Tuesday, 23 July 2013

"रमझान"चे मार्केट ओळखून दरवर्षी कलिंगडाचे नियोजन

कमी कालावधीत मिळतो आर्थिक आधार 
जालना जिल्ह्यातील विश्‍वंभर तारक यांचा प्रयोग

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील विश्‍वंभर तारक सुमारे आठ वर्षांपासून कलिंगड शेती करतात.
रमझान सणाच्या कालावधीत असलेली मागणी लक्षात घेऊन ते या पिकाचे नियोजन करतात.
सुमारे 10 ते 14 एकर क्षेत्रावरील कलिंगडाच्या लागवडीपासून एकरी 15 ते 20 टन उत्पादन ते घेतात.
सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत हे पीक चांगला आर्थिक आधार देऊन जाते असे तारक यांचे म्हणणे आहे.

शेतीत नियोजनाला खूप महत्त्व असते. एखादी बाब चुकली तर ती दुरुस्त करायला काही कालावधी जावा लागतो.
सध्या अनेक शेतकरी सणसमारंभ आदींचा विचार करून पीक नियोजन करतात. पुढील वर्षी कोणत्या क्षेत्रावर कोणते पीक कोणत्या दिवशी लावायचे आहे हे आधीच ठरविलेले असते. परभणी जिल्ह्यातील एकनाथ साळवे यांचा वर्षातून तीन वेळा कलिंगड पीक घेण्यामध्ये हातखंडा आहे. हेच कौशल्य अंबड तालुक्‍यातील (जि.जालना) आंतरवली सराटी येथील विश्‍वंभर बाबासाहेब तारक यांनीही कमावले आहे.
सुमारे आठ ते दहा वर्षांपासून रमझान सणासाठी कलिंगड लागवड करतात. आपले नियोजन एकदाही "फेल' ठरले नाही असे ते अभिमानाने सांगतात. सुरवातीची दोन ते तीन वर्षे त्यांच्याकडे फक्त पाच एकर कलिंगड होते. क्षेत्र वाढवत तीन वर्षांपासून ते 12 ते 14 एकर क्षेत्रापर्यंत गेले आहे. वर्षनिहाय ते थोडेफार कमी-जास्त होते.

यंदा ते 14 एकरांपर्यंत आहे. काढणीला अद्याप सुमारे आठ ते दहा दिवसांचा अवकाश असून व्यापाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. सध्या दोन किलोपासून ते सहा किलोपर्यंत वजनाची फळे प्लॉटमध्ये असल्याचे तारक म्हणाले.

रमझान सणासाठीच नियोजन
मुस्लिम धर्मीयांसाठी रमझान सणाचे खूप महत्त्व आहे. फळांचे सेवन करूनच ते उपवास सोडतात. त्यामुळे सर्व प्रकारची फळे या सणानिमित्ताने बाजारपेठेत उपलब्ध होतात. तारक यांनी याच गोष्टीचा विचार केला आहे. रमझान सणाच्या सुमारे 70 दिवस आधी ते कलिंगडाची लागवड करतात. शक्‍यतो एकच वाण संपूर्ण शेतात वापरला जातो. त्यांच्या शेतातील प्रत्येक फळ सरासरी सहा ते नऊ किलो वजनाचे तर काही 12 किलोपर्यंत असतात. या पिकाचा कालावधी केवळ दोन महिन्यांपर्यंत पूर्ण होत असल्याने काढणीनंतर प्लॉट रिकामा होऊन मधुमकासारख्या पिकाची लागवड करणे शक्‍य होत असल्याचे तारक म्हणतात.

प्रत्येक वर्षी रमझानचे उपवास 28 ते 30 दिवस आधी सुरू होतात. त्यामुळे त्या वेळचे वातावरण, पाण्याची उपलब्धता व इतर पिकांच्या कामाची वेळ या सर्वांची सांगड घालत कलिंगडाचे नियोजन करावे लागते. अति जास्त उष्णतामान वा थंडी याचा वेलीच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा वेळेस विशेष काळजी घ्यावी लागते. दहा वर्षांच्या अनुभवातून अनेक बारीकसारीक बाबी तारक यांच्या लक्षात येऊ लागल्या आणि कलिंगड व्यवस्थापनातील त्रुटी कमी होऊ लागल्या.

वेळ साधून पीक व्यवस्थापन
रमझान संपता-संपता सर्व मालाची विक्री होईल असे नियोजन केले जाते. साधारणतः लागवडीपासून 62 ते 64 व्या दिवसांपासून काढणीस सुरवात करून उर्वरित सहा ते आठ दिवसांत मालाची विक्री केली जाते. तोपर्यंत फळाचे वजन सहा ते नऊ किलोपर्यंत भरते. या वर्षी रमझान ईद सात ऑगस्टला आहे हे लक्षात घेऊन लागवड 27 ते 30 मे दरम्यान केली आहे.

