Tuesday, 23 July 2013

करडांच्या व्यवस्थापनातून वाढवा शेळीपालनातील नफा


शेळीपालनातून अधिक नफा मिळविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे. उत्तम आनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. गाभण शेळ्यांची तसेच करडाची योग्य पद्धतीने जोपासना करावी. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.


शेळी व्यायल्यानंतर नवजात करडास स्वतः चाटून स्वच्छ करते. त्यामुळे करडे स्वच्छ होण्याबरोबरच रक्ताभिसरण वाढत असते. शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास करडांचे अंग स्वच्छ जाड्याभरड्या कापडाने स्वच्छ करावे. करडाच्या नाका-तोंडातील चिकट स्राव काढावा जेणेकरून करडांना श्‍वास घेणे सोपे होईल. शेळीने करडाला चाटले तरच ती आपल्या करडास ओळखते, अन्यथा नंतर ती स्वतःच पिल्लांना दूध पिऊ देत नाही.

1) व्याल्यानंतर करडांची नाळ एक ते दीड इंच लांब अंतरावर स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने किंवा ब्लेडने कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्‍चर आयोडीनचा बोळा ठेवावा म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. हळदपुडीचाही वापर यासाठी केला तरी चालतो.
2) खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल. करडांना काही व्यंग उदा. फाटलेल्या नाकपुड्या, आंधळेपण नसल्याची खात्री करावी.
3) जन्मल्यानंतर करडाचे वजन करावे.

करडांना चीक पाजा - 
1) करडे जन्मल्यापासून सुरवातीचे तीन-चार दिवस जे दूध असते त्यास चीक असे म्हणतात. जन्मजात करडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. सुरवातीस काही काळ ती विकसित झालेली नसते. म्हणून निसर्गाने त्यांना रोगप्रतिबंधक शक्ती मिळावी यासाठी मातेमार्फत ती व्यवस्था करून ठेवली आहे.
2) चिकामध्ये "गॅमा ग्लोब्युलिन्स' म्हणजे रक्षक प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जी करडांना अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवतात. तसेच चिकामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त जीवनसत्त्व "अ' चे प्रमाण असून तीन ते पाच पट जास्त प्रथिने असतात. याशिवाय त्यात लोह, तांबे, मॅंगेनीज आणि मॅग्नेशिअम ही खनिजेसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. चिकात सारक गुण असल्याने करडाच्या आतड्यात साठलेल्या मलाचे निस्सारण होण्यास मदत होते.
3) करडे जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजणे आवश्‍यक असते. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10 टक्के इतका चीक पाजावा. वार पडण्याची वाट न बघता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडे तयार होतात.
4) करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून तीन ते चार वेळेस विभागून द्यावा.

आईपासून करडांना वेगळे ठेवून वाढविणे -
जन्मलेली करडे चार-पाच दिवसांची असताना त्यांना आईपासून वेगळे करून स्वतंत्र गोठ्यात ठेवावे. करडे शेळीबरोबरच ठेवली तर ती सतत शेळीच्या कासेला झटून दूध पिण्याचा प्रयत्न करतात. अशी करडे लवकर चारा खायला शिकत नाहीत. शेळीलादेखील यामुळे चारा खाण्यास अडथळा होतो. हे सर्व टाळून करडांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना शेळीपासून वेगळे करून वाढविणे चांगले असते.

करडांना दूध पाजणे -
सुरवातीस एक महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10 टक्के या प्रमाणात दूध पाजावे. त्यानंतर एक ते दोन महिने या काळात 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत दूध पाजावे.

करडांचे व्यवस्थापन -
1) करडांच्या वाढीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्‍यक आहे. करडे एक आठवडे वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या कोठी पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.
2) जसजसे करडे मोठे होतात तसतसे त्यांच्या ओल्या व वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास (लुसर्न) बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा तसेच हादगा, बोर, अंजन, चिंच, सुबाभूळ, वड, पिंपळ इत्यादींचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमूग पाला, हरभरा, तुरीचे काड, भूस द्यावे.
3) वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच 50 ते 100 ग्रॅम खुराक द्यावा. जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल.
4) वयाच्या दोन ते 2.5 महिन्यांत करडांचे दूध हळूहळू कमी करीत पूर्ण बंद करावे आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावे.
5) साधारणपणे दोन ते तीन किलो ओली आणि 1/2 ते एक किलो वाळलेली वैरण करडांना द्यावी. तसेच खुराकाचे प्रमाण 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वाढवावे. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमूग पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ व जीवनसत्त्वे इत्यादींचा समावेश असावा.
6) करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
खच्चीकरण करणे -
7) बोकडांचे खच्चीकरण साधारणपणे एक ते दोन महिन्यांत करावे. यासाठी तज्ज्ञ अशा पशुवैद्यकाची मदत घ्यावी. खच्चीकरणामुळे करडांची चांगली वाढ होते, तसेच मांसाची/ मटणाची प्रतदेखील चांगली राखली जाते. त्याचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होतो.

करडांसाठी निवारा -
1) करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. ओलसर, दमट वातावरण असलेल्या गोठ्यातील करडे आजारांना लवकर बळी पडतात. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.
2) गोठ्याच्या बाहेर थोड्या अंतरावर जाळीदार तारांनी बंदिस्त केलेली जागा असावी. त्यामुळे करडांना फिरावयास जागा मिळते.
3) आपल्याकडे शेळ्या साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये वितात. त्याच काळात कडाक्‍याची थंडी सुरू होते. अधूनमधून बोचरे वारे वाहतात. लहान वयातील करडांचे तीव्र थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्यात ऊबदार वातावरण राहील अशी व्यवस्था करणे योग्य ठरते. त्यामुळे सर्दी, पडसे, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून करडांचा बचाव करता येतो.

आजारांचे नियंत्रण - 
1) शेळ्यांच्या बऱ्याच आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळेस आजारांचे योग्य निदान होण्याअगोदर करडे, शेळ्या दगावतात. तसेच इतर करडे, शेळ्या संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले असते.
2) करडे योग्य वयाची झाल्यानंतर त्यांना रोगप्रतिबंधक लसी आणि जंतनाशक औषधे द्यावीत.
3) फुफ्फुसाचा दाह, बुळकांडी, घटसर्प, लाळ्या खुरकूत, आंत्रविषार इत्यादी रोगांची लस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देणे गरजेचे असते.
4) करडे, शेळ्या बाहेर चरावयास जात असल्याने मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादुर्भाव त्यांना होत असतो. त्यामुळे जंतांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खालील जंतनाशकांचा वापर करावा.

जंताचा प्रकार +जंतनाशकाचे नाव +महिना
टेपवर्म (फितीसारखे) +ऑक्‍सिक्‍लोझानाईट व लिव्हामिसॉल +जानेवारी व जून
स्ट्रॅगाईल (गोलकृमी) +फेनबेंडाझोल +मार्च व जुलै
लिव्हर फ्ल्यूक (चपटे कृमी) +फेनबेंडाझोल +मे व ऑक्‍टोबर

करडांना होणाऱ्या बाह्य परोपजीवी म्हणजेच गोचीड, पिसवा, डास इत्यादींच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी ब्युटॉक्‍सचे द्रावण गोठ्यात फवारावे. गोठ्यात नेहमी स्वच्छता ठेवावी.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) म्हणून कार्यरत आहेत.) 

No comments:

Post a Comment