. आतापर्यंत आलेल्या पपईतून त्यांना ४० लाखांचं उत्पन्न मिळालंय. आताचा आणखी बहर पाहता येत्या काही दिवसांमध्ये आणखी ३५ लाखांची कमाई होईल असा अंदाज आहे. म्हणजेच एकूण ७५ लाखांचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. या पपई शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी जवळच असलेल्या एका सिंचन तलावाच्या माध्यमातून त्यांनी सिंचनाची सोय केलीय.

Papaya22 17.png५० लाखांचा निव्वळ नफा
पपईच्या शेतीसाठी राऊत-पाटील यांना आत्तापर्यंत २५ लाखांचा खर्च आला असला तरी त्यांना लगेचच या शेतीमधून ५० लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. वाशीममधील ही पपई दिल्लीचे व्यापारी खरेदी करत असून त्यांना पपईचा भावसुद्धा चांगला मिळत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं पपईची शेती त्यांना मालामाल करणार, हे आता पुरतं स्पष्ट झालंय.

शेतकऱ्यांनी घेतली प्रेरणा
राऊत–पाटील यांच्या पदरात आतापर्यंत ७०० टन पपईचं पीक पडलंय. साईराम गोरे या सोनखास येथील शेतकऱ्यानं सांगितलं की, पाटलांमुळं मलाही प्रेरणा मिळाली आणि मी पपईचं पीक घ्यायला सुरुवात केली. अशा Papaya 3.pngप्रकारे इतर पिकांपेक्षा पपईत अधिक उत्पन्न मिळतं हे जाणून इतर शेतकरीसुध्दा या लाखमोलाच्या शेतीसाठी मार्गदर्शन घेत आहेत. आणि येत्या काही महिन्यात पपई शेतीकडे वळणार असल्याचं अनेक शेतकरी सांगतात.

शेती फायद्याचीच हे सिध्द केलं
परिवारातील सदस्याचा नकार असतानासुद्धा पपई शेतीच्या माध्यमातून वाट चोखाळण्याचा राऊत–पाटील यांचा निर्णय किती योग्य होता, हे आता पुरतं सिद्ध झालंय. नावीन्यपूर्ण शेती करण्याचा त्यांचा निर्णय आज तरुण शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरलाय. वडिलांच्या या उत्साहाला जोड देण्याचा आणि त्यांच्यासह काम करण्याचा निर्णय नंदकिशोर यांनीही घेतला. उतरत्या वयात शेतीच्या माध्यमातून लाखाचं उत्पन्न घेऊन शेती ही तोट्याची नसून फायद्याची ठरू शकते हे त्यांनी दाखवून दिलंय. यामधून देशातील जास्तीत जास्त तरुणवर्गाला शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांना वाटतेय.

Papaya 19.pngयशाचं गमक
शेतीत आत्मविश्‍वास येण्यामागे पिकाचं शास्त्रशुद्ध ज्ञान, नियोजन आणि मेहनतीची तयारी हवी. पिकासाठी हंगाम, रोग-किडी, कीडनाशकं यांबाबत माहिती; खते, कीडनाशकं, बाजारपेठेचा अभ्यास असल्यास शेतीत तोटा होण्याचे धोके कमी होतात. एकच एक पीक घेऊन चालत नाही. एका पिकात नुकसान झालं तर दुसऱ्या पिकानं साथ द्यायला हवी. वेगवेगळी पिकं, रस्ते, मजूर, बाजारपेठा आणि उपलब्धता यांचा अभ्यास शेतीत सतत असायला हवा. हिंमत हरता कामा नये. प्रयोगशीलता हवी. निरीक्षण हवं. इतरांचे प्रयोग पाहावे लागतील. त्यातून खरी नजर येते, आत्मविश्‍वास वाढतो. मग आपल्या शेतात पाय रोवून उभं राहण्याची ताकद येते, असं राऊत-पाटील सांगतात. हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.

संपर्क : देवीदास राऊत-पाटील - 9420102500

No comments:

Post a Comment