कलिंगडांचे व्यवस्थापन
तारक यांच्या कलिंगड शेतीचे प्रातिनिधिक उदाहरण असे. त्यांची जमीन मध्यम स्वरूपाची असून पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे गादी वाफे केलेले नाहीत. लागवडीसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरवातीलाच जमीन नांगरून व वखराच्या दोन-तीन पाळ्या घालून तयार ठेवली. 10 ट्रॉली (ट्रॅक्‍टर) शेणखत वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत टाकले. त्यामुळे ते जमिनीत व्यवस्थित मिसळले गेले. लागवडीपूर्वीच ठिबक पाइप अंथरून घेतले. त्यानंतर लागवड 10 x 2 फूट अंतरावर केली.
रोपे उगवून आल्यानंतर त्यास एकरी दोन बॅग 18- 46-0, थोडेसे पोटॅश व आठ दिवसांनंतर एकरी एक बॅग युरिया खत दिले. 13ः40ः13, 0ः52ः34 आदी विद्राव्य खतांचा वापरही ठिबकमधून केला जातो. दोन वेळेस खुरपणी व निंदणी केली. पण या वर्षी पाऊस सतत रिमझिम स्वरूपाचा पडत राहिल्याने तणे वेचता न आल्याने ती पुन्हा फोफावली. त्यामुळे खर्च काही प्रमाणात वाढला. ढगाळ वातावरणामुळे या वर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा वाढला होता. नेहमीच्या वातावरणात तीन ते चार फवारण्यांऐवजी सहा ते सात फवारण्या झाल्या.

प्रतवारी महत्त्वाची
फळे काढतानाच त्याची पक्वता व रंग याचा अदमास घ्यावा लागतो. एक टिचकी मारून दबदब आवाज येत असेल तर फळ पक्व झाले असे समजून काढणी केली जाते. फळे काढल्यानंतर त्यांचा आकार व वजनाप्रमाणे प्रतवारी केली जाते. एकसमान आकाराची फळे मुंबईच्या वाशी मार्केटला पाठविली जातात. काही वेळा व्यापारी जागेवर येऊन मालाची खरेदी करतात.

पाणी व्यवस्थापन
सुरवातीपासून ठिबक सिंचनावर जोर दिला होता. मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे विहिरीचे उपलब्ध पाणी डाळिंब व मोसंबीलाच अपुरे पडण्याची शक्‍यता होती. त्यामुळे कलिंगड लावण्याचा विचार कमी होता. मात्र दोन किलोमीटर अंतरावरील मांगणी नाल्याजवळील शेतात 35 x 35 फूट आकाराचा व 20 फूट खोलीचा खड्डा घेतला. सुदैवाने त्यास भरपूर पाणी लागले. तेथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले.
सात ते आठ विहिरी असून त्यातून पाण्याची गरज ठिबक सिंचनाद्वारे भागवली जाते.

कमी कालावधीत परवडणारे पीक
दरवर्षी एकरी उत्पादन 15 ते 20 टन यांच्या आसपास असते. हवामान, जमीन व केलेले व्यवस्थापन यावर ते अवलंबून राहते. एकूण उत्पन्न एकरी एक लाख रुपयांच्या आसपास राहते. दर व मागणीनुसार ते कमी-जास्त होत राहते. दरवर्षी उत्पादन खर्च एकरी सुमारे 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत असतो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन एकरी नऊ टनांपर्यंतच मिळाले होते. कलिंगडाला प्रति किलो साडेसहा, साडेआठ रुपयांपासून बारा रुपयांपर्यंत दर मिळतो. रमझानचा सण तोंडावर येतो त्या काळात कलिंगडाला दर कमी म्हणजे किलोला चार ते पाच रुपये राहतो. ज्या वेळी तापमान उष्ण असते (सप्टें.-ऑक्‍टो.) त्या काळात कलिंगडाला अधिक दर मिळतात. औरंगाबाद हे जवळचे मार्केट असले तरी अधिक प्रमाणात तेथे माल खपवण्यास वाव नाही. आवक वाढलीच तर दरही घसरतात. त्या तुलनेत मुंबई हे चांगले मार्केट आहे. आपले कलिंगडाचे क्षेत्र अधिक असले व त्यात जोखीम अधिक असली तरी कमी कालावधीत हे पीक चांगला आर्थिक आधार देऊन जाते असा आपला अनुभव असल्याचे तारक म्हणाले.

शेतीचा मोठा पसारा
तारक कुटुंबाची तीन भावांची मिळून सुमारे 97 एकर शेती आहे. त्यापैकी पावणेचौदा एकर क्षेत्रावर डाळिंब दोन वर्षांपूर्वीच लावले आहे. मोसंबीची सुमारे दोन हजार झाडे आहेत. उर्वरित क्षेत्रावर कापूस, मका, तूर अशी पिके घेतली जातात. पूर्वी दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ जनावरे होती. पण पाण्याची टंचाई व अन्य कारणांमुळे जनावरांची संख्या कमी केली आहे. शेणखताचा वापर पिकांसाठी होतो. काही शेणखत बाहेरूनही विकत घेतले जाते. जनावरांचा गोठा बांधताना त्यातील मलमूत्र एकाच ठिकाणी संकलित करण्याची व्यवस्था केली आहे. तेथून ते फळझाडांना दिले जाते.

कृषी विभागाची मदत
रोजगार हमी योजनेअंतर्गत डाळिंब लागवडीसाठी कृषी विभागाचे कृष्णा गट्टूवार व रमेश चांडगे यांनी तारक यांना मदत केली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे नुकतेच खोदण्यात आले आहे.

संपर्क ः विश्‍वंभर तारक, 9922535371

(लेखक अंबड (जि. जालना) येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 

No comments:

Post a Comment