Tuesday, 9 July 2013

फळप्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी घेताहेत उद्योजकतेचे धडे

औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशन (एमजीएम) अन्नतंत्र महाविद्यालय 2008 पासून कार्यरत आहे. परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाशी ते संलग्न आहे. शेतीला प्रक्रियेची जोड देणे आजच्या काळात महत्त्वाचे झाले आहे. काळाची ही गरज लक्षात घेऊनच महाविद्यालयाने फळप्रक्रियेचा पथदर्शक असा लघु प्रकल्प (प्रोसेसिंग युनिट) सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान आवश्‍यक आहेच. त्याचबरोबर त्यांना "प्रॅक्‍टिकल' ज्ञानाचाही अनुभव मिळाला तर एखादा विषय त्यांना अधिक चांगल्या प्रकारे आकलन होतो, हा उद्देश ठेवूनच हे युनिट सुरू करण्यात आले आहे.

महाविद्यालयात अन्नतंत्र प्रक्रियेसंदर्भात अभ्यासक्रम शिकविला जातो. बारावीनंतर चार वर्षांच्या या अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षी 30, दुसऱ्या वर्षी 62, तिसऱ्या वर्षी 102 तर चौथ्या वर्षी 202 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एमजीएम संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव कदम, उपाध्यक्ष पी. एम. जाधव आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, प्रा. व्ही. एस. शिंदे, डॉ. बी. एन. चव्हाण, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य ई. एस. पाटील व त्यांची टिम अन्नतंत्र क्षेत्रात उद्योजक घडविण्याचे काम करते आहे.

अशी झाली सुरवात विद्यार्थी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना त्यांना फळप्रक्रिया नेमकी कशी चालते, त्यासंबंधीची यंत्रे कशी चालवली जातात याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे असते, त्यातूनच त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागतो. हे ज्ञान या महाविद्यालयात युनिटच्या माध्यमातून दिले जात आहे. महाविद्यालयाने मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया मंत्रालयाकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. दीड कोटी रुपये खर्चाच्या युनिटला अन्नप्रक्रिया मंत्रालयाने मंजुरी देत 75 लाख रुपये अनुदान दिले. उर्वरित 75 लाख रुपये महाविद्यालयाने खर्च केले. त्यातून जून 2012 मध्ये फळप्रक्रियेचे युनिट उभे राहिले.
विद्यार्थी आदर्श उद्योजक तयार व्हावा, याबाबत येथे विशेष लक्ष दिले जाते. कच्च्या मालाच्या खरेदीपासून ते थेट "मार्केटिंग'पर्यंतचे मार्गदर्शन करण्यात येते.

प्रक्रिया युनिटसंबंधी ठळक गोष्टी 1) महाविद्यालयाने प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून सुमारे 15 व्यक्तींना रोजगार दिला आहे.
2) सद्यःस्थितीत टोमॅटो केचप, मॅंगो पल्प, मॅंगो ज्यूस (रेडी टू इट) आदी पदार्थ तयार केले जातात. केसर मॅंगो पल्प हा इथला विशेष पदार्थ आहे. भावी काळात आवळा कॅण्डी व पेरू ज्यूस निर्मितीचे नियोजन आहे.
3) युनिटची प्रति तास सुमारे पाचशे किलो फळप्रक्रिया करण्याची क्षमता असली तरी हंगामानुसार, तसेच फळांच्या उपलब्धतेनुसार प्रक्रिया केली जाते.
4) प्रक्रियेसाठीचा कच्चा माल म्हणजे फळे होलसेल व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जातात. केसर आंब्याची गुजरात व मराठवाड्यातून, तर हापूस आंब्याची रत्नागिरी जिल्ह्यातून खरेदी करण्यात येते. टोमॅटोची खरेदी नगर व नाशिक जिल्ह्यातून केली जाते.

विक्री सध्या उत्पादित घटकांची विक्री महाविद्यालयाच्या आवारातूनच केली जाते. जून अखेरपर्यंत आठ टन मॅंगो पल्प, दोन टन मॅंगो ज्यूस (रेडी टू सर्व्ह), तीन टन टोमॅटो केचप व एक टन केसर मॅंगो पल्प तयार करण्यात आला.
भावी काळात औरंगाबाद शहरात विक्रीचे नियोजन आहे. मालाची गुणवत्ता बाजारातील तत्सम उत्पादनांच्या तोडीची असल्याचे प्राचार्य श्री. पाटील म्हणाले. उत्पादनांसाठी "एफडीए'चा परवाना घेतला आहे. विक्री अद्याप मोठ्या प्रमाणात नसली तरी विद्यार्थ्यांना प्रक्रिया उद्योजकाची दिशा घडवणे हाच मुख्य हेतू ठेवला असल्याचे ते म्हणाले. त्यांचा सुमारे पंचवीस वर्षांचा अन्नप्रक्रिया उद्योगातील अनुभव असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

पॅकिंग 1) मॅंगो पल्प - 850 ग्रॅम- टीन पॅकिंग
2) रेडी टू सर्व्ह - मॅंगो ज्यूस - 200 ग्रॅम - काचेच्या बाटलीतून
3) टोमॅटो केचप - एक किलो, अर्धा किलो व दोनशे ग्रॅम - काचेच्या बाटलीतून

प्रक्रिया युनिटचे फायदे 1) विद्यार्थी प्रक्रिया उद्योजक म्हणून उभे राहतील.
2) शेतकऱ्यांमध्येही प्रक्रियेबाबत जागृती निर्माण होईल.
3) परदेशात अशा उत्पादनांची निर्यात करणे शक्‍य होईल.
4) विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रॅक्‍टिकल ज्ञान देणे शक्‍य होत आहे.
5) सुमारे 15 व्यक्तींना रोजगार
6) छोट्या उद्योजकांनाही तांत्रिक सल्ला देणे शक्‍य.

फळप्रक्रिया युनिटच्या माध्यमातून विद्यार्थी खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे येतील असा आमचा प्रयत्न आहे.
आमचे विद्यार्थी औरंगाबादमधील विक्रीच्या महत्त्वाच्या केंद्रस्थळी जाऊन "मार्केटिंग'चाही अभ्यास करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगात काहीतरी करण्याची जिद्द आहे, त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्यास तयार आहोत.
- ई. एस. पाटील,
प्राचार्य, एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद

संपर्क : अन्नतंत्र महाविद्यालय, 0240 - 6601445, 2485602
प्राचार्य ई. एस. पाटील - 9881492245

No comments:

Post a Comment