Tuesday, 9 July 2013

चव्हाणांच्या बागेत फुलतात एक्‍स्पोर्ट क्वालिटीची डाळिंबे


धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी, अशी साक्री तालुक्‍याची ओळख. एकेकाळी भात शेतीबरोबरच द्राक्ष पिकात आघाडीवर असलेला हा तालुका मागील दोन दशकांत पाण्यापासून तुटत गेला, तरीही अडचणीच्या काळात येथील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. डाळिंब पिकाचा पर्याय शोधून त्यातील अनंत अडचणींवर मात करून तो पीक प्रयोगही यशस्वी केला आहे.

साक्री तालुक्‍याच्या दक्षिणेस सुमारे 14 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेले म्हसदी गाव तर तालुक्‍यातील डाळिंब उत्पादकांच्या संघर्षाचे प्रतीक राहिले आहे. याच गावाने तालुका शिवारात डाळिंब शेतीत पहिले पाऊल उचलले. आज तिथे अभ्यासू डाळिंब उत्पादकांचा गट तयार झाला असून, त्यांच्यात प्रयोगांची नित्य देवाणघेवाण होते. याच गटातील अग्रणी नाव म्हणजे रवींद्र चव्हाण. पूर्वी शिंपी (टेलर) हा व्यवसाय असल्याने "आर. के. टेलर' या टोपणनावानेच त्यांना पंचक्रोशीत ओळखले जाते. डाळिंबाला प्रति किलो 111 रुपये हा उच्चांकी दर यंदाच्या वर्षी मिळविणारे आणि युरोपच्या बाजारात नेहमी डाळिंब पाठवणारे म्हसदीच्या शिवारातले "आर. के. टेलर' पहिलेच बागायतदार ठरले आहेत.

डाळिंब शेती अन्‌ 111 नंबरची "रॉयल एन्फिल्ड' सन 2010 पासून चव्हाण यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू असली, तरी त्यापूर्वी डाळिंब शेतीचा 15 वर्षे खडतर प्रवास राहिल्याचे ते सांगतात. चार वर्षांपासून त्यांना सातत्यपूर्ण उत्पादन व उत्पन्न मिळत आहे. साहजिकच त्यांचे राहणीमानच बदलले आहे. यंदाच्या काढणी हंगामात जर्मनीला निर्यात केलेल्या डाळिंबाला किलोला 111 रुपये दर मिळाल्यानंतर त्यांनी "रॉयल एन्फिल्ड' ही नामांकित बुलेट विकत घेतली. गुणवत्तापूर्ण डाळिंब शेतीसाठी सातत्याने प्रेरणा राहावी यासाठी बुलेटला जाणीवपूर्वक 111 क्रमांक घेतला आहे.

संघर्षातून प्रगतीकडे रवींद्र म्हणाले, की वडिलोपार्जित पाच एकर जमिनीत 1985 ते 1995 ही वर्षे बाजरी, कापूस, मका अशी पिके घ्यायचो. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक व्हायचा. आमच्या भागात महेंद्र देवरे, नरेंद्र देवरे, विजय देवरे, सुधाकर देवरे यांनी 90 च्या दशकात डाळिंब घेण्यास सुरवात केली. 1995 मध्ये मी या पिकाची सुरवात केली. पहिली दोन वर्षे शिकण्यातच गेली. सुरवातीला दर किलोला 10 रुपये मिळाला. सन 1997 मध्ये मात्र चांगल्या क्वालिटीमुळे अहमदाबादच्या व्यापाऱ्याने थेट शेतात 25 रुपये किलोने जागेवर माल खरेदी केला. सन 1998 मध्ये तीन एकरांतून सहा टन माल निर्यातीसाठी पाठवला. वाहतूक व तत्सम खर्च वजा जाता किलोला 36 रुपये भाव मिळाला. आता उत्साह वाढू लागला.

संकटांनीच दिली प्रेरणा नंतरच्या काळात तेलकट डाग व मर रोगाने वारंवार पक्वतेच्या टप्प्यात फळे तडकणे, झाडे वाळून जाणे या अडचणी वाढल्या. उत्पादनात अनियमितता येऊन उत्पादनही निम्म्यापेक्षा अधिक घटले. वर्ष 2000 ते 07 पर्यंतचा काळ मोठा अवघड आला. याच काळात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांनी बागांसाठी अनुदान जाहीर झाले. हुरूप वाढला. 2007 मध्ये बाग काढली होती. सन 2008 मध्ये नव्या उमेदीने भगवा जात लावली. दोन बाय दोन फुटांचे खड्डे खोदले. त्यात एक पाटी कुजलेले शेणखत, एक किलो निंबोळी पेंड, एक पाटी माती, थोडे सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम 10:26:26 असे मिश्रण टाकले. 10 बाय 12 फूट अंतरावर लागवड केली. आधीच्या चुकांपासून धडा घेत प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक शास्त्रशुद्ध नियोजन सुरू केले. गुणवत्तापूर्ण उत्पादन व बाजारपेठ या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित केले.

सेंद्रिय आणि रासायनिकचा समन्वय रवींद्र यांनी पीक संरक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापनात सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचा समन्वय साधला आहे. झाडाच्या पोषणासाठी व संरक्षणासाठी या दोन्ही पद्धती आवश्‍यक असल्याचे ते सांगतात. झाड सशक्त करण्यासाठी सेंद्रिय घटकांना पर्याय नाही; मात्र उत्पादनवाढीत व संरक्षणात रासायनिक खते व कीडनाशकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वरखते, विद्राव्य खते, तसेच प्रमाणित कंपन्यांचीच कीडनाशके वापरावर ते भर देतात.

दिवसाचा अधिकाधिक वेळ ते बागेसाठी देतात. मागील पाच वर्षांपासून वर्षातून दहा वेळा "जीवामृत' देतात. शेणखत, गूळ, चक्कीवरचे पीठ यांचे एकत्रित मिश्रण करून ते 12 ते 15 दिवस पाण्यात टाकीत भिजवून ठेवले जाते. त्यानंतर ते प्रति झाड एक लिटर याप्रमाणे बागेत सोडले जाते. डाळिंब झाडाच्या पानांना चकाकी, फळांना चमक, गोडी, आकार व वजनवाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे रवींद्र म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांची डाळिंब शेती दृष्टिक्षेपात

क्षेत्र - पाच एकर (नवी व जुनी एकत्रित), वाण - भगवा
बागेचे वय - सुमारे सात वर्षे
लागवडीचे अंतर - 10 बाय 12 फूट
पाण्याचा स्रोत : विहीर
पाणी नियोजन : रोज पाऊण तास ठिबकने, ऑगस्टमध्ये पानगळीदरम्यान ठिबकने रोज अर्धा तास,
छाटणीनंतर 25 दिवसांपासून पुढे रोज एक तास
जुलै महिन्यात छाटणी, ऑगस्टमध्ये पानगळ

खत व्यवस्थापनातील काही मुद्दे -
(ऑगस्टच्या मध्यावधीत)
प्रति झाड -
निंबोळी पेंड एक किलो, शेणखत 20 किलो, सुपर फॉस्फेट एक किलो.
(पुन्हा 90 दिवसांनी हाच डोस दिला जातो.)

विद्राव्य खते - दर सात दिवसांनी. 19:19:19 हे सहा किलो आणि 13:00:45 हे खत सहा किलो प्रति एकरी. दोन्ही खते एक आड एक आलटून पालटून दिली जातात.

वर्ष - 2011-12 -
उत्पादन (एकरी) - 18 टन
निर्यात झालेला माल - सहा टन, मिळालेला दर - प्रति किलो 130 रु.

वर्ष 2012-13 - एकरी उत्पादन : 15 टन
जर्मनीत निर्यात झालेला माल : आठ टन
दर (निर्यातक्षम माल) - 111 रु. प्रति किलो

देशांतर्गत बाजारात पाठविलेला माल : सात टन

2010-11 निर्यातीसाठी पाच टन व लोकल मार्केटला सात टन माल विकला.

संपर्क : रवींद्र काशिनाथ चव्हाण - 9881595325
म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे

No comments:

Post a Comment